खराब ‘टाइम’

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या विविध फेसबूक पानांवर बंदी घालण्याचे सत्र गत २ वर्षांपासून चालू आहे. जगप्रसिद्ध (कि कुप्रसिद्ध) ‘टाइम’ या नियतकालिकाने त्या विषयावर आता विस्तृत भाष्य केले आहे. त्यामुळे या बंदीच्या मागे ‘टाइम’च आहे, हे आता उघड होत आहे. ‘टाइम’ने सांगितल्यामुळे या वर्षी फेसबूककडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची अनेक पाने बंद करण्यात आली. त्यापूर्वीही सनातन संस्थेच्या पानावर आणि समितीच्या पानावर बंदी घालण्यामागे ‘टाइम’चा हात असू शकतो अथवा त्यांच्यासारखी विचारसरणी असलेल्यांचा किंवा डाव्यांचाही हात असू शकतो. एका राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनेच्या सामाजिक संकेतस्थळांच्या पानांवर बंदी घालण्याची मागणी करणे ही ‘टाइम’ची दादागिरी नाही का ? सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांनी केलेले कार्य ‘टाइम’ला माहिती आहे का ? अनेक संतांनी गौरवलेल्या या संस्था आणि संघटना यांच्या पासंगाला तरी ‘टाइम’ पुरणार आहे का ?

( प्रतिकात्मक छायाचित्र )

राष्ट्रप्रेमींची अपकीर्ती

‘टाइम’चे कारनामे आम्हाला माहिती आहेत. जागतिक स्तरावर चांगले लिखाण करण्यासाठी हे नियतकालिक प्रसिद्ध होते. यातील काही लेख अभ्यासपूर्ण असत; मात्र आता तसे राहिलेले नाही. या नियतकालिकातील लिखाणाला हिंदुद्वेषाचा उग्र दर्प येतो. जगातील ‘क्रमांक १’चे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतातील कोट्यवधी लोकांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून दिले. त्यांचे जागतिक स्तरावर कौतुक झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा एक कार्यकाळ संपत असतांना झालेल्या निवडणुकांच्या पूर्वी पत्रकार आतीश तासिर यांनी ‘भारताचे विघटन करणारा प्रमुख’ असे विकृत वर्णन केले. एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीवर एका पत्रकाराने मर्यादा सोडून भाष्य करणे, त्यासाठी खोटेनाटे संदर्भ देणे आणि स्वत:चे प्रतिकूल मत मांडणे यातून त्यांचा व्यक्तीद्वेष दिसून येतो. पत्रकार तासिर यांचे वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत, हे येथे नमूद करावेसे वाटते. नंतर भारताने पत्रकार तासिर यांचे पारपत्र रहित करून त्यांना दणका दिला, हे झालेच; मात्र पत्रकाराची खुमखुमी किती, हे यातून दिसून येते. ‘टाइम’वर कारवाई करण्याच्या चेतावणीनंतर नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारा लेख नंतर प्रसिद्ध करण्यात आला.

भारतद्वेषाला पाठिंबा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या २ कायद्यांच्या विरोधात काही लोकांनी शेतकर्‍यांना भडकावून केलेल्या आंदोलनात खलिस्तानी शिरले होते, या आंदोलनात अनेक गैरप्रकार घडले. हे आंदोलन म्हणजे सरकार अस्थिर करण्यासाठी नियोजनपूर्वक केलेले षड्यंत्र होते, हे ‘टूलकिट’ प्रकरणातून लक्षात आले. तरीही ‘टाइम’ने एका शेतकरी महिला आंदोलकाचे छायाचित्र मुख्य पानावर लावून ‘त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे’, असे दाखवून दिले होते. ‘टाइम’च्या या कृतीमुळे त्यावर टीकाही झाली. टाइम अमेरिकेतील नियतकालिक आहे. तेथील लेखक आणि पत्रकार यांचा येथील हिंदु संस्कृती अन् संघटना यांच्याविषयी अभ्यास नाही. ते विकृतपणे मांडण्याचा (कि जाणीवपूर्वक तसे करण्याचा) त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. ‘टाइम’ स्वत:च्या प्रतिष्ठेचा हिंदुत्वनिष्ठांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर खोटेनाटे लिहिण्यासाठी वापर करत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वेगळे सूत्र आहे; मात्र त्याचा अपलाभ घेत इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटायचा, याला काय म्हणावे ? सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यामुळे किती जणांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे ? किती कुटुंबे चांगल्या मार्गाला लागली आहेत ? किती जणांची व्यसने सुटली आहेत ? हे टाइमला माहिती आहे का ? याचा कोणताच विचार न करता ‘टाइम’कडून झालेला विकृत प्रयत्न हा निश्‍चितच निषेधार्ह आहे. ‘टाइम’चा खराब ‘टाइम’ (काळ) चालू झाला कि काय ? अशी शंका येत आहे. असे प्रकार होत राहिल्यास त्यांची वाचकसंख्या रोडावत जाण्यासमवेत, भारतात ‘टाइम’विषयी प्रतिकूल मत सिद्ध होईल, यांत शंकाच नाही.