नियती मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवत असल्याने नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !

‘१९.१.२०२२ च्या उत्तररात्री मी अर्धवट झोपेत होते. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला काही तरी ऐकू येत होते. मी उठून ‘त्या काय सांगत आहेत ?’, ते लिहून घेतले. तेव्हा देवाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला ‘नियती’ या विषयाचे ज्ञान दिले. श्री गुरुकृपेने मला मिळालेले ज्ञान येथे दिले आहे. २८.२.२०२२ या दिवशी आपण या ज्ञानातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

पहिला भाग पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/557283.html

३. नियती जिवाला कर्मफळे भोगायला लावून त्यातून मुक्त होण्यासाठी साहाय्य करत असणे

नियती ही ईश्वरी तत्त्वाच्या अधीन आहे; परंतु नियती मानवाला त्याची कर्मफळे भोगायला लावत असल्याने तो तिला दूषणे देत असतो.

३ अ. ‘नियती स्वतःकडे वाईटपणा घेऊन जिवाला मुक्त करते’, याची जिवाला जाणीव नसणे : नियती म्हणजेच कैकेयी ! रामाला त्रास भोगायला लावणार्‍या ‘कैकेयी’चे नाव तीन युगे झाली, तरी कुणी आदराने घेत नाही किंवा कुणी स्वतःच्या मुलीचे हे नावही ठेवत नाहीत. त्या नावाचा मानवजातीवर इतका परिणाम झाला आहे की, मानव तिचा तिरस्कार करतो. त्याला हे कळत नाही की, नियतीनुसार रामाचा जन्मच रावणाला मारण्यासाठी झाला होता.

श्रीमती भाग्यश्री आणेकर

३ आ. ‘रामाचा जन्म आणि त्याला वनवास भोगावा लागणे’ हे नियतीनुसार रावणाच्या हातून झालेले पूर्वजन्मातील कर्म भोगून त्याला त्यातून मुक्त करण्यासाठी घडले असणे : रावण विष्णुभक्त असून तो त्याचा द्वारपाल होता. त्याच्याकडून झालेल्या चुकांमुळे ऋषींनी त्याला ‘दैत्ययोनीत ३ जन्म घ्यावे लागतील’, असा शाप दिला. त्यामुळे त्याला सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग यांत ३ जन्म दैत्यांचे (अनुक्रमे हिरण्यकश्यपू, रावण आणि शिशुपाल) घ्यावे लागले. प्रत्येक जन्मात श्रीविष्णूने घेतलेल्या अवतारातून त्याला त्यातून मुक्ती मिळाली. त्यानंतर तो पुन्हा श्रीविष्णूचा द्वारपाल झाला.

३ इ. कैकेयी श्रीरामावर अतिशय प्रेम करत असून तिच्यात भावही असल्याने नियतीने तिच्याकडून श्रीरामाला वनवासाला पाठवणे : श्रीरामाचा जन्म केवळ रावणाच्या मुक्तीसाठी झाला, हे नियतीला ठाऊक होते. कैकेयी श्रीरामावर अतिशय प्रेम करणारी होती. तिचा भाव बघून नियतीने तिच्याकडून श्रीरामाला वनवासात पाठवण्याचे कृत्य करवून घेतले. त्यासाठी ती अजूनही जननिंदा सहन करत आहे. रावणाला त्याच्या कर्मातून मुक्त करण्यासाठी तिने रामाला साहाय्य करून त्याच्याकडून धर्मपालन करवून घेतले. अशी ही आई समस्त मानवजातीला निंदनीय ठरली, तरी ईश्वरासाठी तिने योग्य तेच केले होते.

३ ई. मानवाला साधना न केल्यामुळे सत्य न कळणे : आज अशी आई जगात बघायलाही मिळत नाही. मानवाने त्वरित सत्य जाणून त्याचा अभ्यास करावा आणि कलंकित कैकेयीला मुक्त करावे. सत्य परिस्थिती ईश्वरी नियमांनुसार असते, ते जाणण्यासाठी साधनाच हवी. हे सत्य मानवाला कळत नसल्याने युगानयुगे असे घडत आले आहे.

४. पुण्याची फळे भोगतांना सतर्क असावे लागणे, असे जीव ईश्वरचरणी शरणागत राहिल्यास त्यांना गुरुमार्ग मिळणे

पुण्य केल्यानंतरही जी फळे भोगायला मिळतात, उदा. पुढारीपण, जमीनदारी, ऐश्वर्य, सुखी आणि समाधानी कुटुंब इत्यादी, ती सर्व देवाने पूर्वजन्मांतील कर्मांची दिलेली देणगी आहे. हे कर्मफळ भोगतांना क्षणभर जरी अहंयुक्त कृती झाली किंवा ऐश्वर्याने अहं वाढला, तर अशी कृती होताक्षणी आपण पापाचे वाटेकरी होतो. ‘इथे किती सतर्कता बाळगायला पाहिजे ?’ हा गुण नियती त्या जिवाला शिकवते. असे जीव सतत ईश्वरचरणी शरणागत आणि कृतज्ञतेच्या भावात राहिले, तर त्यांना ईश्वरी कृपेने गुरुमार्ग मिळतो.

५. गुरुकृपा आणि साधनेचे महत्त्व !

५ अ. गुरुकृपा प्रारब्धभोग भोगण्यास साहाय्य करत असणे : आपल्या हातून घडलेल्या पाप-पुण्याच्या कर्मातून सुटण्यासाठी केवळ गुरुमार्गच (साधनाच) आपल्याला सोडवतो. हे सत्य जाणण्यासाठी जिवाला या ना त्या कारणावरून पाप आणि पुण्य भोगावे लागते. सध्या पृथ्वीवर काळाचे थैमान माजले आहे. बुद्धी भ्रष्ट झाल्याप्रमाणे मानव वागत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी साधना आणि गुरुमार्गच हवा. ‘तो किती महत्त्वाचा आहे ?’ याची जाणीव क्षणोक्षणी होते.

५ आ. साधना करणार्‍या जिवालाच कुठल्याही प्रसंगातून ‘ते आपल्याच कर्माचे फळ आहे’, हे समजून त्याला गुरुकृपेचे महत्त्व कळणे : ‘मानव पुण्यामुळे मिळालेले चांगले कर्म स्वतःकडे घेतो आणि पापामुळे मिळालेले दुःख हे देवाने दिले’, असा देवाला दोष लावतो; मात्र साधना करणारा जीव त्यातील सत्य समजू शकतो. यातून ‘मानवाला गुरुसाधनेचा मार्ग किती महत्त्वाचा आहे ?’, हे लक्षात येते.

५ इ. नियती म्हणजे समस्त मानवजातीवर असलेली गुरुकृपाच असणे : ईश्वर नियतीचे माध्यम बनवून निर्मळ प्रीतीने आणि उदात्तभावाने जिवाकडून नियमांचे काटेकोर पालन करवून घेतो. ‘ही गुरुमाऊलीचीच माया आहे’, हे कळणे साधनेविना अशक्य आहे; म्हणून मानवाला गुरुमार्ग हवा. गुरुमार्ग पकडून जीव आपल्या गुरूंकडे पोचतो आणि स्वतःच्या जिवाचा उद्धार करून घेत खर्‍या अर्थाने श्री गुरूंच्या कृपाछत्राखाली राहून क्षणोक्षणी आनंदी जीवनाचा अनुभव घेतो. ‘जीवनपथावर चालण्यासाठी गुरुमार्ग आणि साधना करणे किती महत्त्वाचे आहे ? गुरुविण कोण दाखवील वाट ?’, हे त्याच्या लक्षात येते.

अशा जिवाला गुरुचरणी सोपवून त्याच्या उद्धारासाठी क्षणोक्षणी साहाय्य करणारी नियती ही ईश्वराची निर्मिती आहे. ‘नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे’, असे मला वाटते.

६. कृतज्ञता

नाहं कर्ता हरिः कर्ता हरिः कर्ता हि केवलम् ।

अर्थ : मी कर्ता नसून हरि (ईश्वर) कर्ता आहे.

या ज्ञानाच्या रूपात गुरुसिद्धांत माझ्या लक्षात आला. याविषयी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे भगवंता, गुरुराया, तूच शक्ती देऊन हे सर्व लिहून घेतलेस. हे सर्व तुझ्या चरणी अर्पण करते. सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान दयाघना कोटीशः कृतज्ञता !’

लिखाण करतांना झालेले त्रास

‘हे लिखाण लिहून झाल्यावर मी पुन्हा झोपले. सकाळी उठल्यावर अकस्मात् माझी कंबर आणि डोके यांत कळा येऊ लागल्या. जवळ जवळ २ घंटे डोक्यात हातोडी मारल्यासारखे डोके दुखत होत होते. ती असहनीय अवस्था होती. त्या वेळी ‘आता माझे डोके फुटेल’, अशी मरणोन्मुख अवस्था झाली होती. मी प्रार्थना करून वेदनाशामक गोळी घेतल्यावर माझी कंबर आणि डोक्यातील कळा थांबल्या.’

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी, उत्तर प्रदेश. (७.२.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक