१. मुलांना साधनेसाठी पाठिंबा देणारे श्री. सोनराज सिंह !
१ अ. साधना आणि सेवा : ‘माझे वडील (श्री. सोनराज सिंह) गेल्या १२ वर्षांपासून साधनेत आहेत. ते सेतु निगमच्या सरकारी विभागात अभियंता आहेत. ते उरलेल्या वेळेत ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करतात, तसेच धर्मप्रसार आदी सेवा करतात.
१ आ. वडिलांनी जाणलेले व्यावहारिक शिक्षणापेक्षा साधनेचे महत्त्व : वडिलांना माझ्याकडून शिक्षणासंदर्भात काही अपेक्षा नाहीत. मला दहावीत ७२ टक्के आणि बारावीत ५३ टक्के गुण मिळाले, तरीही माझ्या वडिलांनी काही म्हटले नाही. ते म्हणाले, ‘‘अध्यात्मात या शिक्षणाला काही अर्थ नाही; म्हणून तू अध्यात्मात पुढे जाण्यासाठी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न कर. आता तुला सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळे मिळाले आहे. यासाठी तू प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ रहा.’’
१ इ. नातेवाइकांनी विरोध करूनही वडिलांनी मुलीला पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणे : वडिलांना ‘ते स्वतः, पत्नी आणि मुले यांनी पूर्णवेळ साधक व्हावे’, असे वाटते; परंतु वडिलांवर कुटुंबाचे दायित्व असल्याने ते शक्य नाही. ते मला आणि माझ्या लहान भावाला साधनेत संपूर्ण सहकार्य करतात. मी पूर्णवेळ साधिका झाल्यावर आई-वडिलांना कुटुंबातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला, तरी त्यांनी प्रत्येक क्षणी मला साथ दिली. वडिलांनी माझ्यावर कधीच बळजोरी केली नाही. ते मला योग्य-अयोग्य समजावून सांगतात. नंतर ते मला सांगतात, ‘‘तू निर्णय घेऊ शकतेस.’’ माझ्या मनात नकारात्मक विचार आल्यास वडील मला समजावून सांगतात.
१ ई. नातेवाइकांकडील कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आश्रमात रहावेसे वाटत असतांना वडिलांनी नातेवाइकांना समजावणे : मी गेल्या वर्षी आश्रमात आल्यानंतर काही दिवसांनी माझ्या मामाचे लग्न होते. त्या वेळी माझे नातेवाईक मला बोलावत होते; परंतु मला सेवा सोडून जाणे योग्य वाटत नव्हते. त्या वेळी मी वडिलांना सांगितले, ‘‘मी येत नाही.’’ त्या वेळी वडील मला म्हणाले, ‘‘ठीक आहे. तुला यावेसे वाटत नाही, तर काही हरकत नाही. तू साधनेकडे लक्ष दे. मी घरातील व्यक्तींशी बोलतो.’’
काही मासांपूर्वी माझ्या मोठ्या काकांकडे गृहप्रवेश आणि काही दिवसांनंतर एका नातेवाइकाचा साखरपुडा होता. त्या वेळीही नातेवाईक मला बोलावत होते. तेव्हा मला वाटले, ‘मी आता जाण्यापेक्षा विवाहाच्या वेळी गेले, तर अधिक चांगले होईल.’ माझ्या वडिलांना माझा हा विचार योग्य वाटला आणि त्यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वडील सर्वकाही सांभाळून घेतात.
१ उ. पूर्णवेळ साधना आणि शिक्षण यासंदर्भात मुलावर कधीच स्वतःची इच्छा न लादणे : वाराणसी आश्रमात युवकांसाठी झालेल्या शिबिरात माझा धाकटा भाऊ सौम्येंद्र सहभागी झाला होता. तेथील युवा साधकांचे अनुभव ऐकल्यानंतर सौम्येंद्रला पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा झाली. त्याने वडिलांना त्या संदर्भात विचारल्यावर वडिलांनी त्वरित सांगितले, ‘‘ठीक आहे. तुझी इच्छा आहे, तर तू आश्रमात राहू शकतोस.’’ नंतर सौम्येंद्र एक मास आश्रमात राहिला. नंतर त्याला पुन्हा शिक्षण घेण्याची इच्छा झाल्यावर तो घरी आला. तेव्हाही वडिलांनी त्याच्यावर कसलीही बळजोरी केली नाही.
जुलै मासात त्याला वडिलांनी सांगितले, ‘‘जयाताई रामनाथी आश्रमात जाणार आहे. तुला जायचे आहे का ?’’ तेव्हा तो रामनाथी आश्रमात जाण्यासाठी सिद्ध झाला.
१ ऊ. रामनाथी आश्रमात राहिल्यावर मुलाने ‘पूर्णवेळ साधना करायची आहे’, असे सांगितल्यावर चांगले वाटणे : सौम्येंद्र रामनाथी आश्रमात आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या शिक्षकांनी वडिलांना भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्ही मुलाचे भविष्य का बिघडवता ? तुम्हाला मुलाला शिक्षण द्यायचे आहे कि नाही ?’’ त्या वेळी वडिलांनी सौम्येंद्रला विचारले, ‘‘तुझी काय इच्छा आहे ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आता मला साधनाच करायची आहे. तुम्ही शिक्षकांना माझे नाव शाळेतून काढून टाकायला सांगा.’’ त्याचा निर्णय ऐकून वडिलांना बरे वाटले.
२. यजमानांना साथ देणार्या सौ. साधना सिंह !
२ अ. आश्रमात रहायला जातांना सर्व साहित्य समवेत देणे आणि मुलगी आश्रमात रहात असतांना अल्प वेळा भ्रमणभाष करणे : आई मला साधनेत पुष्कळ साहाय्य करते. ती मला सांगते, ‘‘वडिलांनी जसे सांगितले आहे आणि प.पू. गुरुदेवांची जशी इच्छा असेल, तसेच कर.’’ आम्ही लहानपणापासून कधीच आईपासून दूर राहिलो नव्हतो, तरीही आईने मला २ – ३ मासांसाठी (महिन्यांसाठी) आश्रमात पाठवले. मी आश्रमात रहायला गेल्यानंतर मला लागू शकणारे सर्व साहित्य तिने माझ्या समवेत पाठवले. मी आश्रमात आल्यानंतर ती मला अल्प वेळा भ्रमणभाष करते. त्या वेळी ती ५ ते ७ मिनिटेच माझ्याशी बोलते. तिला वाटते, ‘माझी सेवा आणि साधना यांत काही अडचण येऊ नये.’ मी आश्रमात पूर्णवेळ साधना करू इच्छित असतांना आईने मला संपूर्ण साहाय्य केले.
२ आ. आश्रमजीवनाविषयी सकारात्मक असणे आणि प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा असणे : आईला आश्रमाविषयी फारशी माहिती नाही; तरीही तिचा मला आश्रमात पाठवायला होकार असतो. तिच्या मनात आश्रमाविषयी वेगळे विचार येत नाहीत. ती मला म्हणते, ‘‘तू प.पू. गुरुदेवांच्या चरणी असल्यामुळे मला काळजी नाही. मी निश्चिंत आहे.’’
आम्हाला (मला आणि माझ्या लहान भावाला) साधना करायला प्रोत्साहन देणारे आई-वडील लाभल्यामुळे प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’
– कु. जया सिंह (वय १७ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), वाराणसी (२७.९.२०१८)