ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. सध्याच्या मानवांत सात्त्विकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांच्यात हे राज्य चालवण्याची क्षमता नाही; म्हणून ईश्वराने उच्च लोकांतून काही सहस्र दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. ही दैवी बालके उपजतच सात्त्विक असल्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता यांतून ‘ही दैवी बालकेच ईश्वरी राज्य चालवू शकतील’, हे लक्षात येईल. त्यांच्या सहवासात असतांना, त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांचे बोलणे ऐकल्यावर ऐकणार्‍या साधकांचा भाव जागृत होतो. त्यांच्याकडून आनंद आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होत असते. सर्व वाचकांना हे शिकता येण्यासाठी प्रत्येक रविवारी दैवी बालकांची लेखमाला चालू करण्यात आली आहे.


सनातन संस्थेतील दैवी बालके केवळ ‘पंडित’ नाहीत, तर ‘प्रगल्भ’ साधक आहेत !

सनातन संस्थेत काही दैवी बालके आहेत. त्यांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरील असते. आध्यात्मिक विषयावर बोलतांना त्यांच्या बोलण्यात ‘सगुण-निर्गुण’, ‘आनंद, चैतन्य, शांती’ यांसारखे शब्द असतात. असे शब्द बोलण्यापूर्वी त्यांना थांबून विचार करावा लागत नाही. त्यांचे बोलणे ओघवते असते. ‘ते ऐकत रहावे’, असे वाटते. सर्वसाधारण व्यक्तीच्या दृष्टीकोनातून एखाद्याच्या बोलण्यात असे शब्द येण्यासाठी त्याला नियमित या विषयांशी संबंधित असणे आवश्यक असते. त्या विषयाचा गाढा अभ्यास केला की, ते विषय बुद्धीने कळतात आणि आकलन होतात. त्यानंतर ‘पांडित्य’ येऊन तसे बोलणे होते; परंतु हे बालसाधक केवळ ८ ते १५ वर्षे या वयोगटातील आहेत. त्यांनी ग्रंथांचा गाढा अभ्यास काय; पण वाचनही कधीच केलेले नाही. त्यामुळे त्यांची ही परिभाषा त्यांच्या गेल्या जन्मीच्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेली प्रगल्भता दर्शवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१०.२०२१)


आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)


६१ टक्के पातळीची दैवी बालिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) हिची निरीक्षणक्षमता आणि तिचे प्रत्येक गोष्टीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहाणे

कु. अपाला औंधकर

१. स्वतः केलेल्या नृत्याची ध्वनीचित्र चकती पहातांना विचारप्रक्रियेत झालेला पालट आणि त्यातून तिला शिकायला मिळालेले सूत्र

१ अ. स्वतःच्या नृत्याची ध्वनीचित्र चकती पहातांना ‘मी नृत्य चांगले केले आहे’, असा विचार मनात येणे : वर्ष २०१८ आणि वर्ष २०१९ मध्ये आश्रमात झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी आणि अन्य काही निमित्ताने ध्वनीचित्र चकतीच्या माध्यमातून माझे नृत्य दाखवण्यात येत असे. ती ध्वनीचित्र चकती पहातांना माझ्या मनात ‘साधकांना माझे नृत्य दाखवत आहेत. मी चांगले नृत्य केले आहे’, असे विचार यायचे.

१ आ. ‘सर्व देवाच्या कृपेमुळे आणि व्यष्टी साधनेच्या चांगल्या प्रयत्नांमुळे होते’, अशी जाणीव झाल्यावर स्वतः केलेल्या नृत्याची ध्वनीचित्र चकती पहातांना ‘अन्य साधिकेचे नृत्य पहात आहे’, असे वाटणे : वर्ष २०२१ मध्ये रामनाथी आश्रमात नवरात्री उत्सवानिमित्त मी ‘कालिकास्तुती (ऐगिरी नंदिनी)’ यावर आधारित केलेल्या नृत्याची ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली. तेव्हा ते ‘सर्व देवाच्या कृपेमुळे आणि व्यष्टी साधनेच्या चांगल्या प्रयत्नांमुळे झाले’, याची मला जाणीव झाली. माझे नृत्य पहातांना ‘तिथे मी नसून अन्य साधिकाच नृत्य करत आहे’, असे मला वाटले आणि माझ्या मनात ‘साक्षात् श्री दुर्गादेवी तिथे अवतरली आहे, तर मी नृत्य कसे करू शकते ?’, असा विचार आला. देवी आणि गुरुदेव यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्याकडून नृत्य करवून घेतले’, याची मला जाणीव झाली.

१ इ. ‘देवामुळे प्रत्येक कृती घडते’, ही जाणीव असल्यावर अहं न वाढता खरा आनंद मिळणे : ‘आपल्यात ‘मीपणा’ असतांना आपण कोणताच आनंद घेऊ शकत नाही. ‘देवामुळे प्रत्येक कृती घडते’, ही जाणीव मनात असल्यावर आपला अहं वाढत नाही आणि खरा आनंद मिळतो’, हे गुरुदेवांनी मला या प्रसंगांच्या माध्यमातून शिकवले.

२. स्वतःचे कौतुक झाल्यावर मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. साधकांनी नृत्याची प्रशंसा केल्यावर मनाला प्रश्न विचारून शिकण्याच्या स्थितीत रहाण्याची जाणीव होणे : मी केलेल्या नृत्याची ध्वनीचित्रचकती पाहिल्यावर अनेक साधक मला भेटल्यावर ‘नृत्य भावपूर्ण केले आहे. साक्षात् श्री दुर्गादेवीच नृत्य करत आहे, असे वाटत होते’, अशी माझ्या नृत्याची प्रशंसा करायचे. त्या वेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागले. ‘अपाला, तू शिकण्याच्या स्थितीत आहेस ना ? गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) अपेक्षित असे तुझे वागणे होत आहे ना ?’ त्या वेळी मी त्वरित सतर्क व्हायचे आणि मला ते स्वतःचे कौतुक वाटले नाही.

२ आ. ‘कौतुक केवळ भगवंताच्या गुणांचेच होऊ शकते’, असा विचार येऊन सर्व देवाच्या चरणी अर्पण करणे : त्यानंतर मी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितले, ‘गुरुदेवा, मी शिकण्याच्या स्थितीत असेन, तर तुम्ही मला नक्की काहीतरी सांगाल आणि मी माझ्या कौतुकात अडकले असेन, तर तुम्ही मला काही सांगणार नाही.’ तेव्हा माझ्या मनात ‘कौतुक हे केवळ भगवंताच्या गुणांचेच होऊ शकते. भगवंताच्याच कृपेमुळे त्यातील एका गुणाचे कौतुक झाले, तर यात माझे काही नाही’, असा विचार आला. ‘देवानेच मला हे सुचवले’, याची जाणीव होऊन मी सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण केले.

३. एखादी चांगली कृती केल्यावर साधकाला ‘स्वतःचे कौतुक व्हावे’, असे वाटणे; मात्र परात्पर गुरुदेव शिकण्याच्या स्थितीत असतात अन् ते पाहून सतत शिकत राहून त्यांचा आदर्श घ्यायला हवा’, हे शिकायला मिळणे

आपले गुरुदेव साक्षात् भगवंत असून आपल्यासारख्या लहान जिवाकडून शिकतात, उदा. साधकाने एखादी अनुभूती सांगितली किंवा व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगितले, तर ते त्वरित म्हणतात, ‘‘अरे वा, आज मला हे तुमच्याकडून शिकायला मिळाले !’’ ‘आपण एखादी चांगली कृती केल्यावर आपल्याला ‘स्वतःचे कौतुक व्हावे’, असे वाटते; पण परात्पर गुरुदेव शिकण्याच्या स्थितीत असतात’, असे वाटून मीही सतत शिकत राहून त्यांचा आदर्श घ्यायला हवा’, हे मला शिकायला मिळाले.’

४. ‘शिकण्यातच खरा आनंद आहे’, असा भाव असणारी आणि ‘स्वतःतील प्रेमभाव वाढवून इतरांना आनंद देणे’, हे देवाला अपेक्षित आहे’, याची जाण असणारी कु. अपाला !

एकदा गुरुदेवांच्या भेटीत एका बालसाधिकेने सांगितले, ‘‘मला इतरांशी बोलून आनंद मिळतो.’’ तेव्हा गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘तुझ्या बालसत्संगातील दैवी बालकांना ‘केवळ तुझ्या सत्संगात नाही, तर इतरांकडूनही आनंद मिळतो’, असे कसे ?’’ त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेनेच मला उत्तर देता आले, ‘‘प.पू. गुरुदेव, दुसर्‍यांकडून आपल्याला अधिकाधिक शिकता येते. त्यामुळे आपल्याला अधिक आनंद मिळतो.’’ त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘अतिशय छान उत्तर आहे, शाबास !’’ तेव्हा मला कृतज्ञता वाटली अन् ‘साक्षात् भगवंतस्वरूप गुरुदेव माझ्या अहंची परीक्षा घेत आहेत’, असे मला वाटले. ‘देवाला मी प्रेमभाव वाढवणे आणि इतरांना आनंद देणे अपेक्षित आहे’, हे मला शिकायला मिळाले.

(‘कु. अपाला बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते.’ – संकलक)

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२१)


हिंदु राष्ट्रासाठी तेजस्वी पिढी सिद्ध होण्यासाठी आदर्श गुरुकुल स्थापन करण्याची सिद्धता करणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पू. तनुजा ठाकूर

‘गेल्या काही वर्षांपासून ‘एक आदर्श गुरुकुल चालू करावे’, अशी माझी इच्छा होती. एप्रिल २०२० मध्ये या विषयाचे चिंतन करून ‘वैदिक उपासनापीठ’ यांच्या वतीने चालवण्यात येणारे गुरुकुल कसे असेल ?’, या विषयाच्या लेखमालेतील १५ भाग मी ‘व्हॉट्सॲप’वर धर्मप्रसाराच्या हेतूने सिद्ध केलेल्या ‘जागृत भव’ नावाच्या गटावर प्रसारित केले होते. मागील सहा मासांपासून माझ्या मनात ‘जर आता ‘कोरोना’ची लाट नसती, तर मी लगेचच गुरुकुल चालू केले असते’, हा विचार पुनःपुन्हा येत होता.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले दैवी बालकांसाठी सिद्ध करत असलेले दैवी गुरुकुल पाहून ‘स्वतःचे स्वप्न पूर्ण होत आहे’, असे वाटणे

रामनाथी आश्रमात गेल्या काही दिवसांपासून  दैवी बालकांचा सत्संग चालू आहे. त्यात मला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य लाभले. आश्चर्याची गोष्ट अशी की, ‘मी जशी गुरुकुलाची कल्पना केली होती, तसेच दैवी गुरुकुल प.पू. गुरुदेव दैवी बालकांसाठी सिद्ध करत असल्याचे माझ्या लक्षात आले.’ हे सर्व प्रत्यक्षात घडत असल्याचे बघून ‘माझे स्वप्न पूर्ण होत आहे’, असे मला वाटले. ‘गुरु शिष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात’, याची प्रचीती मला येत आहे.

२. मी समाजात मांडलेल्या गुरुकुलाच्या संकल्पनेतील काही महत्त्वाची सूत्रे रामनाथी येथे कृतीत आणली जात असल्याचे लक्षात येणे

२ अ. ‘हिंदु राष्ट्रासाठी एक आदर्श तेजस्वी पिढी आणि आदर्श धर्मप्रसारक (उत्तम साधक) सिद्ध करणे’, हा गुरुकुल स्थापन करण्याचा मुख्य हेतू आहे !

२ आ. संतच गुरुकुलाचे मार्गदर्शक असतील ! : गुरुकुलाचे मार्गदर्शक संतच असतील, तरीही विशिष्ट कौशल्य असणारा साधक किंवा एखादा विद्यार्थी ज्या कलेत यशस्वी होईल, तो इतरांनाही ती कला शिकवून त्यात स्वतःसुद्धा कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करील.

२ इ. गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे मुख्य ध्येय ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे असल्याने त्यात अवलंबली जाणारी शिक्षणपद्धत : गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे मुख्य ध्येय ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे असल्याने साधना करण्याला सर्वांत अधिक महत्त्व असेल. गुरुकुलात सध्याची शिक्षणपद्धत अवलंबली जाणार नाही. ‘गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे ‘धर्म आणि अध्यात्म’ या विषयांचे सूक्ष्म ज्ञान वाढावे, तसेच त्यांचे सहावे इंद्रिय विकसित व्हावे’, यांसाठी प्रयत्न केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे सहावे इंद्रिय आधीपासून जागृत झाले असेल, त्यांना पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन केले जाईल.

२ ई. गुरुकुलात ‘विद्यार्थ्यांतील कौशल्य आणि त्यांची आध्यात्मिक पातळी’ यांना महत्त्व असणे : गुरुकुलात प्रचलित शिक्षणपद्धतीनुसार इयत्ता पद्धत असणार नाही. गुरुकुलात मुले आणि मुली एकत्रच शिकतील.  ‘विद्यार्थ्यांतील कौशल्य आणि त्यांची आध्यात्मिक पातळी’ लक्षात घेतली जाईल. निरनिराळ्या गटांतील वेगवेगळे कौशल्य असणार्‍या साधकांचा अभ्यासक्रम वेगवेगळा, म्हणजेच त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या साधनेला अनुरूप असा असेल.

२ उ. समष्टी साधनेचे महत्त्व : विद्यार्थ्यांमध्ये एखादे कौशल्य असल्यास त्यांना त्यात अजून निपुण करून साधनेच्या मार्गावर पुढे नेले जाईल. त्या विद्यार्थ्यांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना त्यांच्यातील कौशल्य अन्य लोकांना शिकवण्यास सांगितले जाईल.

२ ऊ. सध्याच्या शिक्षणपद्धतीनुसार शिकलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे ते केवळ ‘पोपटपंची’ करणारे नसतील. त्यांना प्रायोगिक स्तरावर विषय शिकवले जातील.

२ ए. विद्यार्थ्यांमध्ये ‘त्यागी वृत्ती आणि सेवाभाव’ हे गुण विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

२ ऐ. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ ही प्रक्रिया राबवणे, हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे अविभाज्य अंग असेल.

२ ओ. ‘गुरुकुलात कोणतेही शुल्क न घेता ज्ञान दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘सनातनचे ग्रंथ’ समाविष्ट असतील.’

– पू. तनुजा ठाकूर (२८.१०.२०२१)


कु. अपालाची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

सत्संगात सूक्ष्मातून सात्त्विक पितर आले असून त्यांना गती मिळाल्याचे जाणवणे : ‘ एकदा आमचा सत्संग चालू असतांना संतांनी साधकांना विचारले, ‘‘सूक्ष्मातून कुणी जीव किंवा व्यक्ती इथे आल्याचे जाणवते का ? कोण जाणवते ? याचे सूक्ष्म परीक्षण करा आणि सांगा.’’ त्या वेळी परीक्षण केल्यावर मला सत्संगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून ‘सात्त्विक पितर आणि भेटीला उपस्थित असणार्‍या एका साधकाचे पूर्वज दिसले. ‘परात्पर गुरुदेवांच्या चैतन्याने ते सर्व पितर प्रसन्न आणि धन्य झाले आहेत अन् त्या पितरांना चांगली गती मिळाली’, असे मला जाणवले. त्या वेळी  ‘तिथे वेगळाच दिव्य पिवळा प्रकाश पडला आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.’

– कु. अपाला औंधकर (२४.१०.२०२१)

प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, तुम्ही जे शिकायला देता, त्यानुसार आमच्याकडून कृती होऊ दे. ते आमच्याकडून कृतीच्या स्तरावरील प्रयत्नांतही येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते. आपण दिलेल्या अमूल्य शिकवणीसाठी आपल्या कोमल चरणी या देहाला समर्पित करून कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.१०.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.