हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

नेहमी गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येण्याची माहिती केवळ गोरक्षकांनाच का मिळते ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा.

कत्तलीसाठी पकडण्यात आलेले आणि दाटीवाटीने ट्रकमध्ये भरून ठेवलेले गोवंश

नंदूरबार, ८ जुलै (वार्ता.) – गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी धाडसाने ५० किलोमीटर पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारा ट्रक अडवून २१ गोवंशियांना जीवदान दिले. या प्रकरणी विसरवाडी पोलिसांनी शेख मोबीन शेख उस्मान, रिजवान खान इब्राहिम खान, साजीद अहमद रियाज अहमद, मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद रफीक यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २१ गोवंश, ट्रक असा ११ लाख ६५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (२१ गोवंशियांचे रक्षण करणारी हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

या प्रकरणी अटक केलेल्या धर्मांधांवर प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यात प्रतिबंधक अधिनियम क्रमांक १ (घ), (ड), (च) सहप्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (२०१५ चे सुधारणेसह) कलम ५ ५ (अ), ५ (ब), ९, ९ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, गोरक्षक भूषण पाटील, विशाल जयस्वाल, मयुर चौधरी, सुमित परदेशी, नीलेश राजपूत यांनी प्राण धोक्यात घालून या गोवंशियांची सुटका केली.

या संदर्भात अधिक माहिती देतांना हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या या ट्रकचा पाठलाग करून हा ट्रक पकडला. ट्रकचा पाठलाग होऊ नये म्हणून ट्रकमधील धर्मांध आमच्यावर सातत्याने मिरचीपूड फेकत होते. तरीही चिकाटीने आम्ही त्यांना गाठून गोवंशियांना वाचवले. यातील गोवंश आता अरिहंत गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळाले.’’

या ट्रकमध्ये गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबण्यात आले होते. यात त्यांना जखडून बांधून ठेवण्यात आले होते. यामुळे या गोवंशांची स्थिती इतकी खराब होती की, त्यांना काही काळ उभेही रहाता येत नव्हते.