सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ जूनपासून सर्व दुकाने आणि आस्थापने चालू होणार

कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) ९.०६ टक्के असून ५५.२० टक्के ऑक्सिजन खाटा व्यापलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा ‘स्तर ३’ मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी २१ जून या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ते २८ जून २०२१ या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. यानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने आणि आस्थापने सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील, तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार हे ५ दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील. यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उपरोक्त आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांवर कायद्यांतील तरतुदींप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे बहुतांश व्यवहार आणि दुकाने बंद आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे २१ जूनपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने चालू करणार, अशी चेतावणी काही ठिकाणच्या व्यापार्‍यांनी दिली होती; मात्र शासनाच्या नवीन आदेशामुळे आता सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.