कु. अंजली कानस्कर यांनी सादर केलेल्या विविध नृत्यप्रकारांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

कु. अंजली कानस्कर यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्यातील झपतालामधील ‘तोडा’ (टीप १) आणि त्रितालामधील ‘चक्करदार परण’ (टीप २) या नृत्यप्रकारांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

कु. अंजली कानस्कर
टीप १ – तोडा : तोडा (तुकडा) म्हणजे ता, थैई, तत, दिग इत्यादी नृत्यातील वर्णांपासून बनलेली न्यूनतम एका आर्वतनाची तालबद्ध रचना !

टीप २ – चक्करदार परण : पखवाजाचा एक बोलसमूह जो एकसारखा एका पाठोपाठ तीन वेळा नाचून तालाच्या एकापेक्षा अधिक आवर्तनानंतरच समेवर येतो. त्यास ‘चक्करदार परण’, असे म्हणतात. सम-तालाच्या पहिल्या मात्रेला ‘सम’, असे म्हणतात.​

कु. मधुरा भोसले

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत आणि नृत्य विभागांतर्गत दुर्ग, राज्य छत्तीसगड येथील कु. अंजली कानस्कर यांनी २९.८.२०१८ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्यातील झपतालामधील ‘तोडा’ आणि त्रितालामधील ‘चक्करदार परण’ हे प्रकार सादर केले. ‘कथ्थक नृत्याचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्‍या साधकांवर काय होतो’, हे पहाण्यासाठी नृत्याचा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे, देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण आणि नृत्याच्या संदर्भात मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.

कथ्थक नृत्यातील मुद्रा सादर करतांना कु. अंजली

१. झपतालामधील तोड्याची वैशिष्ट्ये

१ अ. कु. अंजली कानस्कर हिची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. कु. अंजली ही उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली आहे.

आ. तिच्यामध्ये अव्यक्त भाव आणि तळमळ आहे.

इ. कथ्थक नृत्य सादर करतांना नृत्यातून निर्माण होणार्‍या चैतन्यामुळे तिच्यावर नामजपादी उपाय होऊन तिच्या भोवती असणारे त्रासदायक आवरण नष्ट होते.

२. कथ्थक नृत्यातील झपतालामधील ‘तोडा’ या नृत्याच्या प्रकाराच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्ये

अ. हा प्रकार शास्त्रीय नृत्याच्या अंतर्गत असल्याने त्यात सात्त्विकता ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असल्याचे जाणवले.

आ. ‘तत् तत् थेई’ हे बोल चालू असतांना कु. अंजलीने भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा तिच्या अनाहतचक्रातून निळ्या रंगाचे तुषार बाहेर पडतांना दिसले आणि वातावरणात भावलहरींचे प्रक्षेपण झाले.

इ. कु. अंजली विविध हस्तमुद्रा करत असतांना तिच्या मुद्रांतून वातावरणात लाल रंगाच्या सात्त्विक शक्तीच्या वलयांचे प्रक्षेपण होतांना दिसले. मुद्रा केल्यानंतर ती त्याच स्थितीत काही वेळ थांबत असे. तेव्हा तिच्या स्थिर मुद्रेतून पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य वातावरणात प्रक्षेपित झाले. तिच्या मुद्रेतून वातावरणात पांढर्‍या रंगाची वलये प्रक्षेपित झाली.

ई. झपतालामधील ‘तोडा’ हा मध्यम स्तरावरील नृत्यप्रकार असल्याने यातून सात्त्विक शक्ती आणि भाव यांची निर्मिती होऊन ती कु. अंजलीच्या मुद्रांतून तेजतत्त्वाच्या स्तरावर अन् हावभावांतून वायूतत्त्वाच्या स्तरावर वातावरणात प्रक्षेपित झाली.

उ. झपतालामधील ‘तोडा’ चालू असतांना कु. अंजलीचे पोट आणि छाती यांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत होऊन या ऊर्जेचे तिच्या हस्तमुद्रा आणि पदमुद्रा यांतून वातावरणात प्रक्षेपण झाले.

३. कथ्थक नृत्यातील त्रितालामधील ‘चक्करदार परण’ या नृत्याच्या प्रकाराच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्ये

३ अ. नृत्याला आरंभ करताच चैतन्य जाणवून आनंदाची अनुभूती आली.

३ आ. नृत्य चालू असतांना कु. अंजलीच्या मणिपूरचक्रातून शक्तीची लाल, अनाहतचक्रातून प्रीतीची गुलाबी, विशुद्धचक्रातून सात्त्विकतेची पांढरी आणि आज्ञाचक्रातून चैतन्याची पिवळसर रंगाची वलये वातावरणात प्रक्षेपित झाली.

३ इ. आधीच्या नृत्याच्या प्रकारांच्या तुलनेत त्रितालातील ‘चक्करदार परण’ या प्रकाराची जाणवलेली वैशिष्ट्ये

३ इ १. मुद्रांचा प्रकार आणि गती : या प्रकारात केल्या जाणार्‍या मुद्रा पुष्कळ कठीण असून त्यांची गतीही जलद होती. त्यामुळे नृत्यातून तेजतत्त्वाच्या स्तरावरील शक्तीचे पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपण झाले.

३ इ २. हावभाव : तोंडवळ्यावरही प्रत्येक मुद्रेच्या वेळी विविध भाव उमटत होते. त्यामुळे नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा स्तर वायुतत्त्वाचा, म्हणजे वरिष्ठ होता.

३ इ ३. गिरकी घेण्याचे प्रमाण : या नृत्याच्या प्रकारात गिरकी घेण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे देहामध्ये कार्यरत झालेली सात्त्विकता, शक्ती आणि चैतन्य यांच्या अनुक्रमे श्वेत, लाल आणि पिवळसर रंगाच्या वलयांकित लहरी वातावरणात वेगाने प्रक्षेपित झाल्या. नृत्यातील गिरकी हे कुंडलिनीच्या जागृत चक्राप्रमाणे दिसत असल्याने गिरकी पहातांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी पहाणार्‍याच्या अनाहतचक्रापर्यंत पोचून आनंदाची अनुभूती आली.

३ ई. त्रितालातील चक्करदार परणामुळे कु. अंजलीवर पुष्कळ प्रमाणात नामजपादी उपाय होणे : झपतालामधील ‘तोड्या’च्या तुलनेत त्रितालातील ‘चक्करदार परण’ या प्रकारामुळे कु. अंजलीच्या देहाभोवती असणारे त्रासदायक आवरण लवकर न्यून झाले आणि तिच्यावर पुष्कळ नामजपादी उपाय झाले. त्यामुळे कु. अंजलीचा तोंडवळा तणावरहित आणि आनंदी दिसत होता.

३ उ. वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होऊन वातावरण अधिक आनंददायी होणे : त्रितालातील ‘चक्करदार परण’ चालू असतांना तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे वातावरणात चैतन्य प्रक्षेपित झाले आणि वातावरण अधिक आनंददायी झाले.

कृतज्ञता ! : ‘हे परात्पर गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे कु. अंजलीच्या माध्यमातून मला श्रीकृष्णाच्या लीला नृत्याच्या रूपाने पहाता आल्या, यासाठी मी तुमच्या चरणी वंदन करून कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.