घोर आपत्काळातून तरून जाण्यासाठी समाजाला दिशादर्शन करणारा ‘सनातन प्रभात’ एकमेवाद्वितीय ! – चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह

‘२३ मे २०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीचा २२ वा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने मी वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे. आपल्या सर्वांमुळे ‘सनातन प्रभात’ गेली २२ वर्षे अखंड कार्यरत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे दळणवळण बंदी आहे. त्यामुळे आपल्याला ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन साजरा करावा लागत आहे. तरीही ‘सनातन प्रभात’वर असलेल्या प्रेमामुळेच आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो.

१. ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आदी साधक होणे, हेच ‘सनातन प्रभात’चे यश !

‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनेक वाचक आणि हितचिंतक यांनी त्यांचे अभिप्राय आम्हाला कळवले आहेत. एका वाचकाने कळवले, ‘हिंदु धर्माच्या रक्षणासाठी देवाने दिलेले एकमेव वृत्तपत्र ‘सनातन प्रभात’ !’ एका वाचकाने अभिप्राय दिला आहे की, ‘परमेश्वरानंतर पृथ्वीवरील प्रत्येक घटनेकडे ‘सनातन प्रभात’चेच लक्ष आहे !’ असे अभिप्राय ऐकले की, ‘सनातन प्रभात’ ज्या उदात्त ध्येयाने चालू झाले, ते ध्येय साकार होत आहे’, याची निश्चिती पटते. आज ‘सनातन प्रभात’ आणि वाचक यांच्यात एक कुटुंबभावना निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबावर संकट आले की, आपण सर्वजण कुटुंब आणि कर्तव्य भावनेने त्या संकटाचा सामना करत असतो. सनातनवरील अनेक संकटांच्या काळात वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांनी कुटुंब भावनेने आलेल्या संकटांशी सामना करण्यासाठी साहाय्य केले. ‘असा लोभ आमच्यावर कायम ठेवावा’, अशी आपल्याला प्रार्थना करतो.

श्री. चेतन राजहंस

आज कोरोनाच्या संकटकाळात वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद पडल्या आहेत. अनेक जण हानी सोसूनही वृत्तपत्रे चालवत आहेत. पुढे ती किती काळ चालतील, याची शाश्वती नाही. अनेक पत्रकारांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. मुद्रणालये बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. दैनिक चालवण्यासाठी विज्ञापने मिळणे कठीण झाले आहे; कारण देशात आर्थिक स्थिती कठीण आणि मंदीची आहे. उद्योजक आणि व्यापारी यांचा व्यापारच होत नसल्याने त्यांनी हात आखडते घेतले आहेत. अशा काळात दैनिक ‘सनातन प्रभात’चे विज्ञापनदाते राष्ट्र आणि धर्म निष्ठेने साधना म्हणून दैनिकाला आजही उत्साहाने विज्ञापने देत आहेत, हे मी येथे विशेषकरून नमूद करतो. असा विचार आणि त्याग केवळ साधनेमुळेच शक्य होतो. त्यामुळेच आम्ही म्हणत आहोत की, आमचे सर्व वाचक आणि विज्ञापनदाते आता साधक झाले आहेत. ‘सनातन प्रभात’ने हे ऐतिहासिक आध्यात्मिक कार्य केले आहे’, असे आम्ही मानतो.

२. हिंदु राष्ट्रासाठी जनतेची सिद्धता करणे !

आम्हीही कुटुंब भावनेने आपल्या सर्वांना आध्यात्मिक स्तरावरील कोणते उपाय करावेत ? कोणता नामजप करावा ? मनाची स्थिती सकारात्मक रहाण्यासाठी स्वयंसूचना कशा घ्याव्यात ? हे सांगितले. आम्ही कोरोनासारख्या भयंकर आजारातून बरे झालेल्या अनेक साधकांचे अनुभव आणि अनुभतीही प्रकाशित केल्या. भगवंताच्या अनुसंधानात राहून प्रयत्न केल्यावर परिस्थितीवर मात करता येते. याविषयी वाचकांना दिशा देण्याचा आमचा तो प्रयत्न होता. कोरोनाच्या काळात भारतात सर्वत्र व्यवस्था कोलमडतांना पहात आहोत. रेमडेसिविरचा तुटवडा असो, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू असो, रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णांचे मृतदेह मिळण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची होत असलेली परवड असो आदी सर्व गोष्टींवर सर्व वृत्तपत्रे प्रकाश टाकतच आहेत. ‘सनातन प्रभात’मध्येही अशी वृत्ते येत आहेत; मात्र यात भेद आहे. ‘सनातन प्रभात’ निवळ बातम्या देण्याऐवजी कोरोनाच्या काळात देशात अराजकसदृश स्थिती का निर्माण झाली ? व्यवस्था किंवा यंत्रणा कुचकामी का ठरत आहेत, यांविषयी विविध संपादकीय दृष्टीकोन देऊन किंवा सदरे चालू ठेवून लोकांना चिंतन करण्यास प्रवृत्त करत आहे; कारण हिंदु राष्ट्राचा जो विचार आहे, तो आदर्श रामराज्याचा आहे. त्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन करायचे असेल, तर त्याविषयी आतापासून चिंतन केले पाहिजे आणि आदर्श राज्याचा जो विचार आहे, तो मनावर बिंबवला पाहिजे.

३. परशुरामभूमी गोव्याच्या उत्कर्षासाठी ‘सनातन प्रभात’ नेहमीच कार्यरत राहील !

‘लव्ह जिहाद’, दंगली, धर्मांधांच्या कारवाया, हिंदूंचे धर्मांतर आणि हिंदु धर्मावर विविध माध्यमांद्वारे होणारे आघात यांविषयी ‘सनातन प्रभात’मध्ये परखडपणे विचार मांडलेलेच आहेत आणि त्या माध्यमातून हिंदूंची जागृती केलीलीच आहे. गोव्याच्या संदर्भात सांगायचे, तर बाह्य जग गोव्याकडे ‘मौजमजेचे ठिकाण’ म्हणून पहाते. ‘सनातन प्रभात’च्या दृष्टीने गोवा ही गोमंतभूमी, म्हणजे परशुरामभूमी आहे. तिला समृद्ध असा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. येथील हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’ राबवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही हिंदूंनी सर्व प्रकारच्या यातना सहन करून येथील संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा टिकवून ठेवला.

येथून पोर्तुगीज गेले; मात्र त्यांचे वंशज आजही या भूमीत आहेत आणि या भूमीचे ख्रिस्तीकरण करण्याचे एवढेच काय, तर ही भूमी भारतापासून तोडण्याचे दिवास्वप्न पहात आहेत. अशांचा समाचार ‘सनातन प्रभात’ने सातत्याने घेतला, मध्यंतरी काही पोर्तुगिजधार्जिण्यांनी गोव्याला भारतापासून विभक्त करण्यासाठी एक ‘ऑनलाईन’ मोहीम हाती घेतली होती. वाचकांनी या संदर्भातील बातम्या दैनिकातून वाचल्या असतीलच. या देशविघातक कारवायांच्या संदर्भात ‘सनातन प्रभात’ने परखडपणे लिखाण केले आणि समाजामध्ये एक राष्ट्रीय भावना जागृत केली. आम्ही गोमंतकाच्या समृद्ध मंदिरांविषयी लिहिले, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर संस्कृती आणि सागर संस्कृती यांचा गौरव वाढवला. आजच्या या कार्यक्रमातून मी एवढेच सांगू इच्छितो की, या देवभूमी परशुरामभूमीच्या उत्कर्षासाठी ‘सनातन प्रभात’ नेहमीच कार्यरत राहील !

४. आपत्काळातही दिशादर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ !

सध्या जगात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धाची चर्चा आहे. सध्या युद्धविराम झाला असला, तरी त्याचे तिसर्‍या महायुद्धात रूपांतर होणार का ? याची जगभर चर्चा चालू आहे. अनेक द्रष्ट्या संतांनी, तर सांगितले आहे की, येणारा काळ हा तिसर्‍या महायुद्धाचा असणार आहे आणि हे युद्ध अती महाभयंकर असेल. ‘सनातन प्रभात’ या भीषण काळात स्वत:चे रक्षण कसे करायचे, याविषयी मार्गदर्शन करत आहे. आपत्काळात ॲलोपॅथी औषधांचा तुटवडा होईल. त्यामुळे आयुर्वेदाची औषधे मिळण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करावी लागेल.

अशा कितीतरी गोष्टी ‘सनातन प्रभात’ने पूर्वीच स्पष्टपणे सांगितल्या आहेत आणि वाचकांना सतर्क केले आहे. संतांनी केलेल्या भविष्यकथनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकांच्या जीवितांचे रक्षण कसे करता येईल, यासाठी ‘सनातन प्रभात’ने प्रायोगिकरित्या सांगितले आणि पुढेही सांगत रहाणार आहे. ‘सनातन प्रभात’ हे केवळ बातम्या देणारे दैनिक नाही, तर जनतेच्या रक्षणासाठी कटीबद्ध असलेले दैनिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा.

५. नकारात्मक स्पंदनांचा वाचकांना त्रास होऊ नये, यासाठी ‘सनातन प्रभात’च्या पानांना नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ करणे

एखाद्या दैनिकाच्या पृष्ठांवर देवतांच्या नामजपाचे मंडल घातल्याचे आपण कधी पाहिले आहे का ? ‘सनातन प्रभात’मध्ये ही अभिनव पद्धत चालू करण्यात आली. हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार, दंगली अशा रज-तमात्मक बातम्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. या नकारात्मक स्पंदनांचा वाचकांना त्रास होऊ नये, यासाठी ८ ऑक्टोबर २०२० पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सर्व पानांवर भगवान श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ केला. ‘वाचकांचे आध्यात्मिक स्तरावर, तसेच नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण व्हावे’, अशी ही उद्दात्त शिकवण आमचे परात्पर गुरुदेव आणि ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आहे.  यासाठी त्यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत.

६. विविध सामाजिक माध्यमांतून ‘सनातन प्रभात’चा होत असलेला प्रसार !

आम्हाला इथे सांगण्यास आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधील बातम्या, लेख आणि अन्य वाचनीय माहिती ‘डेली हंट’ या भारतभरात प्रसिद्ध असलेल्या ‘न्यूज ॲप’द्वारेही आता प्रसारित होत आहे. यामुळे ‘सनातन प्रभात’ आता ‘डेली हंट’च्या माध्यमातून जगभर पोचत आहे. ‘डेली हंट’वर ‘सनातन प्रभात’चे मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत ४ ‘अकाऊंट’ आहेत आणि त्याचे १० सहस्रांहून अधिक ‘फॉलोअर्स’ झालेले आहेत. प्रत्येक मासाला १० लाखांहून अधिक वेळा ‘सनातन प्रभात’चे लेख आणि बातम्या वाचल्या जात आहेत. यानिमित्त मी सांगू इच्छितो की, आमचे ‘टेलीग्राम चॅनल’, ‘इन्स्टाग्राम अकाऊंट’ आणि ‘ट्विटर अकाऊंट’ आहे. यांद्वारेही आम्ही राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी जागृती करत आहोत. ‘सनातन प्रभात’ने आता ‘व्हिडिओज्’च्या माध्यमातूनही धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य आरंभले आहे. धर्मवीर संभाजी महाराज बलीदानदिन, गुढीपाडवा, श्रीरामनवमी आदी विषयांवर आपण ‘व्हिडिओ’ बनवले असून येणार्‍या काळात अन्य विषयांवरही ‘व्हिडिओ’ बनवण्याचा ‘सनातन प्रभात’चा मानस आहे. या ‘व्हिडिओज्’ना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सामाजिक माध्यमांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. येणार्‍या काळात कोट्यवधी हिंदूंपर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार पोचण्यासाठी ‘सनातन प्रभात’ ‘सोशल मिडिया’च्या माध्यमांतून कार्यरत आणि प्रयत्नशील राहील.

आपल्या सर्वांना मी एक छोटेसे आवाहन करू इच्छितो की, आपण ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि सोशल मिडियाच्या माध्यमातूनही ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा.

– श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह. – श्री. चेतन राजहंस, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह.