आज १८ जून २०२१ या दिवशी पू. बन्सीधर तावडेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
१. अध्यात्माची आवड
पू.तावडेआजोबा नोकरीनिमित्त अनेक वर्षे गुजरात येथे राहिले. तेथे नोकरी करत असतांना ते कथा-कीर्तने आणि संतांचे मार्गदर्शन, अशा कार्यक्रमांना जायचे अन् त्या माध्यमातून जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. त्या कालावधीत काही संत-महात्म्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा अध्यात्माचा प्रवास चालू होता.
२. जिज्ञासू वृत्ती
वर्ष १९९७ मध्ये ते सनातनच्या संपर्कात आले. त्यांना ‘साधकांकडून किती आणि कसे जाणून घेऊ ?’, याचा सतत ध्यास असायचा. पू. आजोबा त्यांच्याकडे येणार्या साधकांना प्रश्न विचारून शंकानिरसन करून घ्यायचे.
३. आनंदी आणि उत्साही
पू. आजोबा नेहमी आनंदी, उत्साही आणि हसतमुख असायचे. त्यांच्या साधनेचे तेज त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमीच झळकत असे.
४. अभ्यासू वृत्ती
ते साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमितपणे वाचन करायचे. सनातनचे विविध ग्रंथ हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता.
५. साधकांना पू. तावडेआजोबांचे घर हक्काचे वाटणे
पू. आजोबांचे घर साधकांना हक्काचे घर वाटत असे. डिगस गावाच्या सभोवतालच्या ६ – ७ खेड्यांत प्रसार चालू असतांना काही साधक त्यांच्याकडे ६ – ७ मास रहायला होते.
पू. आजोबांच्या घरातील सर्व व्यक्तींना साधनेत रुची होती. त्यांना साधकांविषयी जवळीक वाटायची. त्या वेळी अनेक साधकांच्या मार्गदर्शनाचे आयोजन पू. आजोबांच्या घरी असायचे.
६. समष्टी साधनेची तळमळ
त्यांना सत्संगात समजलेली सूत्रे ते लगेच कृतीत आणण्याचा प्रयत्न करायचे. ते साधकांसह उत्साहानेे प्रसारसेवेसाठी जायचे. त्यांनी गावागावांत झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळी सेवा केली. त्यांनी ‘गुरुपौर्णिमेचे अर्पण मिळवणे, मोहिमांत सहभागी होणे’ इत्यादी सेवा केल्या. त्यांच्या या कृतीतून त्यांच्यातील ‘समष्टी साधनेची तळमळ, चिकाटी आणि सेवाभाव’, असे गुण लक्षात येत असत.
७. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा प.पू. गुरुदेवांविषयीचा भाव जाणवायचा.
८. प.पू. गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधनामार्गा’चे श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवणे
पू. आजोबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस या खेडेगावात रहायचे. परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि त्यांची कृपा यांमुळे पू. आजोबा गुरुकृपायोगानुसार साधना करून २० ते २२ वर्षांत संत झाले. ‘जगाच्या कुठल्याही कोपर्यात एखादा जिज्ञासू तळमळीने साधना करत असेल, तर तेथेही त्याला देव अनेक माध्यमांतून मार्गदर्शन करतो आणि संतपदापर्यंत पोचवतो’, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. एक वेळ सिंहाच्या जबड्यातून त्याची शिकार निसटू शकेल; परंतु गुरूंच्या चरणी शरण आलेला शिष्य त्यांच्या हातून निसटणे केवळ अशक्य असते. पू. आजोबांचे जीवन असेच आहे.
‘पू. आजोबांसारखी तळमळ, भाव आणि श्रद्धा आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण होऊ दे’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
– श्री. प्रकाश मालोंडकर, राऊरकेला, ओडिशा. (१४.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाचयेतील असे नाही. – संपादक |