‘मी कोल्हापूर येथे आल्यानंतर ‘मला पुष्कळ सेवा करायला मिळेल’, असे वाटले नव्हते. तेव्हा सद्गुरु स्वाती खाडये यांनी मला वारंवार त्यांच्या समवेत ठेवून विविध सेवा करायला शिकवल्या. त्यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. प्रीती
१ अ. सेवाकेंद्रात साधिकेचा वाढदिवस साजरा केल्यावर ‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी चैतन्याचा वर्षाव केला’, असे तिला जाणवणे : एकदा मी २ – ३ दिवस सेवेनिमित्त कोल्हापूर सेवाकेंद्रात राहिले होते. त्या कालावधीत माझा वाढदिवस होता. तेव्हा सद्गुरु स्वातीताई आणि साधक यांच्याकडून मला पुष्कळ प्रेम मिळाले. सद्गुरु स्वातीताईंनी माझा वाढदिवस साजरा करायला सांगितला. तेथील साधिकांनी माझे औक्षण केले. त्यांनी महाप्रसादात गोड पदार्थही बनवला आणि मला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तूही दिली. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळाला आणि कृतज्ञता वाटली. सद्गुरु स्वातीताईंनी माझ्यावर चैतन्याचा वर्षावच केला.
१ आ. सेवांचा ताण आल्यावर प्रेमाने आधार देणे : एकदा मला काही सेवांचा ताण आला होता. मी त्याविषयी सद्गुरु स्वातीताईंना सांगितले नाही. तेव्हा त्यांनी मला प्रेमाने त्याची जाणीव करून दिली. त्या वेळी ‘जणूकाही माझी आई माझ्या कल्याणासाठी सांगत आहे’, असे मला वाटले. ‘या सेवेतून मला आनंद मिळावा’, अशी सद्गुरु स्वातीताईंनाच अधिक तळमळ होती. त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली आणि मला आधार दिला.
२. साधकांना घडवणे
२ अ. सद्गुरु स्वातीताईंनी ‘माझा वेळ वाया जाऊ नये आणि माझ्याकडून समष्टी सेवा व्हावी’, यासाठी मला पुष्कळ साहाय्य केले.
२ आ. साधिकेमधील स्वभावदोष दूर होण्यासाठी तिच्याकडून प्रयत्न करून घेणे : माझ्यामध्ये ‘भावनाशीलता आणि नकारात्मक विचार करणे’, हे स्वभावदोष होते. माझ्यामधील हे स्वभावदोष दूर होण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी अत्यंत प्रेमाने माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. त्यांच्यामधील चैतन्यामुळे माझ्या मनातील सर्व अयोग्य विचार दूर झाले.
२ इ. साधकांकडून परिपूर्ण सेवा होण्यासाठी मार्गदर्शन करणे : सद्गुरु स्वातीताई ‘सर्व साधकांना चैतन्य मिळावे’, यासाठी लहान लहान उपक्रम राबवतात. त्या आम्हाला सत्संगातून दिशादर्शन करतात. तेव्हा आम्हाला सेवा करण्यासाठी शक्ती मिळते आणि आमची सेवा परिपूर्ण होते.

३. अनुभूती
३ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होणे : सद्गुरु स्वातीताईंनी कोल्हापूर सेवाकेंद्रामध्ये गणेशपूजन केले. तेव्हा सेवाकेंद्रातील वातावरण अतिशय आनंदी आणि चैतन्यदायी झाले होते. तेव्हा मला सद्गुरु स्वातीताईंमध्ये साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले.
३ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत असतांना नामजप चालू होणे : सद्गुरु ताईंच्या समवेत मला सेवेनिमित्त एके ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या समवेत चारचाकी गाडीत बसल्यानंतर माझा नामजप आतून चालू झाला. माझ्या मनात कुठलेही अन्य विचार नव्हते.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
३ इ १. सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत असतांना ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, अशी मला अनुभूती आली.
३ इ २. सद्गुरु स्वातीताईंनी सर्व साधकांसाठी एक शिबिर आयोजित केले होते. तेव्हा मला ‘व्यासपिठावर सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत साक्षात् प.पू. गुरुदेव बसले आहेत’, असे दिवसभर जाणवत होते.
३ ई. एका शिबिराच्या वेळी व्यासपिठावर सद्गुरु स्वातीताई उपस्थित असतांना मला सभागृहात नेहमीपेक्षा अधिक प्रकाश जाणवत होता.
३ उ. एका शिबिराच्या वेळी सद्गुरु स्वातीताई मार्गदर्शन करत असतांना त्यांचे बोलणे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत होते आणि त्याप्रमाणे कृती करण्यासाठी मला चैतन्यही मिळत होते.
गुरुदेव, आपल्याच कृपेने मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत राहून सेवा करण्याची संधी मिळाली. गुरुदेव, आपणच ही सूत्रे माझ्याकडून लिहून घेतली. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वैष्णवी साळोखे, कोल्हापूर (१३.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |