झारखंडमधील आघाडी सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद असे आमीष दाखवण्यात आले होते ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

देशात सरकार पाडण्यासाठी आणि बनवण्यासाठी सर्वपक्षांकडून आमदारांचा घोडेबाजार होतो, हे आता नवीन राहिलेले नाही ! अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी

रांची (झारखंड) – झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असा दावा काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता’, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. यानंतर कोंगारी यांनी हा गौप्यस्फोट केला. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार पाडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केला, याविषयी मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही.

कोंगारी यांनी सांगितले, ‘हे ३ जण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून माझ्या संपर्कात आले.  काही आस्थापनांसाठी काम करत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. मी त्या तिघांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला; पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने माझ्या संपर्कात यायचे. एकदा तर त्यांनी मला १ कोटी रुपये रोख देण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव आल्यानंतर लगेच पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आर्.पी.एन्. सिंह यांच्या कानावर ही गोष्ट घातली. याविषयी मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती.’