सांगली महानगरपालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक
सांगली, २५ जून – कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्य सरकारने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरांत विभागले आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात तिसर्या स्तरासाठी निर्धारीत केलेले प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. यानुसार जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या अनेक निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. असे असतांना गेल्या तीन दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर जवळपास १० टक्के आणि त्यापेक्षा अधिक होत आहे. हे गंभीर असून अशी स्थिती राहिल्यास महानगरपालिका क्षेत्रात ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत पुन्हा चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करावे लागतील, अशी चेतावणी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्हा १४ जूनपासून तिसर्या स्तरात आला असून नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील, तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढून मिळालेल्या निर्बंधामधील शिथीलता गमवावी लागेल. हे टाळावयाचे असल्यास योग्य सामाजिक अंतर पाळावे, गर्दी टाळावी. लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, तसेच दर आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.