आषाढी वारीला पायी जाण्याची अनुमती मिळावी, यासाठी आझाद मैदानावर वारकर्‍यांचे भजन आंदोलन !

आझाद मैदानावर आंदोलन करतांना वारकरी

मुंबई – आषाढी वारी पायी करण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या अनुमती द्यावी, यासाठी ३० जून या दिवशी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जोतिराम चांगभले, शहराध्यक्ष ह.भ.प. संजय पवार आणि ह.भ.प. गोविंद ताटे हे प्रातिनिधिकरित्या सहभागी झाले होते.

वारी परंपरा टिकून रहाण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।।’ या उक्तीप्रमाणे वारी नित्यनेमाला अतिशय महत्त्व आहे. हा नेम निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. कोरोनामुळे कुणीही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली नाही. सरकारला आतापर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र आणि राज्य सरकार असे दोन्ही सरकारचे निर्बंध होते. आता केवळ राज्य सरकारचे निर्बंध आहेत, तसेच सध्या कोरोना रुग्णांची संख्याही अल्प आहे. आषाढी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणार्‍या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी आणि नियम घालून अनुमती द्यावी, ही नम्र विनंती आहे. सरकारने यासाठी सहकार्य करावे. ’’

…अन्यथा ३ जुलै या दिवशी आंदोलन वारी !

राज्यात निवडणूक, प्रचारसभा, उद्घाटने आदी कार्यक्रम चालू आहेत. मग वारीची परंपरा खंडित का केली जात आहे ? सरकारने याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. सरकारने पायी वारीला अनुमती दिली नाही, तर ३ जुलै या दिवशी महाराष्ट्रातील ९-१० वारकरी संघटना आंदोलन वारी करतील, अशी चेतावणी या वेळी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली.