त्यागी वृत्ती, मुलांवर साधनेचे संस्कार करणार्‍या आणि तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया !

१६ जून २०२१ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. चंद्ररेखा जाखोटिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. आज २५ जून २०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

 (भाग १)

सौ. चंद्ररेखा जाखोटिया

१. श्री. नटवरलाल जाखोटिया (पती)

श्री. नटवरलाल जाखोटिया

१ अ. आमचे ‘स्टेशनरी’चे दुकान आणि ‘कुरिअर’चा व्यवसाय होता. त्यात मला सौ. रेखाची मोलाची साथ लाभली. त्यामुळे मला दुकान सांभाळून ‘कुरिअर’चा व्यवसायही करता आला.

१ आ. अंथरुणाला खिळून असलेल्या स्थितीतही सेवा करणे : तिला हर्निया आणि ‘थायरॉईड’ हे त्रास चालू झाल्यावरही ती झोकून देऊन सेवा करायची. ती १५ वर्षांपासून पायाच्या त्रासामुळे अंथरुणाला खिळून होती. ती प्रत्येक वेळी सांगत असे, ‘‘मला शरीर साथ देत नाही. मी या आजाराला कंटाळले आहे. देवाने मला यातून लवकर सोडवावे.’’ अशा शारीरिक स्थितीतही ती सेवा करत असे.

१ इ. यजमानांप्रती कृतज्ञताभाव

१. सौ. रेखाने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा चालू केली. तेव्हा ती मला पुष्कळ वेळा सांगत असे, ‘‘तुमच्यामुळे मला साधना करायला वेळ मिळतो.’’

२. तिचे निधन होण्याच्या १५ दिवस आधीपासून तिचे पोट फुगले होते. तिला बसवत नव्हते आणि फार हालचालही करता येत नव्हती. तिचा मृत्यू होण्याच्या २ दिवस आधी ती मला म्हणाली, ‘‘मला चांगला नवरा मिळाला. तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळ केले. मला तुमच्यासाठी काही करता आले नाही.’’

२. श्री. संपत जाखोटिया (मोठा मुलगा)

श्री. संपत जाखोटिया

२ अ. प्रेमभाव : जेवणात माझ्या आवडीचा पदार्थ असल्यास आई तिच्या ताटातील पदार्थ माझ्यासाठी काढून ठेवत असे.

२ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : आईला शारीरिक त्रासामुळे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी लिखाण करायला जमत नव्हते, तरीही ती जमेल तसे सारणी लिखाण करत असे.

२ इ. नामजपादी उपायांचे गांभीर्य : तिला होत असलेल्या शारीरिक त्रासांसाठी ती प्रतिदिन ‘नामजप कोणता करावा ?’, हे विचारून घेत असे आणि ती तो नामजप पूर्ण करायची.

२ ई. अपेक्षा नसणे : तिचा मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळी ९ वाजता मी तिला ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जाऊ का ?’, असे विचारल्यावर काहीही गार्‍हाणे न करता तिने मला होकार दिला. गेल्या १० ते १२ वर्षांत ‘मला त्रास होत आहे, तर माझ्या समवेत थांब’, असे आई मला कधीच म्हणाली नाही.

२ उ. आईच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना ! : आईच्या निधनाच्या २ दिवसांपूर्वी मी काही कामानिमित्त सनातन संकुलातून आश्रमात येत होतो. त्या वेळी एक कावळा माझ्या डोक्यावर बसून गेला. तेव्हा माझ्या काही लक्षात आले नाही. त्यानंतर २ दिवसांनी आईचे निधन झाले.

३. श्री. आनंद जाखोटिया (लहान मुलगा)

श्री. आनंद जाखोटिया

३ अ. मुलांवर स्वावलंबन आणि काटकसरीपणा यांचे संस्कार करणे : आईने आम्हाला लहानपणापासून चांगल्या सवयी लावून स्वावलंबी केले आणि आमच्यावर काटकसरीपणाचे संस्कार केले. त्यामुळे आम्हाला आश्रमजीवन सहजतेने स्वीकारता आले. कपडे धुणे, जेवणाचे ताट घासणे, खोल्यांची स्वच्छता करणे, स्वयंपाक करणे, स्वयंपाकात साहाय्य करणे, काटकसर करणे अशा प्रकारे आईने आम्हाला लावलेल्या सवयींमुळे आज तिच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. तिने घरात दूरदर्शन संच, शीतकपाट (फ्रिज), धुलाई यंत्र अशा सुखसुविधा घेतल्या नाहीत. ती जे आहे, त्यातच अत्यंत समाधानी होती.

३ आ. त्यागमय जीवन

३ आ १. सकाळी घरातील कामे करून सेवा करणे आणि संध्याकाळी दुकानात साहाय्य करणे : आईला साधना समजल्यापासून तिचा ओढा साधनेकडेच असायचा. तिचे पहिले प्राधान्य साधना असायचे. आमचे स्टेशनरीचे दुकान होते आणि ‘कुरिअर’चा व्यवसाय होता. सायंकाळनंतर दुकानात साहाय्य लागायचे. आई सकाळीच दोन्ही वेळचा स्वयंपाक करून घराबाहेर पडायची. ती सेवा करून सायंकाळी दुकानात यायची. तिला कधी सेवेसाठी २ दिवस दुसर्‍या ठिकाणी रहायचे असल्यास ती दुकानात आमचे नियोजन करून जायची. घरातील कामांसाठी किंवा दुकानात साहाय्य हवे आहे, यासाठी तिने कधीही सेवा थांबवली नाही. सनातन संस्थेचे काही कार्यक्रम असल्यास ती बाबांना दुकान बंद ठेवायला सांगायची.

३ आ २. दोन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : आम्हा दोन्ही भावंडांना तिने पूर्णवेळ सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आम्ही दोघे भाऊ महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांनाच पूर्णवेळ साधक झालो. ‘तिने एक प्रकारे संसारात न गुरुफटता ‘गुरुसेवा, धर्म आणि साधना’ यांचा संसार केला’, असे वाटते.

३ इ. गुरुदेवांच्या चरणी जाण्याचा ध्यास ! : आईच्या मृत्यूच्या २ दिवस आधी माझे आईशी बोलणे झाले. त्या वेळी ती मला म्हणाली, ‘‘मला रामनाथीला जायचे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर गेल्यावरच माझे प्रारब्ध संपेल.’’ मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भ्रमणभाष करते. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तू त्यांना भ्रमणभाष कर. आपण जाऊया.’’ त्यानंतर २ दिवसांत आईचे निधन झाले. तेव्हा ‘तिला अशा पद्धतीने परात्पर गुरु डॉक्टरांकडे जायचे होते का ?’, असे मला वाटले.

३ ई. आईच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

३ ई १. आईचे अंत्यविधी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी खिडकीत ठेवलेला घास कावळ्याने खाणे : आईचे अंत्यविधी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी जेवतांना खिडकीजवळ कावळा ओरडू लागला. त्या वेळी मी ताटातील घास काढून खिडकीत ठेवला. तेव्हा कावळा ओरडायचा थांबला; पण त्याने घास खाल्ला नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी घास ‘ग्रील’च्या आत ठेवल्याने त्याला घास घ्यायला अडचण येत आहे.’ त्यानंतर मी खिडकीच्या बाहेर घास ठेवल्यावर कावळ्याने लगेच घास खाल्ला. दुसर्‍या दिवशी मी अल्पाहार करतांना खिडकीत कावळे नव्हते, तरी मी खिडकीच्या बाहेर घास ठेवल्यावर लगेच कावळा आला आणि त्याने घास खाल्ला.

३ उ. कृतज्ञता

३ उ १. संतांनी नामजपादी उपाय सांगून आध्यात्मिक स्तरावर साहाय्य केल्याविषयी आणि साधकांनी निरपेक्षभावाने सेवा केल्याविषयी कृतज्ञता ! : आपल्याकडे विठ्ठलाच्या भक्तांची परंपरा आहे. अनेक संतांना विठ्ठलाचे दर्शन झाले. ‘विठ्ठलाने भक्तांच्या घरी पाणी भरले. त्यांना संकटातून सोडवले’, अशा अनेक कथा आपण ऐकतो. हाच विठ्ठल आम्हा सर्व साधकांच्या जीवनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात आहे. ते विविध साधकांच्या माध्यमातून सर्वांना आधार देतात आणि साहाय्य करतात. आईचे प्रारब्ध खडतर होते. तिने १३ वर्षे अत्यंत तीव्र वेदना परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या बळावरच सहन केल्या. तिला वैद्यकीय साहाय्य लागल्यास लगेच साधक उपलब्ध असायचे. तिला नामजपादी उपाय सांगायला संत आणि साधक सतत उपलब्ध असायचे. आश्रमातील साधकांनी तिची निरपेक्षपणे सेवा केली. आईला त्रास झाल्यावर पू. (सौ.) अश्विनी पवार तिला भेटून गेल्यावर तिला एकदम बरे वाटायचे. तिला आधार देणारे एकेक हात हे साधकांच्या रूपात आलेले परात्पर गुरु डॉक्टरच होते. या सर्वांच्या साहाय्यामुळेच आईची शेवटची १३ वर्षे ही आश्रमाचे सात्त्विक वातावरण, साधना आणि ईश्वराचे स्मरण यांत गेली.

३ उ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आईला आश्रमात रहायला मिळून तिला प्रारब्धभोग आनंदाने भोगण्याची शक्ती मिळाल्यामुळे आणि कुटुंबियांच्या जीवनाचे कल्याण झाल्यामुळे कृतज्ञता ! : आईचे निधन झाल्याचे ऐकल्यानंतर साधकांमधील गुरुरूप आठवून माझे मन भरून आले. ‘सर्व साधकांना आणि आश्रमाला साष्टांग नमस्कार करावा’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘तू तुझे सर्व अर्पण करून तरी पहा, नाही तुझा उद्धार केला, तर पहा’, हे भगवान श्रीकृष्णाचे वचन परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. आईला कुटुंबात राहून हे प्रारब्ध सहन करणे अशक्यप्रायच होते; पण परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे तिला आश्रमात रहायला मिळून तिला प्रारब्ध आनंदाने भोगण्यासाठी बळ मिळाले आणि त्यांनी आम्हा सर्वांची साधनाही करवून घेतली. त्यांनी आमच्या जीवनाचे कल्याण केले.

३ उ ३. आईने केलेल्या संस्कारांना कोंदण बसवण्याचे कार्य करणार्‍या गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता ! : आई, म्हणजे माऊली महान होती. तिने मायेचा त्याग करून आम्हाला गुरुमाऊलीकडे सोपवले. गुरुमाऊली त्याहूनही महान आहे. तिने आईसारख्या माऊली निर्माण केल्या आणि आमच्या कुटुंबाचा उद्धार केला. गुरुमाऊलीनेच साधना सांगून आणि आमच्याकडून साधना करवून घेतलेल्या आमच्या तुटपुंज्या समर्पणाला भरभरून दिले. आईने जे संस्कार केले, त्याला कोंदण बसवण्याचे कार्य गुरुमाऊलीने केले. यासाठी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! सर्व संतांच्या चरणी आणि गुरुरूपी सर्व साधकांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !’ (२१.६.२०२१)

(क्रमश:)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490586.html