‘माझ्या बहिणीचे यजमान श्री. प्रकाश काशीनाथ वर्तक यांचे २३.५.२०२० या दिवशी घशाच्या कर्करोगाने निधन झाले. प्रकाश यांचे २३.६.२०२१ या दिवशी वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात अन् मृत्यूच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. शांत आणि मनमिळाऊ
१. प्रकाश वर्तक यांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता. मी त्यांना कधी स्वतःच्या मुलींनाही रागावल्याचे पाहिले नाही, तसेच माझ्या बहिणीशीही ते कधी रागावून किंवा चिडून बोलल्याचे ऐकले नाही. ते कधी कुणावर रागावले नाहीत किंवा कुणाशी कधी मोठ्याने बोलले नाहीत. सर्वांशीच ते आदराने बोलायचे.
२. त्यांचा स्वभाव शांत आणि मनमिळाऊ असल्याने त्यांचा मित्रपरिवार अन् ओळखी आधुनिक वैद्यांपासून समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी होत्या.
१ आ. अभिनयाची आवड असणे : त्यांना अभिनयाची फार आवड होती आणि ते गाणीही छान म्हणायचे. गणपतीच्या कार्यक्रमात नाटक बसवून त्यात काम करायची त्यांची इच्छा होती. ते ३ वर्षांपूर्वी दुबईहून मुंबईला परत आले. तेव्हा त्यांनी अभिनयाची शिकवणी लावली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर छोटी-मोठी कामे केली. देवानेच त्यांची ही हौस पूर्ण केली.
१ इ. इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करण्यास सदैव तत्पर असणे : गेली ४२ वर्षे प्रकाश दुबई येथे नोकरी आणि व्यवसाय करत होते. त्या काळात त्यांनी दुबईतील अनेक मराठी गरजूंना साहाय्य केले. त्यांनी दुबईमध्ये नवीन आलेल्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी साहाय्य केले. मुंबईहून दुबई येथे कार्यक्रमासाठी गेलेल्या पुष्कळ मराठी कलाकारांनाही प्रकाश नेहमीच निरपेक्षभावाने साहाय्य करत असत. त्यांनी या ओळखीचा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी कधीच लाभ करून घेतला नाही.
१ इ १. धनसंचय न करता केवळ इतरांसाठी जगणे : प्रकाश यांनी कधी स्वतःसाठी किंवा कुटुंबियांसाठी धनसंचय केला नाही. ते केवळ इतरांसाठी जगले. समाजामध्ये गरिबातील गरीब माणूसही आपला आणि आपल्या कुटुंबियांचा विचार करतो अन् त्यांच्या भविष्याची सोय करून ठेवतो; पण प्रकाश यांनी असा विचार कधीच केला नाही. ‘सगळ्यांना साहाय्य करणे’, हे त्यांच्या रक्तातच भिनले होते. संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे पैसे मिळवण्याकडे त्यांचे लक्ष नव्हते.
१ ई. ‘स्वतःमुळे मित्राची हानी व्हायला नको’, यासाठी व्यवसायातील हानी स्वतः सोसणे : त्यांनी दुबई येथील एका आधुनिक वैद्य मित्राच्या समवेत ‘लॉन्ड्री’चा व्यवसाय चालू केला. तेथील कामगारांना त्रास होऊ नये; म्हणून काही वेळा प्रकाश स्वतःच कष्ट करायचे. ‘लॉन्ड्री’ व्यवसायात काही कारणामुळे हानी होऊ लागली. ‘माझ्यामुळे माझ्या मित्राची हानी व्हायला नको,’ असा विचार करून त्यांनी सर्व हानी स्वतःच सोसली.
१ उ. साधनेची आवड असणे
१. त्यांच्या काही गुजराती मित्रांमुळे ते ‘स्वामीनारायण’ पंथानुसार साधना करत होते.
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार मी सांगितलेला कुलदेवीचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ते मनापासून करायचे. मी त्यांना दिलेले दत्ताचे चित्र ते नेहमी त्यांच्या खिशात ठेवायचे. त्यांच्या निधनाच्या वेळीही ते चित्र आणि जपमाळ त्यांच्या समवेत होती.
३. प्रकाश यांनी दुबई येथे गणपति बसवण्यास आरंभ केला. आजही त्यांचे मित्र आधुनिक वैद्य बावरे यांच्याकडे गणपति बसवण्यात येतो. यामध्ये प्रकाश यांचा मोठा वाटा आहे.
२. शेवटचे आजारपण
२ अ. कर्करोग झाल्याचे निदान होणे आणि त्यांची २ शस्त्रकर्मे होऊन ती यशस्वी होणे : प्रकाश यांना प्रथम ‘दाढेचे ‘रूट कॅनल’ व्यवस्थित न झाल्यामुळे गिळायला आणि बोलायला त्रास होत आहे’, असे वाटत होते. त्यासाठी ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले. तेव्हा त्यांच्या घशाला झालेल्या गाठीची ‘बायॉप्सी’ केली. तेव्हा ‘ती गाठ कर्करोगाची आहे’, असे निदान झाले. त्यानंतर ती गाठ काढण्यासाठी त्यांची २ शस्त्रकर्मे करण्यात आली. पहिल्या शस्त्रकर्माच्या वेळी जिभेच्या कडेचा भाग काढण्यात आला आणि नंतर घशापाशी असलेली गाठ काढण्याचे शस्त्रकर्म करण्यात आले. ती दोन्ही शस्त्रकर्मे यशस्वी झाली आणि आठच दिवसांत ते उठून चालू-फिरू लागले.
२ आ. कावीळ होऊन यकृत निकामी होणे : कर्करोगाचे शस्त्रकर्म झाल्यावर काही दिवसांनी त्यांच्या आणखी काही चाचण्या कराव्या लागल्या. त्यासाठी कितीतरी वेळा ‘सोनोग्राफी’, ‘एम्.आर्.आय.’, तसेच रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. मार्चमध्ये ‘त्यांना कावीळ होऊन त्यांचे यकृत (लिव्हर) निकामी झाले आहे’, असे सांगण्यात आले.
२ इ. ‘कोरोना’च्या संसर्गामुळे नातेवाइकांना रुग्णालयात येण्यास बंदी केली जाणे, काही दिवसांनी कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्यामुळे प्रकाश यांना रुग्णालयातून घरी पाठवणे आणि ते केवळ पातळ पेय घेत असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत जाणे : मार्च आणि एप्रिल या दोन मासांत त्यांच्यावर बरेच उपचार करण्यात आले. एवढ्यात ‘कोरोना’चे वादळ आले आणि सर्व वैद्यकीय विभाग ‘कोरोना’च्या मागे धावू लागला. प्रकाश यांना भरती केले होते, ते नायर रुग्णालय ‘कोरोना’च्या रुग्णांसाठी रिकामे करण्यात आले. त्या वेळी ‘कोरोना’मुळे सर्व नातेवाइकांना रुग्णालयात येण्यास बंदी केली होती. केवळ माझी बहीण प्रतिदिन शेजारच्या एका मुलाच्या साहाय्याने रुग्णालयात जात होती. प्रकाश यांच्या सेवेसाठी एक साहाय्यक मुलगा (वार्ड बॉय) ठेवला होता. ‘कोरोना’मुळे ‘प्रतिदिन रुग्णालयात जाणे’, हे फार धोक्याचे झाले होते; म्हणून मी बहिणीला ‘तू प्रतिदिन रुग्णालयात जाऊ नकोस’, असे सांगूनही ती जात होती. प्रकाश यांच्यावर उपचार चालू असूनही त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. त्यांच्याकडून औषधोपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. मे २०२० मध्ये ‘कोरोना’चा प्रभाव अधिकच वाढल्याने नायर रुग्णालयातील सर्व रुग्णांना घरी पाठवण्यात आले. घरी आल्यावर माझ्या बहिणीने त्यांची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली होती; परंतु यकृत निकामी झाल्यामुळे प्रकाश केवळ पातळ पेयच घ्यायचे. त्यामुळे त्यांची प्रकृती क्षीण होत गेली.
२ ई. ‘नामजप करणे, स्तोत्रे आणि भजने ऐकणे’, यांमध्ये आनंदी असणे आणि बहिणीने केलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा लाभ न होणे : प्रकाश ‘नामजप करणे, स्तोत्रे आणि भजने ऐकणे’, यांमध्ये अगदी आनंदी असायचे. माझ्या बहिणीने त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. तिने २ – ३ वेळा त्यांच्यावरून मीठ-भाकरीचा उतारा काढला. गायीला पान दिले; परंतु त्याचा परिणाम होत नव्हता. ती आणि त्यांच्या सेवेसाठी ठेवलेला मुलगा या सर्व परिस्थितीला सामोरे जात होते.
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने प्रकाश यांची सर्व त्रासांतून मुक्तता होऊन त्यांचे देहावसान होणे आणि त्यांचे छायाचित्र पाहून सद्गुरु गाडगीळ यांनी ‘ते योग्याप्रमाणे दिसत आहेत’, असे सांगणे
ही सर्व परिस्थिती पाहून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्यांचे छायाचित्र दाखवून नामजपादी उपाय विचारले. सद्गुरु गाडगीळकाकांनी परत मीठ-भाकरीचा उतारा काढायला आणि बहिणीला एक जप करायला सांगितला. दोनच दिवसांत या उपायांचा परिणाम झाला आणि प्रकाश यांची सर्व त्रासांतून मुक्तता झाली. देवाने त्यांना अलगद उचलले. सद्गुरु गाडगीळकाकांना प्रकाश यांचे छायाचित्र पाहून एकदम आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘या व्यक्तीची साधना चालू आहे; म्हणूनच केवळ ते जिवंत आहेत. ते योग्याप्रमाणे दिसत आहेत.’’
४. मोहमायेमध्ये आकंठ बुडालेल्या आजच्या या जगात मायेशी न जोडता माणसे जोडणारे प्रकाश !
‘प्रकाश यांचे निधन झाले’, हे कळल्यावरही मला रडू आले नव्हते; पण त्यांच्या मित्रांनी शोकसभेत वाहिलेल्या श्रद्धांजलीची ध्वनी-चकती ऐकतांना माझी भावजागृती झाली. खरेतर त्यांची गुणवैशिष्ट्ये मला ठाऊक होती, तरीही ती ध्वनी-चकती ऐकतांना मला अश्रू आवरले नाहीत. काही लोक योग्याचे आयुष्य जगतात, तसेच आयुष्य प्रकाश जगले. दुबईमध्ये राहून त्यांनी माया जमवली नाही; मात्र माणसे जोडली. मागील २५ वर्षांपासून ते पूर्ण शाकाहारी झाले होते. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश एका योग्याप्रमाणे जीवन जगल्याचे त्यांच्या मित्रमंडळींनी दुबई येथे घेतलेल्या शोकसभेमध्ये व्यक्त केलेल्या भावनेतून माझ्या लक्षात आले.
५. बहिणीने दाखवलेले धैर्य !
प्रकाश रुग्णाईत झाले, तेव्हा मी रामनाथी आश्रमात होते. ‘कोरोना’मुळे लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे मी बहिणीला साहाय्य करण्यासाठी जाऊ शकले नाही. या कठीण काळात तिने दाखवलेले धैर्य वाखाणण्यासारखे आहे. तिचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. तिने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता प्रकाश यांची शेवटपर्यंत मनापासून सेवा केली आणि आई-बाबांनी केलेल्या संस्कारांनुसार उत्तम आचरण केले. याविषयी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.
६. श्री गुरुचरणी केलेली प्रार्थना
‘प्रकाश हे एक वेगळेच व्यक्तीमत्त्व होते. समाजामध्ये आणि आपल्या जवळपास, असे काही योगी किंवा साधक असतात; परंतु आपल्याला त्यांना ओळखता येत नाही. प्रकाश यांच्याविषयी ही जाणीव मला त्यांच्या अंतकाळात झाली; म्हणून मला खंत वाटली. ‘प्रकाश यांची उत्तरोत्तर प्रगती होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२०)