नागपूर येथे कोरोनापेक्षा ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण दुप्पट वाढल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम !

शासकीय आणि खासगी रुग्णालयांत ‘म्युकरमायकोसिस’चे ४२८ रुग्ण भरती !

म्युकरमायकोसिस

नागपूर – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झाला असला, तरी ‘म्युकरमायकोसिस’ने (काळी बुरशी) या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाचे २१० अत्यवस्थ रुग्ण भरती झाले आहेत, तर त्याहून दुप्पट म्हणजे ४२८ ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयांत भरती झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत कोरोनाबाधितांच्या तुलनेत ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण दुपटीहून अधिक असल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे.

१. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे १ सहस्र १०२ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी २१० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून ८९२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार चालू आहेत.

२. जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण १ सहस्र ४७५ रुग्ण आढळले. त्यातील १ सहस्र ७२ रुग्णांवर शस्त्रकर्म झाले असून ९१६ रुग्णांना रुग्णालयांतून घरी पाठवले.

३. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांत ‘म्युकरमायकोसिस’चे ५४६ रुग्ण विविध रुग्णालयांत भरती आहेत. त्यातील ७८.३८ टक्के म्हणजे ४२८ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. इतर ११८ रुग्ण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या ४ जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांत आहेत. गडचिरोलीत या आजाराचा एकही रुग्ण नाही.

४. ‘‘प्रशासनाच्या यशस्वी नियोजनातून कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात अल्प झाले असून ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयांत आवश्यक सोय केली आहे. या रुग्णालयांत वेळोवेळी आवश्यक औषधे, ‘इंजेक्शन’सह इतरही साहित्यांचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाप्रमाणे लवकरच ‘म्युकरमायकोसिस’चेही रुग्ण उपचारातून यशस्वीपणे बरे होतील’, असे मत येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी व्यक्त केले आहे.