पणजी, २८ जून (वार्ता.) – गोव्यातील स्टेट काऊन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग (एस्.सी.ई.आर्.टी.) ने वर्ष २०२१-२२ या नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात गेल्या वर्षीप्रमाणे ३० टक्के कपात करण्याचे ठरवले असून त्या संदर्भातील परिपत्रक लवकरच पाठवले जाणार आहे. कोरोना महामारीचे संकट अजूनही चालू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०२०-२०२१ या मागील शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात अशाच प्रकारे कपात करण्यात आली होती. गोवा शैक्षणिक मंडळाने यंदा इयत्ता नववी ते बारावी या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली होती. त्याच धर्तीवर एस्.सी.ई.आर्.टी.ने हा कपातीचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष विलंबाने चालू होणे, ऑनलाईन शिकवणे आणि कोरोनाचे संकट या कारणांमुळे अभ्यासक्रमात ३० टक्के कपात झाली आहे. एस्.सी.ई.आर्.टी.च्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज’ ने अभ्यासक्रमात ३० टक्के कपात करावी, या सूचनेची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.