फूटबॉल विश्वात क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. रोनाल्डो यांनी ‘युरो कप २०२० टूर्नामेंट’च्या प्रारंभी झालेल्या पत्रकार परिषदेत ‘कोका कोला’च्या २ बाटल्या ‘डेस्क’वरून बाजूला सारत पाणी पिण्याचा सल्ला दिला. शीतपेय न पिण्याच्या या सल्ल्याने ‘कोका कोला’ची ४ बिलियन डॉलर्सची (२९ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक) हानी झाली आहे. रोनाल्डो यांनी पैशांच्या दबावाखाली न येता निर्भयपणे शीतपेयाला बाजूला सारण्याचे धाडस दाखवले. यावर अनेकांनी सामाजिक माध्यमातून रोनाल्डो यांची पाठ थोपटली. यातून रोनाल्डो यांची सामाजिक जाण ठळकपणे दिसून आली. अशा प्रकारचे धाडस भारतातील कलाकार, स्पर्धक किंवा ‘सेलिब्रिटी’ यांच्याकडे क्वचित्च पहायला मिळेल.
तरुण पिढीला नशेच्या आहारी नेणार्या मद्य, सिगारेट आदी उत्पादनांची विज्ञापने करणार्या भारतातील ‘सेलिब्रिटीं’नी रोनाल्डो यांच्या या कृतीतून बोध घ्यायला हवा. समाज ‘सेलिब्रिटीं’चे अनुकरण करतो. त्यामुळे समाजहित धुडकावून, पैशांच्या हव्यासापायी आपण समाजाची किती हानी करत आहोत, याचे भान घातक उत्पादनांचे विज्ञापन करणार्यांनी ठेवायला हवे. शीतपेयांची मागणी न्यून झाल्यास आरोग्यास हितकारक पेयांची मागणी वाढून असंख्य भारतीय लघु उद्योगांनाही चालना मिळेल.
काही दिवसांपूर्वी दोन अभिनेते ज्यांचे एकमेकांशी पटत नाही, ते एका गुटखा आस्थापनाच्या विज्ञापनात एकत्र झळकले होते. अशा अभिनेत्यांचे आपण आदर्श ठेवणार आहोत का ? आपण समाजासमोर कोणते आदर्श ठेवले पाहिजेत ? याचे भान कलाकार, खेळाडू आणि ‘सेलिब्रिटी’ यांनी ठेवायला हवे. तसेच कुणाला आदर्श मानावे आणि कुणाचे अनुकरण करावे ? हेही तरुण पिढीने ठरवायला हवे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे