मुंबई येथे लसीकरण घोटाळा प्रकरणी ४ जणांना अटक !

लसीकरणाच्या नावाखाली ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’तील नागरिक आणि ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ आस्थापनातील कर्मचारी यांची फसवणूक !

फसवणूक करणार्‍यांकडून घेतलेले पैसे वसूल करायला हवेत, तसेच अशांना कठोरात कठोर शासन झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – जिल्ह्यातील कांदिवली परिसरात ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’तील लोकांचे बनावट लसीकरण करण्यात आले असून तेथील रहिवासी हे लसीकरण घोटाळ्याचे बळी पडल्याची तक्रार सोसायटीने केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे, तसेच मध्यप्रदेशातील सतना येथून करीम नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. केवळ सोसायटीच नव्हे, तर ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ या आस्थापनानेही त्यांच्या कर्मचार्‍यांची लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. पोलीस सध्या अन्वेषण करत असून हा मोठा घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घोटाळ्यामागे अंबानी रुग्णालयातील कर्मचारी असल्याचा संशय आहे.

१. घोटाळा उघड झाल्यानंतर करीम याने मुंबई येथून पळ काढला होता. करीम यानेच लसींचा पुरवठा केल्याचा संशय आहे.

२. सोसायटीमधील रहिवाशांना देण्यात आलेल्या लसींच्या डोसची वैधताही पोलिसांकडून पडताळली जात आहे. पोलीस सध्या महापालिकेच्या अहवालाची वाट पहात आहेत.

३. पोलिसांकडून सध्या दोन्ही तक्रारींची चौकशी केली जात आहे.

४. ‘एस्.पी इव्हेंट’च्या माध्यमातून ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’चे जवळपास १५० कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना २६ मे या दिवशी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

५. महत्त्वाचे म्हणजे याच ‘एस्.पी. इव्हेंट’च्या गटाने कांदिवलीतील ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’त लसीकरण मोहीम राबवली होती. रुग्णालयाचे माजी कर्मचारी राजेश पांडे आणि त्यांचे सहकारी संजय गुप्ता यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात आले होते.

६. ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’च्या एका कर्मचार्‍याने सांगितले की, लसीचा डोस दिल्यानंतर आम्हाला कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले नाही. आस्थापनाने ‘बॅकलॉग’ असल्याने ‘एका आठवड्याने प्रमाणपत्र देऊ’, असे सांगितले. लसीकरणानंतरची कोणतीही लक्षणे न जाणवल्याने आम्ही सगळे चिंतेत होतो.

७. ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’त ३० मे या दिवशी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोसायटीच्या आवारातच झालेल्या या शिबिरात ३६० नागरिकांना ‘कोव्हिशिल्ड’ लस देण्यात आली.

८. राजेश पांडे असे शिबिराची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तीचे नाव असून त्याने स्वतःला ‘कोकीलाबेन अंबानी रुग्णालया’चा प्रतिनिधी असल्याचे सोसायटीतील नागरिकांना सांगितले होते. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता, तर संजय गुप्ता याने शिबिर घेतले होते. महेंद्र सिंग या व्यक्तीने सोसायटीतील सदस्यांकडून रोख पैसे घेतले होते, अशी माहिती शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे.

९. लस घेतलेले हितेश पटेल म्हणाले, ‘‘माझ्या मुलाने एका डोससाठी १ सहस्र २६० रुपये दिले; पण लस घेतल्यानंतर आम्हाला कोणताही संदेश आला नाही, तसेच आम्हाला लस घेतांना छायाचित्रही काढू दिले नाही.’’ सोसायटीतील नागरिकांनी प्रती डोस १ सहस्र २६० रुपये याप्रमाणे ५ लाख रुपये दिले आहेत, अशी माहिती संबंधित सदस्यांनी दिली.