अमेरिकेतील एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) भावना शिंदे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

२३  आणि २४ जून  या  दिवशी  आपण अमेरिकेतील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या  संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा साधनाप्रवास पाहिला. आज आपण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे येथे पाहूया.

पू. (सौ.) भावना शिंदे

१. साधकांमध्ये संतपदाला पोचून ईश्वरप्राप्ती करून घेण्याविषयीची तळमळ निर्माण करणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाच्या मनात ‘गुरुकृपेने साधनेत अमर्याद प्रगती करता येते’, हा आत्मविश्वास निर्माण केला आहे. ‘लहान ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे’, या म्हणीची ते साधकांना पुनःपुन्हा आठवण करून देतात. मी नुकतीच साधना चालू केली होती. तेव्हा एकदा माझा आणि माझ्या आईचा वाद झाला. त्या वेळी माझ्याकडून तिचे मन दुखावले गेले. या चुकीची मला पुष्कळ खंत वाटली आणि माझ्या मनात ‘आता मला ईश्वरप्राप्ती कशी होणार ?’, असा विचार आला. या प्रसंगाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्यासाठी माझ्या उत्तरदायी साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना काही प्रश्न विचारले. गुरुदेवांनी ‘या प्रसंगात प्रारब्ध, आध्यात्मिक त्रास आणि माझी आई यांचा काहीही दोष नसून ही सर्वस्वी तुमची चूक आहे’, असा निरोप पाठवला. उत्तरदायी साधकांनी मला ‘तुम्हाला परात्पर गुरुदेवांना आणखी काही विचारायचे आहे का ?’, असे विचारले. त्यावर मी ‘मला ईश्वरप्राप्ती करता येईल का ?’, हा एकच प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अगदी स्पष्टपणे ‘हो (YES)’ असे मोठ्या लिपीत लिहून पाठवले. त्यांचा तो ‘हो’ माझ्या आतापर्यंतच्या साधनेतील प्रयत्नांचा प्रेरणास्रोत बनून राहिला आहे. काही वेळा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असे. तेव्हा त्यांच्या ‘हो’ या शब्दाने मी पुन्हा उत्साही होऊन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य राखू शकत असे. त्यांचे ‘हो’ हे उत्तर माझ्या साधनेच्या प्रवासासाठी अत्यंत अर्थपूर्ण ठरले; कारण या शब्दानेच मला ‘आपल्याला अशा गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे, जे साधकांना केवळ संतपदापर्यंत नव्हे, तर मोक्षापर्यंत घेऊन जातात’, याची दिव्य जाणीव करून देऊन आश्वस्त केले.

२. ‘अध्यात्मशास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे साधना करा आणि आनंदाची अनुभूती घ्या’, ही शिकवण साधकांच्या मनावर बिंबवणे

वर्ष १९९९ मध्ये मी अटलांटा (अमेरिका) येथे साधनेला आरंभ केला. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटले नव्हते आणि माझी आध्यात्मिक पातळीही अल्प होती; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अध्यात्मशास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे साधना करा आणि आनंदाची अनुभूती घ्या’, असे शिकवले असल्यामुळे माझा अध्यात्मशास्त्रावरचा विश्वास वाढला, तसेच ‘मार्गदर्शन करणार्‍या साधकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गुरुतत्त्वच दिशादर्शन करत आहे’, अशी श्रद्धाही वाढली.

३. प्रोत्साहन देत आणि सुधारणा सुचवत टप्प्याटप्याने शिकवणे

जानेवारी २००४ मध्ये मी आणि विदेशातील काही साधक यांचा भाव पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी आमचे कौतुक केले; मात्र जानेवारी २००६ मध्ये एका सत्संगात आम्ही त्यांना स्वतःच्या भावानुभूती सांगितल्या. त्या ऐकून त्यांनी ‘मी’, ‘माझा भाव’ आणि ‘माझी साधना’ यांत आम्ही अडकलो असल्याचे आमच्या लक्षात आणून दिले. यातून त्यांनी आम्हाला केवळ वैयक्तिक भावाच्या टप्प्यावर अडकून न रहाता समष्टी भावाच्या टप्प्याकडे प्रगती करण्याचे महत्त्व शिकवले. त्यामुळेच सध्या विदेशातील अनेक साधक अध्यात्मप्रचार करण्याची सेवा करत आहेत आणि कित्येक नवीन जिज्ञासू साधनेला आरंभ करत आहेत.

४. सुस्पष्ट पद्धतीने; मात्र प्रेमाने मार्गदर्शन करण्याचे कौशल्य

परात्पर गुरु डॉक्टर थेट; पण प्रेमळ शब्दांत मार्गदर्शन करतात. त्यांचे बोलणे नेहमी स्पष्ट असते. ते साधकांना कधीही मानसिक स्तरावर हाताळत नाहीत, उदा. जेव्हा ते एखाद्या साधकाला ‘तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे सांगतात, तेव्हा ते त्या साधकाला बरे वाटावे; म्हणून नसते, तर ‘इतरांना त्याच्या प्रगतीविषयी समजावे आणि त्याच्या प्रयत्नांतून शिकता यावे’, यासाठी असते. याचप्रमाणे जेव्हा ते एखाद्या साधकाची चूक दाखवून देतात, तेव्हा ते ‘त्यातून त्याने शिकावे आणि पुढे जावे’, यासाठीच असते. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी एका विदेशी साधिकेला ‘तुम्ही साधनेत चांगली प्रगती कशी केली ?’, असे विचारले. ते ऐकून प्रथम त्या साधिकेचा त्यावर विश्वास बसला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर सहजच असे बोलत आहेत’, असे तिला वाटले. त्यामुळे गुरुदेवांनी उपस्थित साधकांना तिच्यातील गुण विचारले आणि ‘साधकांनी सांगितलेले गुण स्वतःत आहेत’, अशी स्वयंसूचना तिला घेण्यास सांगितले,  म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढेल. या प्रसंगानंतर ६ मासांत त्या साधिकेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली.

५. परात्पर गुरुदेव म्हणजे प्रीतीचे मूर्तीमंत उदाहरण !

परात्पर गुरु डॉक्टरांना ‘वातावरणातून प्रक्षेपित होणारे ईश्‍वरी चैतन्य मला सोन्याच्या दागिन्याच्या माध्यमातून मिळत रहावे’, यासाठी मला एक सोन्याचा दागिना द्यायचा होता; परंतु त्या वेळी सोन्याचा दागिना उपलब्ध नव्हता; म्हणून त्यांनी मला सात्त्विक नक्षी असलेले चांदीचे पैंजण दिले. त्यामुळे पाताळातून येणार्‍या त्रासदायक नाद लहरींपासून माझे रक्षण होत होते. इतर आध्यात्मिक संस्थांत साधक अर्पण देतात; मात्र इतकी वर्षे साधनेत असूनही मला एकदाही अर्पण देणे शक्य झाले नाही. याउलट परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला पुष्कळ काही दिले आहे. ‘तुमच्याकडे ज्ञान असूनही जर समष्टीविंषयी प्रेमभाव नसेल, तर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाला काहीही महत्त्व मिळत नाही’, असे म्हटले जाते. या विधानाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी संपूर्ण मानवजातीला अपार ज्ञान दिलेले आहे; पण त्यांच्या प्रीतीमय अशा एखाद्या वाक्याने अथवा कृतीने जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.’

– (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (जानेवारी २०१९)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.