कुटुंबियांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील कै. विजय डगवार (वय ६६ वर्षे) !

१४.६.२०२१ या दिवशी विजय डगवार यांचे निधन झाले. २३.६.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

विजय डगवार

१. स्वावलंबी

‘माझे यजमान स्वतःची सर्व कामे स्वतः करत असत, उदा. दवाखान्यात जाणे, औषध घेणे, कपड्यांच्या घड्या करणे, अंथरूण-पांघरूण आवरणे, डोळ्यांमध्ये औषध घालणे इत्यादी.

२. उत्तम स्मरणशक्ती

श्रीमती मंदाकिनी डगवार

बाहेरगावी गेल्यावर ‘कोणते साहित्य कुठे ठेवले आहे ? कोणता कागद कोणत्या डायरीत आहे ?’, हे त्यांना सर्व ठाऊक असे. त्याप्रमाणे ते सांगत असत.

३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर नामाचे महत्त्व कळल्यावर त्यांनी नामजपाला प्रारंभ केला. वर्धा येथे सर्वप्रथम झालेल्या गुरुपौर्णिमेला यजमानांनी अर्पण दिले होते. आम्हाला आमची कुलदेवता ठाऊक नव्हती. ‘कुलदेवता कळावी’, यासाठी आम्ही गावाकडील जुन्या लोकांना कुलदेवतेचे नाव विचारले. भाटाने आमच्या कुलदेवतेचे नाव सांगितल्यावर यजमानांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी भाटाला अमितची (मुलाची) सायकल भेट दिली.

४. बाहेरगावाहून प्रसारातील साधक किंवा संत आल्यावर त्यांची सेवा मनापासून करणे

बाहेरगावाहून प्रसारातील साधक किंवा संत आल्यावर यजमान त्यांची सेवा मनापासून करत. ‘खोलीची स्वच्छता करणे; भाजीपाला, फळे, तसेच त्यांना आवडणारे पदार्थ आणून देणे’ इत्यादी सेवा ते परिपूर्ण आणि भावपूर्ण करत. बाहेरगावाहून संत किंवा साधक आल्यावर ते त्यांना घ्यायला आणि सोडायला स्थानकावर जात असत.

५. त्यांनी गोकुळाष्टमीला देवघरातील श्रीकृष्णाला गुलाल वाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आपोआप गुलाल पडला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहेत’, याची त्यांना जाणीव झाली.

६. प्रतिदिन सर्व कृती नियोजनाप्रमाणे करणे

त्यांची दिनचर्या ठरलेली होती. ते प्रतिदिन पहाटे उठून दोन घंटे नामजप करायचे. ते सर्व कृती नियोजनाप्रमाणे करत असत.

७. त्यांच्याकडे ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे बांधण्याची सेवा होती. सेवा करण्यासाठी ते वेळेत जात असत.

८. इतरांचा विचार करणे

‘सर्वांची साधना चांगली व्हावी’, यासाठी ते भ्रमणभाषवर अल्प बोलत असत. भ्रमणभाष करण्यापूर्वी ते बोलण्याची वेळ विचारून घेत असत.

९. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये ते नित्यनेमाने व्यष्टी साधनेचा आढावा देत असत. ‘मंत्र म्हणणे, स्वयंसूचनांची सत्रे करणे, स्तोत्र म्हणणे आणि नामजप करणे’ इत्यादी गोष्टी ते नियमित करत असत. चुका झाल्यास ते क्षमायाचना करत असत आणि चुकांसाठी प्रायश्चित्त घेऊन ते पूर्ण करत असत.

१०. कुटुंबियांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणे

त्यांनी अमित आणि मयुरी यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य केले. सर्व व्यवहार ते स्वतः करत असत. ‘मुलीला आणि मला त्रास होऊ नये’, असा विचार करून ते आम्हाला साहाय्य करत असत.

११. ते मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना नामजपादी उपायांचे महत्त्व सांगत असत.

१२. क्षमायाचना करणे

रामनाथी आश्रमातून आल्यापासून ते आमची क्षमायाचना करायचे. (पूर्वी यजमानांचा आमच्या साधनेला विरोध होता.) ते गुरुदेव, संत, अमित आणि मयुरी यांची, तसेच माझी पुष्कळ वेळा क्षमा मागायचे. ‘माझ्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावले गेल्याविषयी मला क्षमा करा’, असे ते म्हणत.

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव 

१३ अ. वर्धा येथील रहात्या घरी प्रत्येक खोलीतील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला ते नमस्कार करत असत.

१३ आ. रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन, म्हणजे देवाचे दर्शन’, असा भाव असणे

१३ इ. आश्रमातून निघतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर ते विष्णूच्या विराट रूपात दिसणे आणि बराच वेळ भावजागृती होणे : काही वर्षांपूर्वी मयुरीला भेटायला रामनाथी आश्रमात आम्ही गेलो होतो. आश्रमातून प्रस्थान करतांना आमच्या समवेत सद््गुरु (कु.) स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) होत्या. त्यांना निरोप द्यायला परात्पर गुरु डॉक्टर आगाशीत आले. यजमानांनी परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर त्यांना ते विष्णूच्या विराट रूपात दिसले. आश्रमातून निघाल्यापासून आगगाडीत बसेपर्यंत त्यांच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते.

१४. जाणवलेला पालट

पूर्वी ‘मुलांनी लग्न करावे’, असा त्यांचा अट्टहास होता. आता ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने होईल. आपली इच्छा नको’, असे त्यांना वाटत होते.

१५. अनुभूती

त्र्यंबकेश्वरच्या कुंडात अंघोळ करतांना यजमान त्यात बुडणे, एका धिप्पाड व्यक्तीने त्यांचे केस धरून त्यांना बाहेर काढणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला जीवनदान दिले’, असे त्यांनी सांगणे : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर यजमानांना पूर्वजांच्या त्रासाविषयी कळले. तेव्हा त्यांनी नाशिक येथे जाऊन ‘नारायण नागबळी’ हा विधी केला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या कुंडात अंघोळ करतांना यजमान कुंडात बुडत होते. तेव्हा एका धिप्पाड व्यक्तीने यजमानांचे केस धरून त्यांना बाहेर काढले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आले आणि त्यांनी मला जीवनदान दिले’, असे ते म्हणाले. तेव्हापासून त्यांनी प्रतिदिन ‘भीमरूपी महारुद्रा…’ हे मारुतिस्तोत्र म्हणायला प्रारंभ केला.

१६. रुग्णाईत असतांना सतत ‘प.पू. डॉक्टर’ असा धावा करणे आणि गुरुस्मरण अन् नामजप करत असतांनाच देहावसान होणे

रुग्णाईत असतांना ते सतत ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा धावा करत होते. त्यांचा ‘निर्गुण’ हा नामजप सतत चालू होता. अखंड गुरुस्मरण आणि नामजप करत असतांनाच त्यांचे देहावसान झाले. त्यांना इतर विचार करायला वेळच मिळाला नाही. ही केवळ आणि केवळ गुरुकृपाच आहे.

१७. ‘त्यांची निर्गुणाकडे वाटचाल होत आहे’, असे मला वाटले.

१८. कृतज्ञता

‘साधना केल्यावर भगवंत नराचा नारायण करतो आणि दगडाला मूर्तीचा आकार देतो’, हे मला अनुभवता आले. गुरुदेव सर्वकाही करवून घेतात. त्यांची केवढी कृपा ! आपण केवळ नाममात्र आहोत. त्यांच्या हातातील बाहुले आहोत.

‘गुरुदेवांनी या साधनाप्रवासात त्यांना फुलासारखे सांभाळले. त्यांना कोणतीही झळ पोचू दिली नाही आणि चरणी लीन करून घेतले’, याविषयी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (पत्नी), वर्धा (२१.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक