राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशाखापट्टणम् येथे नौदलाचा ‘फ्लीट रिव्ह्यू’ !

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली येथे भारतीय नौदलाचा बहुचर्चित ‘फ्लीट रिव्ह्यू’ आयोजित करण्यात आला होता. सुरक्षादलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती कोविंद यांनी नौदलातील ६० जहाजे आणि पाणबुड्या, तसेच ५५ विमाने यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या वेळी आढावा घेतला. हा १२ वा फ्लीट रिव्ह्यू असून भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रदर्शनात भारतील नौदल, तसेच ‘कोस्ट गार्ड’ यांच्या जहाजांचा समावेश होता. यासमवेतच ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस’ (पृथ्वी विज्ञानाचे मंत्रालय) यांनी बनवलेल्या जहाजांचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. या प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान हेही उपस्थित होते.

(‘फ्लीट रिव्ह्यू’ म्हणजे भारतीय नौदलातील अत्याधुनिक जहाजे, विमाने आणि अन्य शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम !)