वैशाख कृष्ण पक्ष एकादशी (६.६.२०२१) या दिवशी श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन झाले. १५.६.२०२१ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि जावई यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. मुलांवर देवभक्तीचे केलेले संस्कार !
१ अ. सकाळी देवाला नमस्कार करून उठायला शिकवणे : ‘आईने आम्हा पाचही भावंडांच्या मनावर ‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर प्रथम देवाला नमस्कार करूनच उठायचे’, असा संस्कार केला.
१ आ. केवळ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथा सांगून मनात देवाविषयी श्रद्धा निर्माण करणे : ‘तिने आम्हा पाचही भावंडांमध्ये लहानपणापासून देवाची ओढ निर्माण केली. तिने कधीही आम्हाला अन्य कुठल्याही कथा न सांगता नेहमी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथा सांगून आमच्या मनात देवाविषयी श्रद्धा निर्माण केली.
१ इ. भावपूर्ण देवपूजा करायला शिकवणे : आमच्या शाळेला सुटी असेल, तेव्हा ती आम्हाला देवपूजा करायला सांगायची. ‘देवाला कशी पूजा केलेली आवडेल ?’, हे तिने १ – २ वेळा स्वतः देवपूजा करून आम्हाला शिकवले. आम्हाला तसे करणे जमू लागेपर्यंत ती आमच्यासमोर थांबून आमच्याकडून देवपूजा करून घ्यायची.
१ ई. ‘मंदिरातील चैतन्याचा लाभ मिळावा’, यासाठी मुलांना मंदिरात देवाला नमस्कार करायला पाठवणे : आमच्या गावातील घराच्या शेजारी भगवान शिवाचे मंदिर आहे. आम्ही शाळेत जातांना आई आम्हाला सांगायची, ‘प्रतिदिन शाळेत जातांना अन् परत येतांना मंदिरात जाऊन नमस्कार करा आणि तिथे थोडा वेळ बसा.’ ती ‘आम्ही मंदिरात जाऊन आलो कि नाही ?’, याचा पाठपुरावाही घ्यायची. त्यामुळे आपोआपच आमच्यामध्ये देवाविषयी आवड आणि श्रद्धा निर्माण झाली.
२. मुलांकडून करवून घेतलेली साधना !
२ अ. मुलांकडून बालोपासना म्हणून घेणे : आधी आई ‘प.पू. कलावतीआई’ यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करायची. ती सकाळ-संध्याकाळ आमच्याकडूनही ‘बालोपासना’ म्हणून घ्यायची.
२ आ. काळानुसार लगेच साधनेला आरंभ करून मुलांना तसे सांगणे : काही कालावधीने आई सनातन संस्थेच्या संपर्कात आली आणि ‘काळानुसार कुठली साधना करायची ?’, हे तिला कळले. त्यानुसार तिने लगेचच साधनेला आरंभही केला. तिने आम्हालाही साधनेचे महत्त्व सांगितले. ती आमच्याकडूनही साधनेचे प्रयत्न करवून घेऊ लागली.
१. त्या वेळी मी १२ व्या इयत्तेमध्ये शिकत होते. आई आमच्याकडून सकाळ-संध्याकाळ वहीतील २ पाने भरून श्री दत्तगुरु आणि कुलदेवता यांचा नामजप लिहून घ्यायची.
२. आमच्यामध्ये नामजपाची गोडी निर्माण झाल्यानंतर ती आम्हाला समवेत घेऊन नामजपाला बसायची.
३. ‘मुलीला पूर्णवेळ साधना करता यावी’, यासाठी खंबीर राहून समाज आणि नातेवाईक यांना उत्तरे देणे
३ अ. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मुलींना सेवेला पाठवणे : आईला सनातन संस्थेची साधना कळली, तेव्हा आमच्या गावात सनातन संस्थेचे कार्य चालू झाले होते. आईने आमच्या मनावर सेवेचे महत्त्व बिंबवून आम्हाला सेवा करायला उद्युक्त केले. त्या वेळी ती मला आणि बहिणीला दूर अंतरावरही सेवेला पाठवायची. त्यामुळे गावातील लोक तिला बोलायचे. तेव्हा ती त्यांना खंबीरपणे उत्तरे द्यायची.
३ आ. नातेवाईक बोलत असूनही मुलीला साधना करण्यासाठी पाठिंबा देणे : तिने मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले. मी पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आईला आमच्या नातेवाइकांची पुष्कळ बोलणी ऐकावी लागली, तरी तिने मला साहाय्यच केले आणि पाठिंबाही दिला.
३ इ. ‘साधना करता यावी’, यासाठी कुडाळ सेवाकेंद्राजवळ घर घेणे : माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आम्ही गाव सोडून कुडाळ येथे रहाण्यास आलो. नंतर आईही पूर्णवेळ साधना करू लागली. तिने कुडाळ सेवाकेंद्राच्या शेजारी घर घेतले. आई आणि दादा तिथे रहायचे. माझ्यानंतर दादाही (श्री. मनोज खाडये) पूर्णवेळ साधना करू लागला.
४. मुलीच्या सेवेला प्राधान्य देऊन स्वतःमधील वात्सल्यप्रेमाला बांध घालणारी आई !
४ अ. ‘मुलीच्या साधनेत अडथळा येऊ नये’, यासाठी तिला घरी रहाण्यासाठी न बोलावणे : मी पूर्णवेळ साधना करू लागल्यावर वर्षातून केवळ एकदा ४ दिवसांसाठी घरी यायचे. तेव्हा तिने कधीच मला ‘अधिक दिवस रहा’, असे सांगितले नाही. काही वर्षांनी मी रामनाथी आश्रमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसार सेवेसाठी आले. तेव्हा मी कुडाळ सेवाकेंद्रात राहून सेवा करायचे. आमचे घर कुडाळमध्येच आहे, तरी आईने मला कधी ‘घरी ये’, असे सांगितले नाही.
४ आ. ‘स्वतःला भेटण्यासाठी मुलीचा वेळ जाऊ नये’, यासाठी तिला सेवेलाच प्राधान्य देण्यास सांगणे : मी प्रसाराची सेवा करायला लागल्यावर माझे सेवेनिमित्त अन्य जिल्ह्यांमध्ये जाणे व्हायचे. तेव्हा मी कधीतरीच एखाद्या सप्ताहासाठी घरी जायचे. तेव्हाही मी दिवसभर सेवेसाठी बाहेर असायचे आणि रात्री उशिरा केवळ झोपण्यासाठी घरी जायचे अन् सकाळी लवकर उठून सेवेला बाहेर पडायचे. त्यामुळे माझी आणि आईची भेट फार अल्प वेळ व्हायची, तरी तिने कधीही मला ‘एखादा दिवस तरी घरी रहा’, असे सांगितले नाही. ‘तू सेवेला प्राधान्य दे’, असेच ती मला सांगायची.
४ इ. मुलीशी बोलतांनाही ‘तुझी सेवा चालू नसेल, तर बोलूया’, असे म्हणणारी आई ! : नंतर मला इतर जिल्ह्यांत सेवा असल्याने माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणे पुष्कळ न्यून झाले. त्या वेळी मी २ वर्षे घरी जाऊ शकले नव्हते. तेव्हाही आईने मला कधी घरी येण्याविषयी विचारले नाही किंवा ‘सर्व नातेवाइक-भावंडे एकत्र जमली आहेत, तू ये’, असे सांगितले नाही. ती माझी विचारपूस करण्यासाठी कधीतरी मला भ्रमणभाष करायची. तेव्हाही ‘तू सेवेत नाहीस ना ? तरच बोलूया’, असे मला विचारून मगच ती माझ्याशी बोलायची.
४ ई. ‘मुलीने स्वतःला भेटायला येण्यासाठी वेळ द्यावा’, असे न वाटणे : १५ दिवसांपूर्वी आई अंगणात चालतांना पडली. तेव्हा तिला थोडी दुखापत झाली होती; परंतु याविषयी तिने स्वतः मला काही सांगितले नाही. मला ते वहिनीकडून कळले. तेव्हाही ‘तू मला बघायला ये’, असे न म्हणता ‘तू सेवेला प्राधान्य दे’, असेच तिने मला सांगितले.
५. संतांचे तंतोतंत आज्ञापालन करणे
‘संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत’, अशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधे चौकट असते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही ती त्या चौकटीचे तंतोतंत पालन करायची. ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला भ्रमणभाष करायची नाही. मीच तिचा आशीर्वाद घेण्यासाठी तिला भ्रमणभाष करायचे.
६. कृतज्ञता
‘माझ्यासाठी, तसेच माझी साधना चांगली व्हावी’, यासाठी तिने पहिल्यापासूनच सर्वस्वाचा त्याग केला. कुठलीही अपेक्षा न ठेवता तिने गुरुसेवेसाठी मला गुरुचरणी संपूर्ण समर्पित केले. तिच्यातील या त्यागी वृत्तीला आणि निःस्वार्थपणे केलेल्या समर्पणाला माझे भावपूर्ण कोटीशः वंदन !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये (कै. (श्रीमती) नलंदा खाडये यांची तिसरी मुलगी) (१२.६.२०२१)
स्वतःची कृती आणि मार्गदर्शन यांतून मुलांवर साधनेचे संस्कार बिंबवणार्या कै. (श्रीमती) नलंदा खाडये !
१. सौ. क्रांती मिसाळ (मोठी मुलगी), कामोठे, (जिल्हा रायगड)
१ अ. शिस्तप्रिय : ‘आई पुष्कळ शिस्तप्रिय होती. पहाटे साडेतीनला उठून आईचे नित्यनेम चालू व्हायचे. त्यात तिने कधीही खंड पडू दिला नाही. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची शिस्त तिने संपूर्ण कुटुंबाला लावली होती.
१ आ. काटकसरी : लहान असल्यापासूनच आम्हाला आईकडून अनेक गुण शिकता आले. आमची आर्थिक परिस्थिती पुष्कळ चांगली असतांनाही आई नेहमीच अगदी आवश्यक तेवढाच स्वयंपाक करायची. त्यामागे ‘अन्न वाया जाऊ नये’, असा तिचा उदात्त हेतू असायचा.
१ इ. प्रेमळ : आमचे एकत्र कुटुंब होते. आम्ही ५ आणि काकांची ५ अशी आम्ही १० भावंडे होतो. आईमधील नेतृत्व गुणामुळे तिने संपूर्ण कुटुंब सांभाळले. आईमध्ये पुष्कळ प्रेमभाव असल्याने तिने सर्व मुलांना स्वतःची मुले समजून समान प्रेम दिले.
१ ई. सतत कार्यरत रहाणे : आई आम्हाला नेहमी सांगायची, ‘कधीही रिकामे बसू नये. रिकाम्या मनामध्ये अनेक विचार येतात.’ तिचा स्वतःचा पूर्ण दिवस नियोजनबद्ध असायचा. आईने आम्हाला कधीच बाहेरून ‘रेडिमेड’ कपडे घेतले नाहीत. ती आम्हा सर्वांचे कपडे स्वतः शिवायची. घरातील सर्व कामे आटपून उरलेल्या वेळात ती सर्वांसाठी कपडे शिवायची. इतक्या जणांचे कपडे शिवण्याचा तिने कधीच कंटाळा केला नाही.
१ उ. ‘मुलीचीही साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणे
१ उ १. ‘गुरुकृपा कशी संपादन करायची ?’, याविषयी सतत सांगणे : आई साधनेत आल्यापासून ‘साधना परिपूर्ण कशी करायची ? श्री गुरूंची कृपा कशी संपादन करून घ्यायला हवी ?’, हे ती मला सतत सांगायची.
१ उ २. ‘मुलीची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच वाढदिवसाची भेट आहे’, असे सांगणे : ३०.५.२०२१ या दिवशी तिचा वाढदिवस झाला. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तुझ्यासाठी काय आणू ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘साधनेत प्रगती कर. तुझी साधनेत झालेली प्रगती, हीच माझ्यासाठी भेट असेल.’’
१ उ ३. भ्रमणभाषवरही प्रथम साधनेविषयी बोलणे : कधीही भ्रमणभाष केल्यावर ती आधी मला साधनेचे प्रयत्न विचारायची. ती मला सतत साधना करायला आणि वाढवायला सांगायची.
१ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली दृढ श्रद्धा : कोणताही प्रसंग उद्भवला, तरीही त्या प्रसंगात न डगमगता ती मला नामजप करायला सांगायची. ‘प्रसंगात गुरफटत राहू नकोस आणि काळजीही करू नकोस. गुरुदेव सर्वकाही पहात आहेत. तेच सर्वकाही सांभाळतील. तू केवळ तुझ्या साधनेकडे लक्ष दे आणि अधिकाधिक साधना कर’, असे ती मला सांगायची.’
२. सौ. रश्मी पावसकर (ज्योतीताई) (दुसरी मुलगी), कणकवली
२ अ. जीवनातील प्रथम गुरु असलेली माझी ‘आई’ ! : ‘आईविषयी कितीही लिहिले, तरी शब्द अपुरेच पडतील. ‘आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपले पहिले गुरु ‘आई-वडील’च असतात’, असे म्हणतात आणि ते खरेच आहे. माझ्या जीवनातील पहिले गुरु माझे आई-बाबाच आहेत. त्यांनी आम्हा सर्व भावंडांना शिक्षण दिलेच; पण नुसते शिक्षण न देता सुसंस्कृत बनवले. त्यांनी आम्हाला साधनाही शिकवली आणि त्याच समवेत ‘या व्यवहारी जीवनात कसे जगायला हवे ?’, हेही शिकवले.
२ आ. मुलांवर केलेले सुसंस्कार
२ आ १. लहानपणापासून देवाची उपासना करण्यास शिकवणे : आईने आम्हाला लहानपणापासूनच साधनेचे बाळकडू दिले. आईची पहिल्यापासूनच देवावर पुष्कळ श्रद्धा होती. आमच्या घरातील देवाजवळचा दिवा दिवसभर तेवत असायचा. तसा तिचा आग्रहच असायचा. प्रतिदिन सकाळी अंघोळ करून देवपूजा झाल्यानंतरच ती स्वयंपाकाला आरंभ करायची. ती प्रतिदिन संध्याकाळी देवाजवळ दिवा-उदबत्ती लावून स्तोत्रे म्हणायची आणि आम्हालाही रामरक्षा म्हणायला लावायची. आपल्याला परात्पर गुरु पांडे महाराजांनी रक्षणासाठी रामकवच आणि रक्षायंत्र दिले आहे, त्याप्रमाणे आई आम्हाला लहानपणी उदबत्तीची विभूती प्रतिदिन संध्याकाळी उंबरठ्याबाहेर घालायला सांगायची. ती म्हणायची, ‘‘यामुळे आपले अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते.’’ म्हणजे ‘आईला तेव्हापासूनच साधना कळत होती’, हे आता लक्षात येत आहे.
२ आ २. नामावील श्रद्धा : लहानपणी आम्हा भावंडात कधी कुणी रुग्णाईत झाल्यावर औषध दिले असले, तरी ती आम्हाला मांडीवर घेऊन नामजप करायची आणि रामरक्षा म्हणायची.
२ आ ३. ‘संसार चांगला करणे, ही साधनाच आहे’, असे शिकवणे : माझे लग्न झाले, तेव्हा तिने मला सांगितले होते, ‘संसार करणे’, ही साधना आहे. तो व्यवस्थित कर, म्हणजे तुझी संसारात राहूनही साधना होईल.’ त्याप्रमाणे मी केले. आई आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे आज माझी व्यष्टी अन् समष्टी साधना व्यवस्थित होत आहे, म्हणजे गुरुदेवच सर्व माझ्याकडून करवून घेत आहेत.
२ आ ४. इतरांना साहाय्य करण्यास उद्युक्त करणे : माझे दीर पुष्कळ रुग्णाईत होते. तेव्हा ती मला सारखा भ्रमणभाष करून विचारायची, ‘‘त्यांची प्रकृती कशी आहे ? तू त्यांच्या घरी जाऊन त्यांना साहाय्य करतेस ना ?’’
२ आ ५. साधनेविषयीच बोलणे : आई भ्रमणभाष करायची, तेव्हा व्यवहारातील काहीच विचारायची नाही. ‘आज तुझा नामजप किती झाला ?’, हेच प्रथम विचारायची.
२ इ. काटकसरी
१. आईकडून पहिल्यापासूनच आम्हाला काटकसर हा गुण शिकायला मिळाला. आता सनातनच्या आश्रमांत भांडी धुण्यासाठी वेगवेगळी ‘सिंक’ आहेत. त्याप्रमाणेच आईने दोन वेगवेगळ्या भांड्यात पाणी घेऊन आम्हाला भांडी धुवायला शिकवले. तेव्हा आमच्याकडे नळ नव्हता.
२. ‘स्वयंपाक करतांना मोजकाच; पण पोटभर होईल’, असा कसा करायचा ?’ हे तिने आम्हाला शिकवले. ‘पोटभर खा; पण अन्न वाया घालवू नका’, असे ती नेहमी आम्हाला सांगायची.
२ ई. औषधांचे ज्ञान असणे
१. आमच्या शेजारी कुणी लहान मूल रुग्णाईत असेल, तर शेजारचे लोक आईला त्यांच्याकडे घेऊन जायचे. तेव्हा आमच्या गावात वैद्य नसल्यामुळे आणि आईला पुष्कळ घरगुती औषधे ठाऊक असल्याने लोक आईला घेऊन जायचे किंवा आई त्यांना औषधे सांगायची.
२. आताही आमची मुले लहान असतांना काही लहानसहान दुखणे असेल, तर आम्ही पहिल्यांदा आईला भ्रमणभाष करून विचारायचो आणि नंतर आधुनिक वैद्यांकडे जायचो.
२ उ. इतरांना साहाय्य करणे : व्यवहार, शिक्षण आणि साधना या सर्वच विषयांचे आईला पुष्कळ ज्ञान होते. पूर्वी काही महत्त्वाचे आणि तातडीचे निरोप दुसर्या गावी कळवण्यासाठी ‘पोस्टा’ने (टपालाने) तार करायची सोय होती. गावात कुणाची तार आली, तर ती इंग्रजीमधून असल्याने लोक ती वाचायला आई-बाबांकडे घेऊन यायचे.
२ ऊ. कृतज्ञता : सनातनच्या माध्यमातून साधना करायला लागल्यापासून आईची साधना वाढतच गेली. तिने आम्हाला साधना करायला उद्युक्त केले अन् स्वतःही साधना करून आध्यात्मिक प्रगती केली आणि ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तही झाली. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला अशी आई मिळाली. गुरुदेवांनी आम्हाला तिचे गुण बघण्याची दिव्य दृष्टी दिली. यासाठी आई आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि नमस्कार.’
३. श्री. प्रभाकर पावसकर (दुसरे जावई), कणकवली
३ अ. जावयाचा योग्य सन्मान करून त्याच्याशी प्रेमाने वागणे
१. ‘कुडाळमधील ‘गुरुकृपा’ या घरात आल्यावर सासूबाई सुहास्य वदनाने आमचे स्वागत करायच्या. मी आल्यावर अगदी थोडक्यातच ‘कसे आहात ?’, अशी माझी विचारपूस करायच्या. त्या माझ्याशी अधिक बोलायच्या नाहीत; पण रश्मीकडे (पत्नीकडे) सर्व विचारपूस करायच्या. त्यांच्या ‘प्रकृती सांभाळा. प्रतिदिन व्यायाम आणि नामजप करा’, अशा मार्गदर्शनपर सूचना असायच्या.
२. त्यांचे आमच्या कुटुंबावर अपार प्रेम होते. जावई म्हणून त्यांनी माझा सर्व मानसन्मान केला. मी घरी जायला निघाल्यावर ‘परत कधी येणार ?’, असे त्या नेहमी विचारायच्या. त्यामुळे कुडाळला आल्यावर ‘परत जावे’, असे वाटायचे नाही.
३. मध्यंतरी आम्ही सर्व कुटुंबीय अडचणीत असतांना त्यांनी आम्हाला केलेल्या साहाय्यामुळे आम्ही परिस्थितीतून बाहेर आलो.
३ आ. घरगुती औषधांची उत्तम जाण असणे : ‘एक उत्तम वैद्य’ अशीही त्यांची ओळख होती. आमच्या कुटुंबात कुणाची आरोग्याची काही समस्या आली की, मी पत्नीला सांगायचो, ‘आईला भ्रमणभाष करून विचार.’ त्या योग्य असे घरगुती औषध सांगायच्या.
३ इ. सासूबाईंचे निधन हा आमच्यासाठी दुःखाचा आणि आनंदाचाही दिवस ठरणे : त्यांच्या तोंडवळ्याकडे बघितल्यावर अगदी प्रसन्न वाटायचे. ६.६.२०२१ हा दिवस आम्हा सर्व खाडये, पावसकर आणि मिसाळ कुटुंबियांसाठी दुःखाचा आणि आनंदाचाही दिवस ठरला ! आम्हा सर्वांची काळजी घेणार्या आणि उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या आमच्या सासूबाईंचे निधन झाले, सर्वांना मार्गदर्शन करणार्या सासूबाई आमच्यातून गेल्या, याचे आम्हाला दुःख आहे. आम्हाला त्यांची उणीव नक्कीच भासेल आणि हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा ठरला; कारण त्यांनी नामस्मरण करत असतांना देह ठेवला. त्यांच्या चरणी आम्ही पावसकर कुटुंबीय नतमस्तक होत आहोत !’ (१०.६.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |