राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ‘ईडी’कडून जप्तीची कारवाई !

सातारा, २ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्रकुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या अधिकोषातून अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर परत न करता बुडवले आहे. तसेच नंतर अल्प मूल्यांमध्ये साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. याविषयी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


अल्प दरात लिलाव झाल्याने कारवाई !

‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटी रुपयांची भूमी, इमारत आणि यंत्रसामग्री यांवर जप्ती आणण्यात आली आहे’, अशी माहिती ‘ईडी’च्या सूत्राकडून देण्यात आली. जरंडेश्वर सहकारी कारखाना वर्ष २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता, तेव्हा समर्पित किमतीपेक्षा अल्प दराने या कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ‘ईडी’ला चौकशीत आढळले होते.

जरंडेश्वर कारखाना कह्यात घेण्यासाठी ‘गुरु कमॉडिटी’ या बेनामी आस्थापनाचा वापर करण्यात आला होता. या आस्थापनाने हा कारखाना लगेचच ‘जरंडेश्वर शुगर्स’ या आस्थापनाला भाडेतत्त्वावर दिला होता. या आस्थापनात ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या आस्थापनाचा मोठा हिस्सा आहे. ‘स्पार्क लिंग’ हे आस्थापन अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

या कारखान्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे ‘ईडी’ला आढळून आले आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या कह्यात घेतला होता.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आस्थापनाने अल्प दरात खरेदी केलेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी’, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.