‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वर मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘अपलोड’ करून त्यांची किंमत देण्यात आल्याच्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा कारवाईचा आदेश !

सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे महिलांचा लिलाव करण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांचाही लिलाव चालू असल्याची शेकडो प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांच्याविषयी  कारवाई का होत नाही ? महिला कोणत्या धर्माची आहे, यावरून कारवाई ठरत असेल, तर हे दुर्दैवी आहे ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वर मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘अपलोड’ करून त्यांची किंमत देण्यात आली आहे. ‘सुल्ली डील’ या ‘ॲप’ने ‘अपलोड’ केलेली ही छायाचित्रे ‘गिटहब’ या ‘ॲप’नेही प्रसारित केली आहे. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

याविषयी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलतांना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या ‘‘अशा प्रकारे मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘ॲप’वर प्रसिद्ध करून त्यांची अपकीर्ती केली जात आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. हा प्रकार करणार्‍यांपैकी काही जण मुंबईतील आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात देहली पालीस अपयशी ठरले आहेत. महिलांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. महिलांच्या अनुमतीविना त्यांची छायाचित्रे कशी काय प्रसिद्ध केली जातात ? याचे स्पष्टीकरण व्हायला हवे. याविषयी मी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलले आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.’’

राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश !

या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी ‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वरील माहिती तात्काळ काढावी, अशी मागणी केली आहे, तसेच ही माहिती सामाजिक माध्यमांना प्रसारित करणार्‍या ‘गिटहब’ या ‘ॲप’वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सौ. चाकणकर यांनी महाराष्ट्र पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.