मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवणारी नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !

‘१९.१.२०२२ च्या उत्तररात्री मी अर्धवट झोपेत होते. तेव्हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला काही तरी ऐकू येत होते. मी उठून ‘त्या काय सांगत आहेत ?’, ते लिहून घेतले. तेव्हा देवाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला ‘नियती’ या विषयाचे ज्ञान दिले. श्री गुरुकृपेने मला मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.

श्रीमती भाग्यश्री आणेकर

१. नियती

‘नियती’ ही आपल्या पूर्वजन्मांतील प्रत्येक कर्माची साक्षीदार आहे. या ना त्या कारणावरून घडलेल्या कर्मातून त्या जिवाची सुटका करण्यासाठी नियती त्याला त्याचे कर्म परिपक्व करून (प्रसंग घडवून) भोगायला देते.

२. नियतीचा धर्म

२ अ. आज्ञापालन

पुण्यामुळे (पापाच्या उलट अर्थी शब्द) जिवाला सुख भोगायला मिळते, तर पापामुळे दुःख ! हा ईश्वराने नियतीला घालून दिलेला नियम आहे. नियती त्याचे तंतोतंत आज्ञापालन करून प्रत्येक मानवाकडून त्याचे कर्मफल भोगून घेते.

२ आ. पूर्वजन्मांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी जिवाला कर्मफल भोगायला देणे

पूर्वजन्मांच्या हिशोबाप्रमाणे जिवाला पुन्हा पुनर्जन्म प्राप्त होतो आणि तो हिशोब पूर्ण करण्यासाठी नियती त्याला जीवनात मधे मधे चांगली आणि वाईट फळेही चाखायला देते. ती राजाचा रंक (गरीब) किंवा रंकाचा राजाही करते.

२ इ. ‘जिवाची पापकर्मातून मुक्तता होऊन जीव ईश्वरचरणी जावा’, यासाठी त्याच्याकडून योग्य ती कर्मे करवून घेत असणे

जीव अहंच्या कोषाखाली वावरतो. त्यामुळे त्याच्या हातून पाप घडत असते. मानवाच्या कल्याणासाठी ईश्वर नियतीच्या माध्यमातून त्याच्या हातून घडलेली पापे फेडून घेतो. त्याचे कल्याण होण्यासाठी आणि त्याला पुन्हा ईश्वराकडे नेण्यासाठी नियती त्याच्याकडून ती ती कर्मे करवून घेते. ‘पापी जिवाचा उद्धार होऊन तो ईश्वरचरणी जावा’, हा त्या मागचा उदात्त हेतू असतो.

२ इ १. नियतीचा कर्मफल सिद्धांत : ‘कोपिष्ट, क्रोधिष्ट, उन्मत्त, उद्धट, अति आत्मविश्वास असलेला, स्वतःला सतत श्रेष्ठ समजून इतरांचा पाणउतारा (अपमान) करणारा, सतत स्वकौतुकाची अपेक्षा करणारा, आत्मकोषात रहाणारा आणि प्रेमाचा लवलेश नसणारा’, अशा अहंच्या अनेक पैलूंमुळे घडणारी पापकर्मे नियतीच्या कर्मफलन्यायाच्या सिद्धांतात आहेत.

२ इ २. ‘जिवाला कर्मफळे भोगायला लावून पश्चात्तापदग्ध करून त्याला ईश्वरी वाटेवर आणणे’, हा नियतीचा सिद्धांत असणे : पापी जिवांच्या कर्माची फळे नियती या ना त्या जन्मात परिपक्व करून त्याला ती फळे भोगायला लावते. जेव्हा जीव पश्चात्तापाने होरपळतो, तेव्हा नियती त्याला अशा प्रकारे तावून-सुलाखून त्यातून बाहेर काढते. तेव्हा त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख पटते. असा शुद्ध जीव गुरुराजमार्गाच्या पदपथावर पाय ठेवण्यास लायक होतो आणि तो नियतीचा हात धरून चालायला लागतो. त्या वेळी नियती त्याला गुरुमार्गांचे धडे शिकवते.

‘जिवाला कर्मफलातून मुक्त करून ईश्वरी वाटेवर आणणे’, हा नियतीचा सिद्धांतच आहे. ब्रह्मालाही कर्मफल सुटले नाही, तर मानवाला कसे काय सुटणार ?

२ ई. जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकल्यावर जिवाला त्याच्या कर्मांतून सोडवण्यासाठी नियती जिवाला त्याची कर्मफळे भोगायला लावत असणे

कठीण प्रसंगांतून नियती त्या जिवाला त्याचे भोग भोगायला लावून तीव्र कर्मफलातून त्या जिवाची मुक्तता करते. तेव्हा ती त्याला नवजीवनदान देते आणि त्याला ‘पुण्यमार्ग म्हणजे काय ?’, याची जाणीव करून देते. हे त्या जिवाला कधी कळतच नाही. अहंकारामुळे त्याला मार्ग सापडत नाही आणि सुकृताने मिळाल्यास तो ते स्वीकारत नाही. त्यामुळे तो जीव भरकटत रहातो. त्याची देवावरही श्रद्धा नसते. त्यामुळे त्याला देवाचीही साथ मिळत नाही. अशा अवस्थेत त्याला मृत्यू आला, तर तो ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ (चर्पटपञ्जरिकास्तोत्र, श्लोक २१) म्हणजे ‘जन्म आणि मरण यांचे चक्र (मोक्षप्राप्ती होईपर्यंत) नेहमी चालू रहाते.’

(क्रमशः)

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश. (७.२.२०२२)