१. यशोदामाता यमुना नदीत दीपदान करत असतांना बाळकृष्ण एका काठीच्या साहाय्याने काही दीप नदीच्या पाण्यातून बाहेर काढत असतांना त्याने ‘सर्व दीपांना न वाचवता केवळ माझ्या दिशेने येणार्या दीपांना बुडण्यापासून वाचवत आहे’, असे यशोदामातेला सांगणे
‘एकदा भावसत्संगाच्या संहितेतील एक अतिशय सुंदर प्रसंग माझ्या वाचनात आला. एकदा यशोदामाता यमुना नदीत दीपदान करत होती. त्या वेळी ‘काही दीप नदीच्या प्रवाहातून पुढे न जाता एका विशिष्ट ठिकाणी थांबून अदृश्य होत आहेत’, असे तिच्या लक्षात आले. बाळकृष्ण एका काठीच्या साहाय्याने काही दीप नदीच्या पाण्यातून बाहेर काढत असल्याचे तिला दिसले. ते पाहून ती त्याला विचारते, ‘‘माझ्या बाळा, कृष्णा, हे तू काय करत आहेस ?’’ त्यावर कृष्ण निरागसपणे म्हणतो, ‘‘आई, मी या दीपांना बुडण्यापासून वाचवत आहे.’’ यशोदामाता हसून म्हणते, ‘‘हो का. तू कुणाकुणाला वाचवणार आहेस ?’’ त्यावर बाळकृष्णाने दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. तो म्हणतो, ‘‘आई, मी स्वतःच्या मार्गाने पुढे जाणार्या दीपांना वाचवत नाही, तर केवळ माझ्या दिशेने येणार्या दीपांनाच वाचवत आहे.’’
२. बाळकृष्णाने वाचवलेले दीप, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या छत्रछायेखाली घेतलेले साधक !
हा प्रसंग वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला अन् हे चित्र साकारले. ‘बाळकृष्णाने वाचवलेले दीप अन्य कुणी नसून आपण सर्व साधक आहोत’, याची मला जाणीव झाली. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना त्यांच्या छत्रछायेखाली घेतले आहे. तेच आपल्याकडून साधना करवून घेत आहेत आणि मायेच्या जाळ्यातून आपली सुटका करत आहेत. गुरुदेव साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवून मोक्षाच्या दिशेने नेत आहेत.
३. साधनामार्गावर आईच्या मायेने आणि संयमाने सांभाळून घेणार्या सच्चिदानंदस्वरूप, परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
हे सच्चिदानंदस्वरूप, परब्रह्मस्वरूप भगवंता, आम्ही या संसार सागरात दिशाहीन होऊन भरकटत होतो आणि जीवनाचा उद्देश विसरून गेलो होतो; मात्र देवा, तुम्ही आम्हाला ओळखत होतात. आपणच आम्हाला साधना शिकवून स्वतःच्या दिशेने वळवून घेतलेत. साधनामार्गावर आम्ही अडखळलो; पण आपणच आम्हाला आईच्या मायेने आणि संयमाने सांभाळून घेतलेत. साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून आम्हाला पुढे घेऊन गेलात. देवा, आपण आम्हाला कधीच सोडले नाहीत; परंतु आम्हीच कृतघ्नपणे आपल्याला विसरलो. आम्ही केवळ गुरूंच्याच नाही, तर ‘साक्षात् परमेश्वराच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत’, याची आम्हाला जाणीवही नव्हती. ‘गुरुदेव, आमच्यासारख्या जड जिवांना आपल्या खर्या स्वरूपाची ओळख पटावी’, यासाठी महर्षींना त्यांची अपार शक्ती आणि सामर्थ्य व्यय करावे लागले. कृतज्ञता म्हणून आम्ही आपल्या चरणी काय अर्पण करू ? आपल्या चरणी अर्पण करण्यासाठी आमच्याकडे आमचे असे काहीही नाही. गुरुदेव, आमच्याकडे जे काही आहे, ते सर्व आपणच दिलेले आहे. आपणच आमच्याकडून सर्वकाही करवून घेत आहात. प्रभु, आम्ही स्वतःलाच आपल्या चरणकमलांवर अर्पण करतो.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१२.६.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |