-
राज्य सरकारकडून गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचनांची घोषणा !
-
मिरवणुकीवर बंदी !
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असले, तरी श्रद्धा-भक्ती यांवर निर्बंध असू शकत नाहीत ! कोरोनाचे विघ्न दूर होऊन गणेशाची कृपा होण्यासाठी भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करूया !
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने स्पष्टपणे नकार दिला असून सार्वजनिक उत्सवासाठी ४ फूट, तर घरगुती उत्सवासाठी २ फूट गणेशमूर्तीची मर्यादा घालून दिली आहे. गणेशोत्सव स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करत सरकारने श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी घातली आहे.
मागील ४० वर्षांपासून आम्ही कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत गणेशोत्सव साजरा करत आहोत. आम्ही सरकारसमवेत पत्रव्यवहार करून बैठकीची मागणी करत आहोत; मात्र त्यावर प्रतिसाद दिलेला नाही. आता एकतर्फी निर्णय घोषित केले आहेत. सरकारने गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठक घेऊन म्हणणे जाणून घ्यावे. निर्णयांचा पुनर्विचार करावा. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर यांनी म्हटले.
सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना !
- घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
- पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, तसेच पर्यावरणपूरक असल्यास शक्यतो घरीच विसर्जन करावे. तसे करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी. (आपत्काळामध्ये धातूच्या मूर्तीला शास्त्रात मान्यता आहे; मात्र मूर्ती विसर्जित करावयाची असल्यास धर्मशास्त्रानुसार शाडूची मूर्ती असावी. – संपादक)
- उत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी यांचा स्वेच्छेने स्वीकार करावा. विज्ञापनांच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, हे पहावे. आरोग्य आणि सामाजिक संदेश देणारी विज्ञापने प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयीचे उपक्रम, शिबिरे यांचे आयोजन करावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता यांविषयी जनजागृती करावी.
- आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि तरतुदी यांचे पालन करावे.
- श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ‘ऑनलाईन’, ‘केबल नेटवर्क’, संकेतस्थळ, ‘फेसबूक’ आदींद्वारे उपलब्ध करून देण्याविषयी अधिकाधिक व्यवस्था करण्यात यावी.
- सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरण, तसेच ‘थर्मल स्क्रीनिंग’ यांची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष दर्शन घेणार्यांनी सामाजिक अंतर राखावे, तसेच मास्क, ‘सॅनिटायझर’ यांचा उपयोग करावा.
- श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी अल्पतम वेळ थांबावे.
- लहान मुले आणि वरिष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळ किंवा इमारत यांतील घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.