अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात एजंटगिरी खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील बैठकीत बोलतांना राजेश क्षीरसागर आणि अन्य

कोल्हापूर, १९ जून – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्जमर्यादा वाढवणे, मराठा तरुणांच्या शासकीय चाकरभरतीच्या रखडलेल्या नियुक्त्यांना पर्याय देण्याचा, तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २३ जिल्ह्यांत वसतीगृहे उभारणे, असे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले आहेत. तरी यापुढील काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात कोणत्याही प्रकारची एजंटगिरी खपवून घेणार नाही, अशी चेतावणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची १८ जूनला प्राथमिक बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली त्या प्रसंगी त्यांनी ही चेतावणी दिली.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, आजची बैठक प्राथमिक स्वरूपाची असून, पुढील काळात राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ६ विभागीय बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. मराठा समाजातील युवकांना सक्षम करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात महामंडळाच्या सुटसुटीत कारभाराकडे आपला कल असेल. मराठा समाजातील युवा उद्योजकांना कर्ज पुरवठा करून उद्योजकांना सक्षम करण्याचे उद्देश असून यात कोणी टक्केवारीने मराठा युवकांच्या हक्काचे पैसे लाटत असेल, तर त्याची आपल्याशी गाठ असेल ?

या वेळी कौशल्य विकास रोजगारचे साहाय्यक आयुक्त संजय माळी, बँक ऑफ इंडिया अग्रणीचे जिल्हा प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे, जिल्हा समन्वयक सतीश माने, शिवसेनेचे किशोर घाटगे उपस्थित होते.