सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

या लेखात आपण ‘संधी’ म्हणजे काय आणि ते कसे सिद्ध होतात ?’, यांविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ७ – भाग १)

१. ‘संधी’ म्हणजे ‘सांधणे’ किंवा ‘जोडणे’

‘व्यक्ती बोलतांना बर्‍याचदा शेजारी शेजारी येणारे दोन शब्द एकमेकांना जोडून त्यांचा जोडशब्द सिद्ध करतात, उदा. ‘सूर्य अस्त झाला’, असे म्हणण्याऐवजी ‘सूर्यास्त झाला’, असे म्हणतात. ‘सूर्यास्त’ या जोडशब्दामध्ये ‘सूर्य’ या पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर आणि ‘अस्त’ या दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर एकमेकांमध्ये मिसळले आहेत. या मिसळण्यातून ‘र्या’ हे अक्षर सिद्ध झाले आहे. या पूर्ण प्रक्रियेला ‘संधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

पुढील सारणीच्या दुसर्‍या स्तंभामधील वाक्यांतील ठळक केलेले शब्द हे संधी आहेत.

२. शब्दांचा संधी करण्याची एक नियमबद्ध पद्धत असणे

दोन शब्दांचा संधी करतांना एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, ‘व्याकरणात कोणतेही शब्द कशाही प्रकारे परस्परांशी जोडले जात नाहीत. ते जोडण्याचे अत्यंत पद्धतशीर असे नियम आहेत. त्या नियमांना अनुसरूनच प्रत्येक संधी केला जातो.’

सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे

३. ‘संधी’ची व्याख्या

जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर नियमबद्धरित्या परस्परांमध्ये मिसळणे अन् त्याद्वारे त्या दोन अक्षरांच्या जागी एक अक्षर सिद्ध होणे, याला ‘संधी’ असे म्हणतात.

४. संधीचे प्रकार

संधीचे ‘स्वरसंधी’, ‘व्यंजनसंधी’ आणि ‘विसर्गसंधी’ असे तीन प्रकार आहेत. या प्रकारांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

४ अ. स्वरसंधी

४ अ १. जोडशब्दातील एकमेकांमध्ये मिसळणारी अक्षरे जर स्वर असतील, तर त्या संधीस ‘स्वरसंधी’ असे म्हणत असणे : मराठीमध्ये ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ आणि औ’ हे बारा स्वर आहेत. हे स्वर ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या अक्षरांमध्ये मिसळतात आणि विविध शब्द सिद्ध होतात. याखेरीज आपल्याला ठाऊकच आहे की, मराठी भाषेतील ‘क’पासून ‘ळ’पर्यंतची सर्व अक्षरे ही मुळात ‘क्, ख्…..ह्, ळ्’ अशी अपूर्ण उच्चार असलेली, म्हणजे पाय मोडलेली आहेत. त्यांच्यात ‘अ’ हा स्वर मिसळल्याशिवाय ती पूर्ण उच्चार असलेली अक्षरे होत नाहीत, उदा. ‘ग् + अ = ग’. सर्व पूर्णाेच्चारित अक्षरे अशीच सिद्ध होतात. त्यामुळे या अक्षरांना स्वरयुक्त अक्षरेच मानले जाते. विविध शब्द सिद्ध होतांना या अक्षरांमध्ये ‘अ’च्या ऐवजी अन्य स्वर मिसळले जातात, उदा. ‘गायन’ या शब्दात ‘ग्’मध्ये ‘आ’ हा स्वर मिसळला आहे.

जेव्हा जोडशब्दातील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर स्वरयुक्त असते आणि दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर स्वर असते, तेव्हा ‘स्वरसंधी’ सिद्ध होतो, उदा. ‘मुनीश्वर’ हा संधी आहे. याची फोड ‘मुनि + ईश्वर = मुनीश्वर’ अशी होते. यातील ‘मुनि’ या शब्दातील ‘नि’ हा ‘इ’ स्वरयुक्त आहे आणि ‘ईश्वर’ या शब्दातील ‘ई’ हा स्वर आहे. ‘इ’ आणि ‘ई’ हे दोन स्वर एकत्र आल्यामुळे या संधीस ‘स्वरसंधी’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२१)

लेखांक ७. भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/538275.html