गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

  • कोरोना महामारीच्या काळात उत्पन्नाचे स्रोत घटलेल्या पारंपरिक व्यावसायिकांना ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य

  • सहा मासांत १० सहस्र नोकरभरती करणार

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १८ जून (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात उत्पन्नाचे स्रोत घटलेले पारंपरिक व्यावसायिक, ‘मनरेगा’ कामगार आणि व्यावसायिक यांना एकरकमी प्रत्येकी ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. ६ मासांत १० सहस्र जागांवर नोकरभरती केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील आझाद मैदानात क्रांतीदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली.

प्रारंभी आझाद मैदानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली. यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कोरोनामुळे घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला प्रत्येकी २ लक्ष रुपयांचे साहाय्य संबंधित उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आठवडाभरात देण्यात येणार आहे. नवीन झुआरी पूल, अटल सेतूचा अंतिम टप्पा, पेडणे ते काणकोण महामार्ग रूंदीकरण आदी कामे सरकार १९ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करणार आहे. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेली घरे आणि भूखंड खरेदीदारांच्या नावावर करण्यासाठी ‘भूमी अधिकारिता कायदा’ सिद्ध केला जाणार आहे. राज्यात ३ खासगी विद्यापिठे उभारणार आहे.’’