राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती प्रेम असणारे अन् अध्यात्माची आवड असणारे सांगली येथील कै. नारायण रघुनाथ कुलकर्णी (वय ८२ वर्षे) !

‘माझे बाबा नारायण रघुनाथ कुलकर्णी (आबा) यांचे ४.१.२०२४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. नारायण कुलकर्णी

१. शिकण्याची आवड : आबांनी त्यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षी नोकरीत असतांनाच सांगली येथील रात्रीच्या महाविद्यालयामधून ‘विधीज्ञ’ ही पदवी घेतली. नंतर त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथून कृषीविज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी (एम्.एस्सी. ॲग्रिकल्चर) ही पदवी घेतली.

२. प्रामाणिक : ते सरकारी नोकरीत असतांना त्यांनी कधीही स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी किंवा प्रवासासाठी सरकारी गाडीचा वापर केला नाही. त्यांना अन्य कुणी स्वतःच्या पदाचा अपवापर केलेला आवडत नसे. त्यांचे हे प्रामाणिकपणे वागणे तेथील अन्य कर्मचार्‍यांना आवडत नसे. त्यामुळे त्यांचे २ मासांतच ४ – ५ ठिकाणी स्थानांतर झाले.

३. काटकसर : त्यांनी कधीच ‘स्मार्ट फोन’ वापरला नाही. ‘भ्रमणभाषचा वापर आवश्यकतेपुरताच व्हायला हवा’, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी साधाच भ्रमणभाष वापरला.

४. दैनंदिनी लिहिणे : कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली की, ते दैनंदिनीत लिहीत असत. ‘कोणत्या दिवशी काय घडले ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यांची दैनंदिनी पहिली की, लगेच समजायचे.

५. परिपूर्ण कृती करणे : त्यांनी अधिकोषाची सर्व कामे वेळेतच पूर्ण केली. अधिकोषातील कर्मचारी म्हणायचे, ‘‘एक वेळ आमचा हिशोब चुकेल; परंतु काकांचा हिशोब कधीच चुकणार नाही.’’ त्यांचे काम एवढे परिपूर्ण होते. ‘प्रतिदिन होणार्‍या व्ययाचा हिशोब जुळवणे अन् तो हिशोब लिहून ठेवणे’, हे ते नियमित करत असत.

६. शिस्तप्रिय 

अ. आमच्या एका ओळखीच्या मुलाला आबांच्या ओळखीने नोकरी लागली होती. तेव्हा तो मुलगा कार्यालयीन वेळेत आबांना पेढे देण्यासाठी घरी आला होता. तेव्हा आबांना ते आवडले नाही. आबांनी त्या मुलाला सांगितले, ‘‘काम सोडून हे महत्त्वाचे नाही.’

सौ. अभया उपाध्ये

आ. आबांचा पुतण्या एके ठिकाणी नोकरी करत होता. तो नोकरीच्या दुसर्‍याच दिवशी रुग्णाईत झाला आणि त्याने सुटी घेतली. तेव्हा आबा नेमके त्याच्या घरी काही कामानिमित्त गेले असता आबांनी त्याला घरी पाहिले. त्या वेळी ‘नवीन नोकरीत लगेचच दुसर्‍या दिवशीच सुटी घेणे योग्य नाही. कामाच्या ठिकाणी अडचण येऊ शकते, तसेच तेथील अधिकार्‍यांना पुतण्याविषयी अविश्वास निर्माण झाला असता’, या विचाराने आबा पुतण्याला समवेत घेऊन लगेचच त्याच्या नवीन कामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी तिथे पुतण्याची अडचण सांगून त्याच्यासाठी रीतसर सुटी मागितली.

७. नियोजनबद्ध दिनक्रम : त्यांना कामानिमित्त एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करावा लागत असे. तेव्हा ‘त्यांची बस चुकली आणि जाण्यास अडचण आली’, असे कधीच झाले नाही. ‘ते दूरचा प्रवास करून दमले आहेत आणि सकाळी उशिरा उठले’, असे कधी झाले नाही. ते सेवानिवृत्त झाल्यापासून पुढे ३० वर्षे नियमित पोहायला जात होते. ते प्रतिदिन रहात्या घरापासून ३ कि.मी. अंतरावरील गणपतीच्या मंदिरात जात असत.

८. अध्यात्माची आवड  : आबांनी २ वेळा पंढरपूरची पायी वारी केली होती. नंतर त्यांना वयोमानानुसार चालणे शक्य होत नव्हते. नंतर ते वारीत काही अंतर चालत जात होते. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ हाताने लिहून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी अर्पण केला होता.

९.  राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान  

९ अ. श्रीराममंदिर उभारण्यासाठीच्या आंदोलनाला अयोध्या येथे जाणे आणि पत्नीलाही कारसेवक म्हणून अयोध्येला पाठवणे : आबांना धर्माविषयी पुष्कळ प्रेम होते. वर्ष १९९२ मध्ये बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी, तसेच त्या जागी श्रीराममंदिर उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी आबांची सरकारी नोकरी असूनही ते अयोध्येला गेले होते. या प्रसंगी त्यांच्या मनात ‘माझी नोकरी गेली, तर आपल्या ३ मुलींच्या भवितव्याचे काय होईल ?’, असा जराही विचार आला नाही. त्या वेळी आबांना ७ दिवस अटक करून एका शाळेत ठेवले होते आणि नंतर त्यांना सोडून दिले. नंतर जेव्हा बाबरीचा ढाचा पाडला, त्या वेळी आबांनी आमच्या आईला कारसेवक म्हणून अयोध्येला पाठवले होते.

९ आ. वर्ष १९९३ मध्ये किल्लारी, जिल्हा लातूर येथे भूकंप झाला होता. तेव्हा आबा ८ दिवस सुटी घेऊन तेथे लोकांच्या साहाय्याला गेले होते.

९ इ. भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाज खेळाडू (‘शूटर’) अभिनव बिंद्रा यांनी प्रथमच सुवर्णपदक प्राप्त करून दिले होते. तेव्हा आबांनी अभिनव बिंद्रा यांच्या नावे १ सहस्र रुपयांची ‘मनीऑर्डर’ केली होती.

९ ई. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या प्रती आदर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी माझ्या आईला बहीण मानले आहे. आमच्या लहानपणापासूनच त्यांचे आमच्या घरात जाणे-येणे आहे. माझी आई आणि आबा पू. भिडेगुरुजी यांचे धारकरी म्हणजे साधक आहेत. पू. भिडेगुरुजी सांगली येथे आल्यावर आबांच्या घरी महाप्रसादासाठी येत असत. तेव्हा गुरुजी येणार, त्या दिवशी आबा त्यांची वाट पहात असत. आबांना त्यांच्याविषयी पुष्कळ आदर होता. ‘त्यांचा पाहुणचार व्यवस्थित होत आहे कि नाही ?’, याची आबा माझ्या आईकडून निश्चिती करून घेत असत.

१०. पत्नीप्रती कृतज्ञताभाव : आबांच्या आजारपणात माझ्या आईने (श्रीमती सुनंदा कुलकर्णी (वय ७३ वर्षे) यांनी) एकटीने त्यांची पुष्कळ चांगली सेवा केली. आबा एक वर्ष अंथरुणाला खिळून होते. त्यामुळे आईला त्यांचे सर्व करावे लागत होते. तिने त्यामध्ये कधीच सवलत घेतली नाही किंवा आळस केला नाही. आबांना याची जाणीव होती. ते म्हणायचे, ‘‘तुमच्या आईमुळे माझे आयुष्य वाढले.’’ ‘पत्नीला माझे सर्व करत असतांना त्रास होतो’, असे वाटून आबा प्रतिदिन तिला नमस्कार करायचे.

११. अपेक्षा नसणे : आबांनी त्यांच्या आजारपणाची परिस्थिती स्वीकारल्यानंतर आम्हाला ‘तुम्ही माझ्या माघारी आईला सांभाळा’, असे कधीच सांगितले नाही. ‘सरकारी नोकरी असल्यामुळे माझे निवृत्तीवेतन आईला मिळणार आहे. त्यामुळे तिला काही न्यून पडणार नाही’, असे ते म्हणायचे. स्वतःच्या आजारपणामुळे ‘आता आपण आर्थिक व्यवहार करू शकणार नाही’, असे आबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलीकडे सर्व आर्थिक व्यवहार सोपवून त्यातूनही ते मोकळे झाले.

१२. निधन

१२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या पू. भिडेगुरुजींना भेटण्यासाठी आबांच्या घरी सांगली येथे आल्यावर त्यांच्या आगमनाने आबांच्या आजारपणातील अडथळा दूर झाल्याचे जाणवणे : सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गा दौडीच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या पू. भिडेगुरुजींना भेटण्यासाठी आबांच्या घरी सांगली येथे आल्या होत्या. तेव्हा आबा अंथरुणाला खिळूनच होते. ‘त्या दोघींच्या आगमनाने आबांच्या आजारपणातील अडथळा दूर झाला असेल’, असे मला वाटले. त्यानंतर २ मासांनी आबांनी या जगाचा निरोप घेतला. ४.१.२०२४ या दिवशी त्यांनी सकाळी अंघोळ करून थोडे दूध प्यायले अन् त्यानंतर त्यांचा प्राण गेला.

१३. निधनानंतर

१३ अ. आबांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला गुरुदेवांच्याच कृपेने स्थिर रहाता आले. मी घरी सांगली येथे पोचल्यावर मला तेथील वातावरण प्रसन्न वाटत होते. ‘आबांचा मृत्यू झाला आहे’, असे वाटत नव्हते.

१३ आ. पू. भिडेगुरुजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी रहायला आल्यामुळे संतांचा सत्संग मिळणे  : आबांच्या मृत्यूनंतरच्या तिसर्‍या दिवशीच पू. भिडेगुरुजी यांची प्रकृती खालावली. त्यांना ‘सलाईन’ लावावे लागले. ते आमच्या घरी (सांगली येथे) आले. आमचे केवढे भाग्य की, या दुःखाच्या काळात आम्हाला संतांचा सत्संग मिळाला. त्यामुळे घरात दुःखाचे वातावरण वाटत नव्हते. आम्हाला पू. भिडेगुरुजी यांचा आधार वाटत होता.

१३ इ. पू. भिडेगुरुजींनी नरसोबाच्या वाडीला जाऊन पुरोहितांकडून आबांचे मृत्यूत्तर पुढील विधी करून घेणे : ‘आबांचे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म सांगलीला करायचे’, असे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे तिकडे आबांचे अस्थीविसर्जन केले. पू. भिडेगुरुजींनी नरसोबाच्या वाडीला (जिल्हा कोल्हापूर) आबांचे मृत्यूत्तर पुढील विधी करण्यासंदर्भातील नियोजन त्यांच्या धारकर्‍यांना सांगून ठेवले होते. पू. भिडेगुरुजींनी नरसोबाच्या वाडीला जाऊन तेथील पुरोहितांकडून आबांचे मृत्यूत्तर पुढील विधी करून घेतले. आम्हाला भाऊ नाही. ‘पू. भिडेगुरुजींच्या माध्यमातून आबांच्या मृत्यूनंतरचे क्रियाकर्माचे सर्व नियोजन देवानेच पार पाडून घेतले. आम्ही ठरवूनसुद्धा असे नियोजन झाले नसते’, असे मला वाटले.

१४. पू. रमानंद गौडा, सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या सेवेची संधी मिळून गुरुकृपा अनुभवता येणे : मला देवाच्या कृपेमुळे आबांच्या आजारपणात भावनाशील न होता स्थिर राहून परिस्थिती हाताळता आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये रायगड, पनवेल येथे पू. रमानंद गौडा, सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा दौरा होता. त्यांच्या निवासाची व्यवस्था माझ्या घरी होती. त्याच कालावधीत आबांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना पहाण्यासाठी मी २ दिवस सांगली येथे गेले. ‘गुरुदेवच आबांची काळजी घेणार आहेत’, असा भाव ठेवून मी संतांचा सत्संग आणि त्यांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा २ दिवसांत पनवेल, रायगड येथे आले. त्या कालावधीत आबांची प्रकृती स्थिर होती. त्या वेळी मला गुरुकृपा अनुभवता आली.’

– सौ. अभया श्रीकृष्ण उपाध्ये (कै. नारायण कुलकर्णी यांची मुलगी) कामोठे, जिल्हा रायगड. (१८.१२.२०२४)