आईच्या (सौ.) द्रुपदा दगडू पांगुळ (वय ६५ वर्षे) यांच्या) निधनानंतर श्री. रामचंद्र पांगुळ यांची झालेली विचारप्रक्रिया आणि त्यांनी केलेले साधनेचे प्रयत्न

‘३१.१०.२०१९ या दिवशी पहाटे ५ वाजता माझ्या आईचे (सौ. द्रुपदा दगडू पांगुळ (वय ६५ वर्षे) यांचे) निधन झाल्याचे ऐकून माझा त्यावर विश्वासच बसला नाही. नंतर मी विचार केला, ‘या प्रसंगात माझी साधना होण्यासाठी आणि आईच्या आत्म्याला गती मिळण्यासाठी मी कसे प्रयत्न करू शकतो ?’ त्यानंतर मी देवाला प्रार्थना करून आणि देवाने सुचवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत गेलो. त्या वेळी माझ्याकडून झालेल्या प्रयत्नांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) द्रुपदा पांगुळ

१. अंत्यविधीसाठी गावाला जायला निघण्यापूर्वी केलेली पूर्वसिद्धता

अ. आईचे निधन गावाला (भोर, जि. पुणे) झाल्यामुळे सर्व विधी होईपर्यंत, म्हणजे १४ दिवस मला गावी थांबावे लागणार होते. त्या दृष्टीने मी सेवांचे नियोजन आणि हस्तांतरण केले.

आ. आश्रमात जशी सेवेची पूर्वसिद्धता करतात, त्याप्रमाणे आईचे अंत्यविधी चांगले होण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतले.

२. प्रवासात नामजप करणे आणि कुटुंबियांना जपाचे महत्त्व सांगून नामजप करायला प्रेरित करणे

श्री. रामचंद्र पांगुळ

मी गावाला जातांना प्रवासात आईसाठी वैखरीतून वेगवेगळ्या प्रार्थना करत होता. माझ्यासह असलेला मोठा भाऊ आणि लहान बहिणी यांना मी धीर देत होतो. मी कुटुंबीय आणि गाडीतील अन्य नातेवाईक यांना नामजपाचे महत्त्व सांगून स्वतः वैखरीतून नामजप करत होतो. गाडीतील सर्वांना मृत्यूविषयीचे शास्त्र सांगितल्याने माझ्या आणि त्यांच्या मनाची या प्रसंगासाठी सिद्धता होत होती. त्यामुळे माझ्या मनात ‘घरी पोचल्यावर भावनाशील होऊन न रडता जप करायचा आणि अन्य नियोजनात सहभाग घ्यायचा’, असे विचार येऊ लागले.

३. आईच्या अंत्यविधीच्या वेळी केलेले प्रयत्न

अ. आईच्या मृतदेहाला अंघोळ घालतांना मी नामजप करून ‘तिच्या लिंगदेहाला संरक्षण मिळावे’, यासाठी प्रार्थना करत होतो.

आ. अंत्ययात्रेच्या वेळी मी सर्वांना दत्ताचा नामजप करायला सांगितला. त्याच वेळी घरात भ्रमणभाषवर भजने आणि जप लावून ठेवायला एका साधकाला सांगितले. त्याने त्याप्रमाणे केले.

इ. तिसर्‍या दिवशी माझ्याकडून घरातील व्यक्तींना ‘आईसाठी काय करू शकतो ?’, हे सांगण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व जण सकारात्मक झाले. मी सुचवलेले प्रयत्न करण्यास सिद्ध झाले.

ई. दशक्रिया विधीच्या वेळी नातेवाइकांना आध्यात्मिक वस्तू भेट स्वरूपात देण्याचे ठरवले. त्या वेळी सनातन-निर्मित देवतेचे मोठे चित्र, एक लघुग्रंथ, नामपट्ट्या इत्यादींचे वाटप केले. तेव्हा एकूण ३ सहस्र रुपयांचे साहित्य वितरीत झाले.

उ. गावात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या घरातील व्यक्ती लगेचच अन्य कामे करण्यास आरंभ करत नाहीत; मात्र आम्ही सर्वांनी चौथ्या दिवशीच शेतीच्या कामास आरंभ केल्याने ‘आम्हाला त्यातून एक प्रकारचे चैतन्य मिळत आहे’, असे जाणवत होते.

​मला मी वाचलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या वागण्याच्या संदर्भातील प्रसंगाची आठवण झाली. मी ते इतरांना सांगून तसे वागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘भावनिक विचार न येता आध्यात्मिक स्तरावर काय करू शकतो ?’, हा विचार होऊन तसे प्रयत्न होत गेले.

ऊ. ‘आईच्या आत्म्याला गती मिळावी’, यासाठी मी प्रतिदिन ६ घंटे दत्ताचा नामजप करण्याचा प्रयत्न केला.

ए. मी भेटायला येणार्‍या लोकांना साधना सांगत होतो.

ऐ. एक वर्षापूर्वी आई देवद आश्रमात आली होती. त्यानंतर एक वर्षाने तिचे निधन झाले. आश्रमात जाऊन आल्यापासून तिच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ पालट झाल्याचे गावातील सर्वांनी सांगितले. आम्हालाही पालट जाणवत होता. त्यामुळे ‘ती मुक्त झाली असणार’, असे वाटते.

४. मृत्यूसारख्या प्रसंगाच्या वेळी देवाने लक्षात आणून दिलेले दृष्टीकोन

आईच्या मृत्यूनंतर प्रत्येक प्रसंगात देव मला (मी सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढावा गटात असल्याने त्यांच्या माध्यमातून) गुरुदेवांनी सांगितलेले दृष्टीकोन लक्षात आणून देत होता. त्यामुळे मला त्या प्रसंगात अडकायला झाले नाही. त्यांपैकी काही दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

अ. मी झोपेतून उठल्यावर ‘आईचा मृत्यू झाला’, हे कळल्यावर ‘हे असे कसे झाले ?’, असे वाटून मला ते स्वीकारता येत नव्हते.

अ १. दृष्टीकोन : प्रत्येक जिवाला मृत्यू अटळ आहे. त्यामुळे हे स्वीकारायलाच हवे. परिस्थितीला दोष न देता ‘वर्तमान स्थितीत साधना म्हणून काय करू शकतो ?’, याचा विचार होऊन मी तसे प्रयत्न चालू केले.

आ. दिवाळीनिमित्त मी सासुरवाडीला गेलो होतो. तेथे जाऊन आल्यावर मी आयुर्वेदिक सेवा चालू करणार होतो; परंतु ज्या रात्री मी सासुरवाडीवरून आलो, त्याच्या काही घंट्यांनंतर पहाटे मला माझ्या आईच्या मृत्यूचे वृत्त समजले. तेव्हा ‘आता मला या सेवेला जाता येणार नाही. पुष्कळ दिवस आपल्याला सेवा-साधना करायला मिळणार नाही.’ असे विचार आले.

आ १. दृष्टीकोन : अनेक साधक प्रतिकूल परिस्थितीत साधना करतात. मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मला घरून विरोध नाही. आश्रमात सर्व परिस्थिती अनुकूल आहे. घरीही साधनेसाठी अनुकूलता आहे. ‘मला सेवा-साधना करणे’, सहज शक्य आहे’, हे लक्षात घेऊन ‘कसे प्रयत्न करायचे ?’, हे मी ठरवले आणि तसे प्रयत्न चालू केले.

इ. ‘आईचा आत्मा मुक्त झाला असेल ना ?’, असा माझ्या मनात विचार यायचा. तेव्हा मला संतांचे बोल आठवले.

इ १. मी आश्रमातून गावाला जाण्यासाठी निघतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘गावात हरिनाम सप्ताह चालू झाल्यावर काकडआरती चालू असतांना आईचा मृत्यू झाला’, ही चांगली गोष्ट आहे.’’ पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितले, ‘‘आईने तुम्हाला साधनेत विरोध न करता धर्मसेवा करायला सांगितले. यानेच त्यांना कितीतरी पुण्य मिळाले आहे. त्यांना आश्रमात येऊन उपचार घ्यायचे पुण्य मिळाले. (मार्च २०१९ मध्ये आई मणक्यांच्या व्याधीवरील उपचारांसाठी आश्रमात रहायला आली होती.) त्यांच्यावर साधनेचे संस्कार झाले. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी जप आणि प्रार्थना करायला पाहिजेत.’’

५. कृतज्ञता

या काळात प्रत्येक वेळी आश्रमातील संतांचा सत्संग आणि मार्गदर्शन लाभल्याने मनाची स्थिती सकारात्मक होण्यास साहाय्य झाले. ‘देव आपल्याला किती साहाय्य करतो’, असा विचार होऊन देव आणि संत यांच्या चरणी माझी कृतज्ञता व्यक्त होत होती.

​परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सर्व करता आले. ‘त्यांनीच साधकांना सिद्ध केले आणि अध्यात्म जगायला शिकवले’, याची प्रचीती यातून आली. याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रामचंद्र दगडू पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.११.२०१९)

सासूबाईंच्या मृत्यूच्या वेळी सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. आनंदी पांगुळ

‘माझ्या सासूबाईंच्या मृत्यूविषयीचा निरोप भ्रमणभाषवरून यजमानांनी मला सांगितल्यावर प्रथम माझा विश्वासच बसेना. मी यजमानांना म्हणाले, ‘‘अहो, तुमची आई कि माझी आई ?’’ कारण माझ्या आईचे नुकतेच हृदयाचे शस्त्रकर्म झाले होते. तिची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे माझ्या मनात आईविषयी हूरहूर होती. यजमान म्हणाले, ‘‘माझ्या आईचे निधन झाले.’’ त्यांचे बोलणे ऐकतांना मनात विचार आला, ‘यांच्या मनात नक्की काय चालू असेल ? ते ही परिस्थिती कशी स्वीकारत असतील ?’ माझे यजमान त्यांच्या आईविषयी पुष्कळ संवेदनशील होते; परंतु या वेळी ते पुष्कळ स्थिर असल्याचे मला जाणवले.

१. घरी पोचल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. आम्ही घरी पोचल्यावर गावकरी आमच्या येण्याची वाट पहात असल्याचे लक्षात आले. आम्ही घरी पोचल्यावर सासूबाईंचा मृतदेह पाहून गाडीतील सर्वांनीच हंबरडा फोडला. मला हा प्रसंग नवीनच असल्याने माझ्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता; मात्र माझे सर्व लक्ष यजमानांकडे होते. ‘त्यांच्यावर या प्रसंगाचा काय परिणाम होईल ? हे आता प्रतिसाद कसा देतील ?’, याकडे माझे लक्ष होते. त्यांनी मृत आईकडे एकटक पाहिले; तिला न्याहाळले आणि काही क्षण ते भावनांना आवरू शकले नाहीत. नंतर त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी लगेचच नियोजन करणार्‍या गावकर्‍यांना पुढील कृती करायला सुचवले आणि ते सेवेला लागले. त्या वेळी ‘परम पूज्यांनी साधकांची सिद्धता कशी करवून घेतली आहे’, याचे मला कौतुक वाटले.

आ. अग्निसंस्कार करून घरी आल्यावर ‘घरात कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे मला मुळीच वाटत नव्हते. गावातील सर्व जण असेच म्हणत होते.

इ. दहाव्या दिवशी काही महिला घरी आल्यावर त्या रडत असतांना मला घरात प्रचंड दाब जाणवला. घरातील अन्य व्यक्तींनाही हा पालट जाणवला. त्या वेळी घरातील महिलांनी त्या महिलांना सांगितले, ‘‘असे रडल्याने मृतात्म्याला पुढे जाता येणार नाही. रडू नका.’’ तेव्हा ‘गावकर्‍यांच्या पालटलेल्या मानसिकतेमागे यजमानांचे विचार होते’, हे लक्षात आले.

ई. पाहुण्यांपैकी एक महिला मला म्हणाली, ‘‘तुम्हाला सर्व शास्त्र ठाऊक आहे. तुम्ही जे कराल, ते योग्यच कराल.’’ त्यांच्या मनात हा विश्वास गुरुकृपेमुळेच निर्माण झाल्याची शाश्वती झाली.

उ. गावातील एक साधिका ‘दहाव्या दिवशी कोणत्या साहित्याचे वाटप करू शकतो ?’, याविषयी सांगत होत्या. त्यांच्या सांगण्यातील तळमळ पाहिल्यावर मला प्रसारातील साधकांविषयी पुष्कळ कौतुक वाटले.

ऊ. घरातील किंवा गावातील कोणत्याच व्यक्तीने आम्हाला कुठल्याच नियोजनात विरोध केला नाही. सर्व जण शिकण्याच्या स्थितीत राहून सहकार्य करत होते. गावातील सांघिक भाव पाहिल्यावर मला क्षणभर हिंदु राष्ट्राची स्थिती अनुभवता आला.

ए. घरात मोठ्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावला होता. काही वेळा नामजप बंद पडल्यास घरातील लहान मुले नामजप पुन्हा चालू करण्यासाठी सांगत होती. लहान मुलांना नामजपाचे महत्त्व सांगितल्याने तीही त्याविषयी सतर्क होती.

२. अनुभूती

अ. गावात पोचण्याच्या ५ – ६ किलोमीटर आधी मला ‘सासूबाई पोपटी रंगाची साडी नेसून घरापासून थोड्या अंतरावर देवळाजवळ आमची वाट पहात बसल्या आहेत’, असे दिसले. प्रत्यक्षातही त्यांनी त्याच रंगाची साडी नेसली होती.

आ. सासूबाईंना अंघोळ घालून नववस्त्र नेसवणे चालू असतांना ‘त्यांचा मृत्यू झाला आहे’, असे मुळीच वाटले नाही. ‘त्या जिवंत असाव्यात’, असेच वाटत होते. वातावरणात चैतन्य जाणवत होते. एरव्ही अशा वेळी घरात पुष्कळ दाब जाणवतो.

इ. अग्निसंस्कार करण्यासाठी नदीच्या काठावरील आमच्या शेतात एक जागा निश्चित केली होती. ते करत असतांना नदीतून दोन पिवळे नाग काठाच्या दिशेने आले. त्यातील एक सरपणावर आला. गावातील एकाने एका नागाची हत्या केली. गावकर्‍यांनी त्याला असे न करण्यास सांगूनही त्याने ते न एकता नागाची हत्या केली. त्या वेळी तेथील सर्व म्हणत होते, ‘‘सासूबाई पुष्कळ पुण्यवान होत्या; म्हणून पिवळे नाग आले असावेत.’’

ई. एके रात्री २.३० वाजता मी परसदारी गेले असता मला तेथे एक शक्ती हिरवी साडी नेसून वाकून केर काढत असलेली दिसली. तिने डोक्यावरून पदर घेतला होता. तिने माझ्याकडे पाहिलेही नाही. सकाळी उठून पाहिल्यावर मला दिसले, ‘परसदारी बराच केर होता.’ सासूबाई स्वच्छतेसंदर्भात पुष्कळ जागरूक होत्या.

उ. तेरा दिवस घरात उत्सव असल्याप्रमाणे वातावरण होते. मला आध्यात्मिक त्रास असूनही त्रास जाणवला नाही.

३. परात्पर गुरुदेवांनी साधकांची करून घेतलेली सिद्धता

अ. ‘आपत्काळात साधकांना सामान्यांना साहाय्य करायचे आहे. त्यासाठी गुरुदेव साधकांची सिद्धता करवून घेत आहेत’, हे लक्षात आले.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘अशा परिस्थितीत अन्य साधकांनी अनुभवलेली परिस्थिती’ याविषयी वाचल्यामुळे ‘आपणही कसे वागावे’, याविषयी नकळत पूर्वसिद्धता झाली.

४. कृतज्ञता

​परम पूज्य, ‘आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या एका व्यक्तीचे आपल्या जीवनातून कायमचे निघून जाणे, कसे स्वीकारायचे ?’, हे आपल्या कृपेनेच साधक शिकत आहेत. ‘या सर्व परिस्थितीत अध्यात्म कसे जगायचे ?’, हे आपणच शिकवत आहात. ‘अशा प्रसंगांमध्येही ‘साधना झाली पाहिजे’, हे आपणच आमच्यावर बिंबवत आहात. आपणच आम्हाला आत्मबळ देत आहात. परम पूज्य, साधनेच्या मार्गावर मायेतील प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आपण सदैव आमच्या समवेत आहातच. त्याविषयी आम्ही उभयता आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (डिसेंबर २०१९)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्यकरतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांतआहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्रदिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिकप्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक