प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे, तसेच ऑस्ट्रेलियाचा १० टक्के भूभाग पाण्याखाली जाईल !

  • जागतिक तापमानवाढीच्या (‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या) परिणामाविषयी पर्यावरण शास्त्रज्ञांची चेतावणी

  • पूर्वी उष्णतेत ५० वर्षांतून एकदा वाढ होत होती, ती आता प्रत्येक वर्षी होत आहे !

विज्ञानाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम ! पूर्वजांनी ज्या पृथ्वीचे लाखो वर्षे जतन केले, त्या पृथ्वीला विज्ञानाने काही वर्षांत विनाशाप्रत घेऊन जाण्याची व्यवस्था करून ठेवली ! – संपादक

नवी देहली – सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांतील असतील. यांसह ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका येथील १० टक्के भूभागही समुद्राच्या पाण्याखाली जाईल. तसेच बेट असलेले अनेक देशही नष्ट होतील, अशी चेतावणी पर्यावरण शास्त्रज्ञांनी एका अहवालातून दिली आहे. ‘पूर्वी ५० वर्षांतून एकदा उष्णतेत वाढ होत होती, ती आता प्रत्येक वर्षी होत आहे. ही परिस्थिती पृथ्वीची उष्णता वाढत असल्याचे द्योतक आहे’, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१. ‘क्लायमेट कंट्रोल’ या संकेतस्थळावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांतील लोकसंख्या अधिक आहे. तसेच हे देश कोळशावर आधारित उद्योग उभारण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा (‘ग्लोबल वार्मिंग’चा) सर्वाधिक फटका या देशांना बसणार आहे.

२. जगातील जे देश ‘हाय-टाईड’ प्रदेशात (उच्च समुद्री पातळी असलेल्या प्रदेशात) येतात, तेथील समुद्राची पातळी वाढल्यामुळे जगातील १५ टक्के लोकसंख्येवर त्याचा परिणाम होईल. या अभ्यासाप्रमाणे जगातील १८४ ठिकाणांवर समुद्राच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम होईल.

३. या अभ्यासाप्रमाणे पुढील २०० वर्षांपासून २ सहस्र वर्षांमध्ये पृथ्वीचा नकाशा पालटलेला असेल. जर जागतिक तापमान हे १.५ डिग्रीपासून ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले, तर हिमनद्या वितळतील. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून जगातील मोठा भाग पाण्याखाली जाईल.

४. अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने ‘सी लेव्हल प्रोजेक्शन टूल’ (समुद्राच्या पातळीचा भविष्यातील अंदाज घेणारे यंत्र) बनवले आहे. वरील अहवालाच्या काही मास आधी आलेल्या ‘इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या (‘आयपीसीसी’च्या) एका अहवालाप्रमाणे वर्ष २१०० पर्यंत जगाला प्रचंड उष्णता सहन करावी लागेल आणि तापमानामध्ये ४.४ डिग्री सेल्सिअसची वाढ होईल. पुढील २ दशकांमध्येच तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढेल. त्यामुळे हिमनद्या वितळतील.

५. ‘आयपीसीसी’ प्रत्येक ५ ते ७ वर्षांमध्ये जगातील पर्यावरणाच्या स्थितीचा अहवाल देत असते. भारतातील १२ शहरे वर्ष २१०० पर्यंत अर्धा फुटापासून पाऊणे तीन फुटांपर्यंत पाण्याखाली जातील. याचा सर्वाधिक धोका गुजरातमधील भावनगर, गोव्यातील मारमागोवा आणि केरळमधील कोची या शहरांना आहे. त्यानंतर ओखा (गुजरात), तुतीकोरिन (तमिळनाडू), पारादीप (ओडिशा), मुंबई (महाराष्ट्र), मंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तमिळनाडू) आणि विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) यांना धोका आहे. समुद्रकिनारी असलेल्या या शहरांमध्ये बंदरे आणि व्यापारी केंद्रे आहेत. तसेच येथे मासेमारी आणि तेल यांचा व्यापारही होतो. त्यामुळे समुद्राची पातळी वाढल्यास आर्थिक स्थितीवरही परिणाम होईल.

६. ‘जर आम्ही प्रदूषणावर नियंत्रण ठेवले नाही, तर प्रचंड उष्णता, वाढते तापमान आणि लहरी निसर्ग यांच्याशी आपल्याला लढावे लागेल. या अहवालाचे प्रमुख लेखक आणि ऑक्सफोर्ड विद्यापिठाचे शास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो यांनी सांगितले की, जागतिक तापमानवाढ ही भविष्यातील चिंता नाही, तर आजची अडचण आहे. हे जगाच्या कानाकोपर्‍यावर परिणाम करत आहे. अशाच प्रकारे पर्यावरण राहिले, तर भविष्यात याहून भयानक स्थिती उद्भवेल.