पू. (सौ.) सरिता पाळंदे यांच्याविषयी सौ. सारिका आय्या यांना मिळालेली पूर्वसूचना आणि जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) सरिता पाळंदे

१. संत होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे

‘साधारण ४ – ५ दिवसांपूर्वी मी आणि माझे यजमान पुण्यातील साधकांची आठवण काढून बोलत होतो. त्या वेळी माझ्या डोळ्यांपुढे सौ. पाळंदेकाकूंचा तोंडवळा आला आणि ‘काकू लवकरच संत होतील’, असे वाटले.

२. गुणवैशिष्ट्ये

२ अ. साधकांची पारख असणे : ‘सनातनचा साधक कोण आहे ?’, हे पू. (सौ.) काकू लगेच ओळखायच्या. १५ वर्षांपूर्वी माझ्या विवाहानंतर मी आणि पू. काकू पुण्यातील श्री गजानन महाराज मठात पहिल्यांदा भेटलो. त्या वेळी त्यांनी मला ‘तू सनातनची साधिका आहेस ना ?’, असे लगेच विचारले. यातून ‘पू. काकूंना साधकांची पारख होती’, असे लक्षात आले.

२ आ. पुढाकार घेऊन नियमित ग्रंथप्रदर्शन लावणे आणि जिज्ञासूंना संस्थेशी जोडून ठेवणे : पू. काकू पुढाकार घेऊन पुण्यात नियमित ग्रंथप्रदर्शन लावायच्या. पुष्कळ वेळा नियोजित स्थळी जाण्यास रिक्शा मिळत नसे, तरी त्या सर्व साहित्य एकट्याच घेऊन जायच्या आणि प्रदर्शन लावायच्या. एखाद्या दिवशी काकूंना ग्रंथप्रदर्शनाला येण्यास जमायचे नाही. तेव्हा समाजातील लोक त्यांची विचारपूस करून ‘आम्ही त्यांची आठवण काढली; म्हणून सांगा’, असे आम्हाला सांगायचे. काकूंनी जिज्ञासूंना संस्थेशी जोडून ठेवले होते.

२ इ. सेवेची तळमळ : वर्गणीदार, विज्ञापनदाते यांच्याकडे काकू पायीच जायच्या. त्या वेळी त्यांच्याकडे उत्पादने आणि ग्रंथ यांच्या पिशव्या असायच्या. त्या वजनाने जड असल्या, तरी त्याविषयी त्यांचे गार्‍हाणे नसायचे. त्या वेळी ‘त्यांच्या समवेत कुणी यायला पाहिजे’, असा त्यांचा आग्रहही नसायचा. जिज्ञासूंना ग्रंथ आणि उत्पादने लवकरात लवकर देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. जिज्ञासूंना हवे असलेले साहित्य त्यांच्याजवळ नसल्यास ते उपलब्ध झाल्यावर त्या त्यांना नेऊन द्यायच्या. यातून त्यांची सेवेची तळमळ दिसून येते.

२ ई. घरातील कामे आटोपून सेवेला वेळेवर येणे, ग्रंथप्रदर्शनावर येणार्‍या प्रत्येक जिज्ञासूला ‘त्यांना आवडतील’, असे ग्रंथ दाखवणे : पू. काकू घरातील कामे, स्वयंपाक असे सगळे सांभाळून नियोजित वेळी सेवेला येत असत. ग्रंथप्रदर्शनावर येणार्‍या प्रत्येक जिज्ञासूला, म्हणजे तरुण किंवा वयस्कर यांना त्यांचे वय अन् आवड यांनुसार ग्रंथ दाखवून त्यांचे वितरण करायच्या. त्यांचा ग्रंथ आणि जिज्ञासू यांचा अभ्यास चांगला होता.

२ उ. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि बालसंस्कार उत्तम प्रकारे घेणे : पू. काकूंच्या सुनेचा विद्यार्थ्यांना शाळेत चारचाकी गाडीने ने-आण करण्याचा व्यवसाय होता. लहान मुलांना ने-आण करतांना त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना चांगले सांभाळले गेले पाहिजे; म्हणून काकू स्वत: सकाळी उठून गाडीतून जायच्या. त्या वेळी पू. काकू त्या मुलांकडून रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणवून घ्यायच्या. पू. काकू बालसंस्कारवर्ग उत्तम घेत असत. बालसंस्कारवर्गाला येणारी मुले रस्त्यात, प्रदर्शनावर कुठेही भेटली, तरी पू. काकूंना नमस्कार करायची आणि त्यांच्याशी बोलायची.

– सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक