प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन !

१. विदेही स्थिती, म्हणजे शरिराचे भान न रहाता केवळ जीवात्म्याचे अस्तित्व रहाणे

‘विदेही स्थिती, म्हणजे समाधी अवस्थेत गेल्यावर देहाचे भान उरत नाही. ‘आपला देहच नाही’, असे वाटते. आपले अस्तित्वच उरत नाही, उदा. स्वामी विवेकानंदांना त्यांची षट्चक्रे जागृत झाल्यावर त्यांना ‘त्यांच्यात केवळ जीवात्मा आहे. त्याला स्थूल देहच नाही’, असे वाटायचे.

प.पू. दास महाराज

२. प.पू. दास महाराज बोलत असतांना साधिकेचे ध्यान लागणे आणि त्यांनी तिला ध्यानावस्थेत असतांना हाक मारून जागृत करणे अन् ‘ध्यानाचा पुढचा टप्पा म्हणजे विसर्जन’, असे सांगणे

‘प.पू. दास महाराज मला एक एक सूत्र सांगत असतांना त्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझेही ध्यान लागत होते. एक क्षण असा आला की, ‘मी लिखाण करत आहे’, याचे मला भानही राहिले नाही. मी पूर्ण ध्यानावस्थेत गेले. त्या वेळी मला प.पू. दास महाराज यांनी ‘माधवी’, अशी हाक मारून जागृत अवस्थेत आणले आणि म्हणाले, ‘‘आता तुझे ध्यान लागल्यावर जी स्थिती होती, त्याचा पुढचा टप्पा म्हणजे विसर्जन आहे.’’ – कु. माधवी पोतदार

३. विसर्जन अवस्थेतील लक्षात आलेली सूत्रे

अ. ‘त्या वेळी देव आणि भक्त यांचे मीलन होते अन् ‘मी अन् माझे शरीर’ हा भावच उरत नाही.

आ. शरिरातील आत्मा हा देवाशी निगडित रहातो.

इ. शरिराला स्पर्श केला, तरी तो जाणवत नाही.

ई. जीव परमात्म्यामध्ये विलीन झालेला असतो आणि त्या रूपामध्येच तो निमग्न असतो.

उ. त्या रूपात ब्रह्मकुंडलिनी नाडी जागृत होते. शक्ती जागृत होते. त्यासाठी ‘ॐ’ कार पुष्कळ व्हायला हवेत. (सहस्र, २ सहस्र, ५ सहस्र असे ‘ॐ’ कार व्हायला हवेत.) तेव्हा साक्षात् परमात्म्याचे दर्शन होते आणि तो जीव त्यामध्ये विलीन होतो.

४. समाधी अवस्थेत ऋषिमुनींची ब्रह्मकुुंडलिनी नाडी जागृत होऊन त्यांच्यावर अमृतवृष्टी होणे आणि ते सहस्रो वर्षे समाधी अवस्थेतच असणे

पुढे तीच समाधी अवस्था २ – ३ दिवस रहाते. मग त्यामध्ये एक थेंब अमृतवृष्टी झाली की, जीव ३ – ४ मास (महिने) त्याच समाधी स्थितीत रहातो. ऋषिमुनींची ब्रह्मकुुंडलिनी नाडी जागृत होऊन अमृतवृष्टी झाल्यावर ते सहस्रो वर्षर्े समाधी अवस्थेत जगतात.

५. अमृतवृष्टी झाल्यावर देहाची स्थिती

अमृतवृष्टी झाल्यावर तहान-भूक लागत नाही. लघवीला वा शौचाला जावे लागत नाही; म्हणून ऋषिमुनींच्या देहावर वारुळे वाढतात, झाडे वाढतात. सध्या अशा मोठ्या समाधीत कुणीही नाही.

६. समाधी लावण्याचे निरनिराळे प्रकार आणि उन्नतांची समाधीवस्था

अ. निर्विकल्प समाधी

आ. भावसमाधी

इ. उर्धरण शक्ती, म्हणजे देह पाण्यावर तरंगणे आणि पाण्यातच समाधी लावून बसणे. प.पू. गगनगिरी महाराज निर्विकल्प समाधी लावून पाण्यात आडवे पडून रहायचे. तेथे मासे आणि जलचर प्राणी महाराजांच्या देहाचे लचके तोडायचे.

७. उन्नतांनी प.पू. दास महाराज यांना समाधीविषयी सांगितलेली सूत्रे

प.प. भगवान श्रीधरस्वामी, प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी, (स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस – सूक्ष्मातून) आणि मला शिकवणारे गुरु, म्हणजे प.पू. स्वामी चिन्मयानंद अन् स्वामी सच्चितानंद यांनी मला थोडी फार माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘‘मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा ही चक्रे ओलांडून सहस्रारचक्रापर्यंत समाधी चढवायची नाही; कारण समाधी उतरवण्यासाठी दुसरे उन्नत संत असावे लागतात. सध्या तसे कुणी नाही. त्यामुळे समाधी आज्ञाचक्रापर्यंत चढवायची.’’ (ही समाधी उतरवतांना पुढील प्रक्रिया करायची असते, सहस्रारचक्राजवळ एक ‘शीरचक्र’ नावाचे चक्र आहे, तसेच हाताच्या अंगठ्याच्या टोकाच्या वरच्या बाजूला एक चक्र आहे. अंगठ्याच्या टोकावरील चक्राने शीरचक्रावर दाब द्यायचा असतो आणि तेव्हा काही मंत्रही म्हणायचे असतात. ही समाधी उतरवणे कठीण असते. ते उन्नत संतांनाच जमते.)

८. विदेही स्थिती १ – स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुष्कळ परीक्षा घेणे आणि त्यांना कालीमातेचे दर्शन घडवणे

विदेही, म्हणजे निर्विकल्प. त्याला कसलाच विकल्प नाही आणि शरीरच नाही. तो शरीर सोडून निराकार तत्त्वाकडे जातो, म्हणजे निर्विकाराकडे जातो. त्यातून निर्विकल्प समाधीकडे जातो, म्हणजे निर्गुण तत्त्वाकडे जातो.

उदा. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितले, ‘‘आरशात पहातांना आधी तुझी सावली नाहीशी झाली पाहिजे. तुला देवीशी एकरूप व्हायचे आहे.’’ त्यासाठी स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदाची पुष्कळ परीक्षा घेतली आणि त्यांना कालीमातेचे दर्शन घडवले.

९. विदेही स्थिती २ – प.प. भगवान श्रीधरस्वामींची विदेही स्थिती

९ अ. समर्थ रामदासस्वामींनी श्रीधरस्वामींच्या डोक्यावर हात ठेवून आज्ञा दिल्यावर श्रीधरस्वामींची ब्रह्मानंदी टाळी लागणे, जीवात्मा ब्रह्मानंदात जाणे आणि त्या स्थितीत श्रीधरस्वामी कर्नाटकाकडे चालत जाणे अन् त्यांना विदेही अवस्था प्राप्त होणे : प.प. भगवान श्रीधरस्वामींना रामदासस्वामींची आज्ञा झाली होती. ते म्हणाले, ‘‘मी महाराष्ट्र्रात प्रसार केला आहे. कर्नाटकामध्ये प्रसार केला नाही. तू कर्नाटकात जा.’’ समर्थांचा हात डोक्यावर पडला आणि ते सज्जनगडावरून चालू लागले. ते तिसर्‍या वर्षी शिवानंदस्वामींच्या आश्रमात गेले. तोपर्यंत श्रीधरस्वामी गोकर्ण, कर्नाटकातील तीर्थक्षेत्र धर्मस्थळ, मंजुनाथ सगळीकडे चालतच गेले. ३ वर्षांत त्यांच्या पायांची नखे लांब झाली होती. ते अनवाणी चालत असल्याने त्यांच्या पायाला भोके पडली होती. त्यांच्या जटा वाढल्या होत्या. त्या जटांमध्ये गांधीलमाशांनी घरे केली. गांधीलमाशी चावली, तर देहाची आग होते. पण त्यांना काही झाले नाही. अशी त्यांची विदेही अवस्था होती.

९ आ. दत्त महाराजांनी शिवानंदस्वामींना स्वप्नात श्रीधरस्वामींविषयी सांगणे : दत्त महाराजांनी शिवानंदस्वामींना स्वप्नात येऊन सांगितले, ‘हा माझा अंशावतार आहे. तो धर्मकार्य करणार आहे. त्याचे नाव श्रीधर आहे. ४ शिष्यांना पाठवून त्याला पकडा. तो आवरणार नाही.’ शिष्यांनी श्रीधरस्वामींना धरल्यावर ते स्वतःला हिसकावून घेऊ लागले. तेव्हा त्यांचे केस वाढले होते. त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते. नंतर शिवानंदस्वामींनी त्यांना मठात ठेवले. शिवानंदस्वामींनी शिष्यांना श्रीधरस्वामींना प्रतिदिन स्नान घालून केस आणि जटा धुवायची सेवा दिली. श्रीधरस्वामींना भावसमाधी लागली होती. समर्थ रामदासस्वामींनी श्रीधरस्वामींच्या डोक्यावर हात ठेवला होता. त्यामुळे त्यांची सहस्रारचक्र ओलांडून भावसमाधी स्थिर झाली होती. त्यांच्या देहाला काही भान नव्हते. शिवानंदस्वामी आणि त्यांचे शिष्य श्रीधरस्वामींना स्नान घालण्याची सेवा करायचे. शिवानंदस्वामी श्रीधरस्वामींच्या कानामध्ये ‘ॐ’कार म्हणायचे आणि त्यांच्या कानात सांगायचे, ‘‘श्रीधर, तुझा जन्म धर्मकार्यासाठी झाला आहे. जागा हो.’’

९ इ. प.पू. शिवानंदस्वामींनी भगवान श्रीधरस्वामींना विदेही अवस्थेतून बाहेर काढणे : भगवान श्रीधरस्वामींच्या सहस्रारचक्रांत गेलेला प्राण खाली उतरवण्यासाठी त्यांना एक वर्ष लागले. त्यांचे वाढलेले केस कापले. त्यांना समाधी अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी दीड वर्ष लागले. त्यांचा प्राण आज्ञाचक्र, विशुद्धचक्र ते नाभीचक्रापर्यंत आणला आणि तेथे आल्यावर ते (नाभीचक्राजवळ आल्यावर तेथील चक्र बाजूला झाले आणि हवा बाहेर पडून) भावसमाधीतून बाहेर पडले आणि पळायला लागले. त्या वेळी शिवानंदस्वामींनी त्यांना सांगितले, ‘‘तू भावसमाधीत होतास. तू येथेच रहायचे. कुठे जायचे नाही.’’

९ ई. श्रीधरस्वामींनी प.पू. शिवानंदस्वामींना स्वतः केलेली प्रतिज्ञा सांगणे : श्रीधरस्वामी शिवानंदस्वामींना म्हणाले, ‘‘तुम्ही मला जागे केले. तुम्ही माझे गुरु आहात. ‘मी कुठेही मठाधिपती म्हणून रहाणार नाही’, अशी प्रतिज्ञा केली आहे.’’ नंतर ते यात्रा करत राहिले. शिवानंदस्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे पुढचे सर्व कार्य श्रीधरस्वामींनी केले. नंतर श्रीधरस्वामी यात्रा करत वरदपूरला पोचले.’ (क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०)