वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याच्या प्रकरणी तेलंगाणातील विद्यमान खासदार मलोत कविता यांना दंड आणि ६ मासाचा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे. निवडणुका आल्या की, मतदारांना पैसे वाटणे, तसेच मद्य आणि वस्तू फुकट देणे हे प्रकार सर्रास होतात. लोकप्रतिनिधी स्वत: तर भ्रष्टाचार करतातच, तसेच जनतेलाही तो करायला लावतात, हेच एक प्रकारे अशा घटनांमधून लक्षात येते. देशातील बहुतांश समस्यांचे कारण असलेला भ्रष्टाचार का संपत नाही ? याचे उत्तर पैसे वाटणारे लोकप्रतिनिधी आणि ते घेणारे नागरिक यांच्याकडे मिळू शकते. लोकप्रतिनिधी हे राष्ट्राचे सेवक असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा असेल, तरच ते देशाचे भले करू शकतात. दुसरीकडे समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने ते आपापल्या भागांत शासनकर्तेही असतात. अशांना निवडून येतांना पैसे वाटण्याची आवश्यकता का निर्माण होते ? ते जनतेमध्ये स्वत:प्रती विश्वास का निर्माण करू शकत नाहीत ? याला लोकप्रतिनिधी आणि जनता दोघेही कारणीभूत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. यावरून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या निष्ठा पैसा अन् स्वार्थ यांच्याशी आहेत, हेच लक्षात येते. आज राष्ट्रनिष्ठेची उदाहरणे अभावानेच आढळतात.
स्वामीनिष्ठा म्हटले की, नाव आठवते ते बाजीप्रभु देशपांडे यांचे ! ते हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. एक प्रकारे बाजीप्रभु यांची स्वामीनिष्ठा ही राष्ट्रनिष्ठाच होती. त्याकाळी ना छत्रपतींनी कुणाला पैसे वाटले, ना कुणा मावळ्याने पैसे अथवा आमीष यांची लालसा धरली. हे शिवधनुष्य पेलले होते, ते केवळ आणि केवळ राष्ट्र-धर्मप्रेमाच्या बळावर ! म्हणूनच ते लीलया पेलले गेले. नि:स्वार्थ, प्रामाणिकपणा आणि त्याग यांच्या जोरावर मावळ्यांनी राष्ट्र-धर्माशी नाळ जोडली, प्रसंगी प्राणही दिले. याचे मोल जाणणार्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून एक प्रकारे मावळ्यांचे बलीदान सार्थक केले.
आज आपला देश उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे नेतृत्व आणि मावळ्यांसारखी जनता असणे आवश्यक आहे. असे नेतृत्व आणि जनता मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, हे निश्चित !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे