४ जुलै २०२१ या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने…
एके काळी ‘विश्वगुरु’ असलेली ही भारतभूमी आज चोहोबाजूंनी संकटात आहे. या मातृतुल्य भूमीला पुनः ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद ही अधिवक्त्यांची संघटना गेली ९ वर्षे कार्यरत आहे. धर्माच्या बाजूने असलेली हिंदु विधीज्ञ परिषद म्हणजे आगामी हिंदु राष्ट्रातील आदर्श न्यायव्यवस्थेचा पाया आहे आणि ती त्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा या हिंदु विधीज्ञ परिषदेविषयी विविध माननीय अधिवक्त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय येथे देत आहोत.
कायद्याच्या पळवाटा शोधून भ्रष्टाचार करणार्यांना हिंदु विधीज्ञ परिषदेने धडा शिकवला ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई
एक ‘अधिवक्ता’ म्हणून काम करत असतांना ‘समाजाचेही आपण देणे लागतो’, या उद्देशाने अनेक अधिवक्त्यांनी एकत्र येऊन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मागील ९ वर्षांत अनेक वेगवेगळ्या विषयांवर काम केले आहे. कायद्याच्या पळवाटा शोधून भ्रष्टाचार करणार्या अनेकांना हिंदु विधीज्ञ परिषदेने कायदेशीर मार्गाने धडा शिकवला आहे. अनेक राज्यांतील अधिवक्ता या परिषदेच्या कार्याशी जोडले जात असून परिषदेचे कार्य वाढत आहे.
हिंदुत्वासाठी जो कार्य करील, त्यांच्या पाठीशी हिंदु विधीज्ञ परिषद ! – अधिवक्ता समीर पटवर्धन, सांगली
कोणत्याही हिंदुत्वनिष्ठाने हिंदुत्वाचे कार्य करतांना ‘मी एकटा आहे’, असे समजू नये. हिंदुत्वासाठी जो कुणी कार्य करील, तसेच खोटे आरोप ठेवून छळल्या जाणार्या निरपराध हिंदूंच्या पाठीशी हिंदु विधीज्ञ परिषद आठवड्यातील ७ दिवस आणि २४ घंटे विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे.
भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी समस्त अधिवक्त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून निश्चयाने कार्य करावे ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
हिंदु धर्म आणि सनातन संस्कृती यांच्या रक्षणासाठी ईश्वराच्या प्रेरणेने कार्य करणारी हिंदु विधीज्ञ परिषद हे अधिवक्त्यांचे एक संघटन आहे. सतत व्यस्त असलेले अधिवक्ता ईश्वराच्या कार्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कार्यरत आहेत. सद्यःस्थितीत असे संघटन आवश्यक आहे. मी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ‘या संकटाच्या वेळेत सर्व अधिवक्त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून एकत्र येऊन जगामध्ये भारताला विश्वगुरूपात स्थापित करावे’, अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य अधिक दृढतेने करून त्याचे फळ ईश्वरावर सोडावे.
हिंदु विधीज्ञ परिषद देशासाठी कार्य करण्यास उद्युक्त करणारी एकमेव संघटना ! – अधिवक्ता गोविंद भरतन्, केरळ
मी अनेक अधिवक्ता संघटना पाहिल्या; मात्र देशासाठी कार्य करायला उद्युक्त करणारी हिंदु विधीज्ञ परिषद ही एकमेव संघटना आहे. ‘देशाने मला काय द्यावे’, यापेक्षा ‘मी देशासाठी काय करू शकतो’, याच दृष्टीने नेहमी आपला विचार हवा. हिंदु विधीज्ञ परिषद नेहमी देशासाठी कार्य करण्यास शिकवते. हिंदु विधीज्ञ परिषदेच कार्यकर्ते संख्येने अल्प असले, तरी जे आहेत ते गुणवत्तापूर्ण आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या विविध कार्यक्रमांमध्ये मी अनेक वेळा ‘भारताच्या राज्यघटनेतील त्रुटी’ हा विषय मांडला आहे. भारताची घटना ही जगातील सर्वांत चांगली घटना आहे; मात्र त्यात ‘अध्यात्म’ विषय नाही. त्यामुळे त्यात समर्पकता नाही. या विषयावर जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा ‘घटनेत योग्य ते पालट व्हायला हवेत’, असा माझा दृष्टीकोन असतो. उदाहरणच द्यायचे, तर भारतीय न्यायव्यवस्था अशी आहे की, त्याच्या पुढे आपण कुणाकडेही दाद मागू शकत नाही. कलम १४१ आणि १४२ प्रमाणे सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आपण दाद मागू शकत नाही. न्यायव्यवस्थेत पुष्कळ त्रुटी आहेत. हिंदु विधीज्ञ परिषदेसारखी संघटनाच केवळ अशा प्रश्नांना योग्य रितीने हाताळू शकते. हिंदु विधीज्ञ परिषद ही राष्ट्रासाठी समर्पित असलेली संघटना असल्याने ते यात निश्चित यशस्वी होतील. त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा ! ‘ते मलाही त्यांच्या कार्यात सहभागी करून घेतील’, अशी आशा मी व्यक्त करतो. या कार्यासाठी छोटेसे योगदान देण्यासाठी मला नेहमीच आनंद वाटेल !
हिंदु विधीज्ञ परिषद देश आणि समाज यांसाठी महत्त्वपूर्ण संघटना ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस, देहली
हिंदु विधीज्ञ परिषदेने गेल्या ९ वर्षांत हिंदु समाजासाठी भरपूर कार्य केले आहे. मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, तसेच धर्मरक्षण-जागृती कार्यात परिषदेने प्राधान्याने कार्य केले आहे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यासह अनेकांनी त्यांचे पूर्ण आयुष्य वकिली क्षेत्रासाठी दिले आहे. पंढरपूर येथील मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा असो, माहिती अधिकाराचा योग्य उपयोग करून पशूवधगृह बंद करणे, जिहाद्यांच्या विरोधात ठोस कृती करणे, तसेच धर्माभिमान्यांवर होणार्या आक्रमणाच्या सूत्रावर आवाज उठवणे यांसह अनेक सूत्रांवर हिंदु विधीज्ञ परिषदेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. हिंदु विधीज्ञ परिषद देश आणि समाज यांसाठी महत्त्वपूर्ण संघटना आहे. भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून हे कार्य पुढे नेण्यासाठी शक्ती मिळो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !