एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. पिटर कोनाव्हेलिस यांना चि. रेयांश याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘बालसाधक चि. रेयांश रावत याची आध्यात्मिक संशोधन केंद्रातील साधकांशी चांगलीच मैत्री झाली आहे. त्याच्याकडून मला अनेक गुण शिकायला मिळाले. मला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. रेयांश

१. मोकळेपणाने बोलणे

मी त्याच्याशी बोलायला जातो, तेव्हा तो माझ्याशी मोकळेपणाने बोलतो आणि तो त्याने काढलेल्या चित्रांविषयी सांगतो. तो माझ्याशी इतक्या सहजतेने बोलतो की, ‘आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतो’, असे मला वाटते.

२. इतरांना साहाय्य करणे

श्री. पिटर कोनाव्हेलिस

अ. आश्रमात आल्यावर आरंभी तो केवळ त्याच्या आईला आश्रमसेवांमध्ये साहाय्य करत असे. नंतर आई समवेत नसली, तरी तो अन्य साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करू लागला. सेवा पूर्ण झाल्यावर तो त्या सेवेत असणार्‍या साधकांना विचारल्याविना तेथून जात नाही.

आ. एकदा मी ध्यानमंदिराचा केर काढण्याची सेवा करत होतो. रेयांश तिथे आला आणि त्याने मला ‘काही साहाय्य हवे का ?’, असे विचारले. केर काढून झाल्यावर त्याने मला ध्यानमंदिरात आसंद्या मांडण्यास साहाय्य केले. वास्तविक आश्रमात त्याला येऊन काही दिवसच झाले होते. त्यानंतर तो नियमितपणे बालसाधक ध्रुव देसाई याच्या समवेत मधे मधे मला या सेवेत साहाय्य करण्यासाठी येतो.

३. साधनेत साहाय्य करणे

एकदा आश्रमाच्या स्वागतकक्षात तो आणि ध्रुव देसाई बसले होते. तो ध्रुवला नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात येण्याविषयी प्रवृत्त करत होता. ध्रुवशीही तो सेवेविषयी बोलत असतो.

४. सेवेविषयी आवड-नावड नसणे

एकदा मी भोजनकक्ष केर काढण्याची सेवा करत असतांना त्याने मला विचारले, ‘‘ही सेवा तुम्हाला आवडते का ?’’ हाच प्रश्न मी त्याला विचारला. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला सर्व सेवा आवडतात.’’ यातून ‘आश्रमातील सेवांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा असावा ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले मला रेयांशच्या माध्यमातून शिकवत आहेत’, असे मला वाटले.

५. सतर्कता

एकदा मी भोजनकक्ष आवरण्याची सेवा करत असतांना त्याला मधेच सेवा सोडून जावे लागणार होते. मला पटलावर ताटे आणून ठेवायची होती; परंतु मला आध्यात्मिक त्रास असल्याने मी ताटांना हात लावू शकत नव्हतो; म्हणून रेयांशने जाण्यापूर्वी मला विचारले, ‘‘ताटे ठेवण्याची सेवा करण्यासाठी कुणी साधक आहे ना ?’’ ही सेवा करण्यासाठी अन्य एक साधक येणार आहे, हे त्याला कळल्यावर मगच तो निघून गेला.

६. शिष्टाचार पाळणे

एकदा आम्ही बोलत असतांना त्याला कुठेतरी जाऊन यायचे होते. तेव्हा त्याने मला ‘मी एक मिनिटासाठी जाऊन येऊ का ?’, असे विचारले.

७. भाव

एकदा तो आमच्या कक्षात आला होता. माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेले भेटकार्ड माझ्या पटलावर होते. त्या भेटकार्डावर श्रीरामाचे चित्र होते. त्या भेटकार्डावर वरच्या बाजूला असलेला एक धागा त्याने अशा पद्धतीने व्यवस्थित बांधला की, तो श्रीरामाच्या गळ्यात हार घातल्याप्रमाणे दिसत होता. ‘त्याला देवानेच तसा विचार दिला असावा’, असे मला वाटले.

– श्री. पिटर कोनाव्हेलिस, ॲडलेड, ऑस्ट्रेलिया. (१५.३.२०२१)