फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

बजरंग दलाकडून तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई नाही !

  • हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अश्लाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
  • या शाळांनी कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे धारिष्ट्य दाखवले असते का ?
सेंट मेरी पब्लिक स्कूलच्या व्हिडीओतील एक विडंबनात्मक दृश्य

फतेहाबाद (हरियाणा) – येथील ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ आणि ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ या शाळांनी सादर केलेल्या रामलीलेमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात आले. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सध्या या संदर्भातील चित्रफित सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याप्रकरणी दोन्ही शाळांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाने पोलिसांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. (अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

१. या तक्रारीमध्ये बजरंग दलाने म्हटले आहे की, ‘सेंट मेरी स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. स्कूल’ या शाळांमध्ये रामलीला सादर करण्यात आली. यामध्ये हिंदु देवतांची अतिशय अश्‍लाघ्य टवाळी करण्यात आली. देवतांच्या या अवमानाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी प्रतिसाद दिला. या वेळी एकानेही हे विडंबन रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणी दोन्ही शाळांचे संचालक, मुख्याध्यापक, सहभागी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि आक्षेपार्ह नाटिका सादर करणारे विद्यार्थी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी

२. बजरंग दलाचे दीपक सैनी म्हणाले, ‘‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, ही या शाळांची सवय बनली आहे. वरील घटनेच्या प्रकरणी तक्रार केल्यानंतरही अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.’’ बजरंग दलाने या शाळांच्या विरोधात निदर्शनेही केली.

‘सेंट मेरी स्कूल’मधील रामलीलेमध्ये करण्यात आलेले अश्लाघ्य विडंबन !

‘सेंट मेरी स्कूल’मध्ये सादर करण्यात आलेल्या रामलीलेच्या कार्यक्रमात सीता हरणाच्या प्रसंगामध्ये रावण सीतेचे अपहरण करण्यासाठी येतो. तेव्हा सीता स्वत:हून रावणासमवेत पळून जातांना दाखवली आहे. यातून सीता स्वेच्छेने रावणासमवेत पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम धनुष्यबाण घेऊन सीतेचा शोध घेण्यास निघतात; परंतु ते ‘आपण कुणाला मारायला निघालो आहोत ?’ हेच विसरून जात असल्याचे दाखवले आहे. राम आणि लक्ष्मण यांच्यातील काही संवाद पुढे दिलेले आहेत.

राम : लक्ष्मणा, ही सीता कोण आहे ?
लक्ष्मण : रामाची पत्नी.
राम : हा राम कोण आहे ?
लक्ष्मण : रामलीलेतील नायक.

शेवटी लक्ष्मण रामाला म्हणतो की, आपल्याला रावणाला मारून सीता भाभीला वाचवायला जायचे आहे.

‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’च्या मुख्याध्यापकाकडून ‘हिंदु आयटी सेल’ची क्षमायाचना

‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’मध्ये सादर करण्यात आलेल्या रामलीलेच्या कार्यक्रमात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केल्याच्या प्रकरणी ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’चे मुख्याध्यापक राजीव शर्मा यांनी ‘हिंदु आयटी सेल’ या संघटनेची क्षमायाचना केली.

शर्मा म्हणाले,

‘‘रामलीलेच्या एका जरी प्रसंगावर जर कोणत्याही माननीय व्यक्तीचा आक्षेप असेल किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारे भावना दुखावल्या असतील, तर विद्यालय व्यवस्थापन समिती त्यांची क्षमाप्रार्थी आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही.’’

‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’चे पत्र (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

या शाळेने रामलीलेच्या कार्यक्रमात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केल्याच्या घटनेनंतर ‘हिंदु आयटी सेल’चे संस्थापक सदस्य शांतनु, संघटनेचे अन्य सदस्य आणि पत्रकार हिंमांशु तिवारी यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी ‘हिंदु आयटी सेल’चे संस्थापक सदस्य अक्षित सिंह यांनी सेंट मेरी स्कूलच्या मुख्याध्यापकांना क्षमा मागण्यासाठी चेतावणी दिली होती. यानंतर अवघ्या २० मिनिटांच्या आत मुख्यध्यापक शर्मा यांनी हिंदूंची क्षमा मागितली.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)