नवी देहली – हवेतील सूक्ष्म कण आणि वाहतुकीचा आवाज एकत्रितपणे आरोग्याला गंभीर हानी पोचवतात. हवा आणि ध्वनी प्रदूषण यांमुळे मस्तिष्काघातचा (‘ब्रेन स्ट्रोक’चा) धोका आणखी वाढतो. स्वीडनमधील ‘कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट’च्या ‘एन्व्हायर्नमेंटल मेडिसिन विभागा’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’ या नियतकालिकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. युरोपीयन युनियन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे विश्लेषण केले आहे. या संशोधनात स्वीडन, डेन्मार्क आणि फिनलंड या देशांमधील अनुमाने १ लाख ३७ सहस्र प्रौढांच्या चाचणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रक्रियेमधून असे दिसून आले की, ‘पीएम् २.५’ या सूक्ष्म प्रदूषण कणांच्या प्रमाणात प्रति घनमीटर ५ मायक्रोग्राम वाढ झाल्यास स्ट्रोकचा धोका ९ टक्क्यांनी वाढू शकतो. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या आवाजात ११ डेसिबलची वाढ झाल्यास स्ट्रोकचा धोका ६ टक्क्यांनी वाढतो. जेव्हा दोन्ही घटक एकत्र असतात तेव्हा धोका आणखी वाढतो. ज्या शांत भागात ४० डेसिबलपर्यंत आवाज होता, तिथेही ‘पीएम् २.५’ वाढल्याने स्ट्रोकचा धोका ६ टक्क्यांनी वाढला, तर अधिक आवाज असलेल्या भागात (८० डेसिबल) हा धोका ११ टक्क्यांनी वाढला.
भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !
संशोधनाचे निष्कर्ष भारतासारख्या देशासाठीदेखील एक गंभीर चेतावणी आहे. प्रदूषण आणि वाहतुकीचा आवाज या दोन्ही भारतातील प्रमुख समस्या आहेत. जगातील १०० सर्वांत प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात आहेत. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सर्व महानगरांवर होत असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.