आश्रमातील सूत्रे लिहून देण्याच्या संदर्भात असलेली अयोग्य विचारप्रक्रिया आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे देवाच्या कृपेने झालेले पालट

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेत पुढे पुढे जाण्यासाठी विविध साधनामार्ग सांगितले. व्यष्टी साधनेच्या जोडीला समष्टी साधना केली की, आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते. यासाठी साधकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. सनातनच्या आश्रमांत अनेक साधक एकत्र राहून साधना, सेवा करत आहेत.

आश्रमात विविध सेवा चालू असतात. त्याचे नियोजन सुसूत्र व्हावे यासाठी काही कार्यपद्धती घालून दिलेल्या असतात. एकूण आश्रमस्तरावर सेवेच्या ठिकाणी काही उणीवा, अडचणी किंवा कुणाकडून काही चुकत असल्यास ते उत्तरदायी साधकांना सांगितले की, त्यावर योग्य दृष्टीकोन मिळून साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्यांना साधनेतील आनंद घेता येईल, यासाठी साधकांनी त्यांना लक्षात आलेली सूत्रे उत्तरदायी साधकांना कळवावीत, असे त्यांना सुचवण्यात येते.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. ‘केवळ दिलेली सेवा करायची. बाकी सर्व उत्तरदायी साधक पहातील’, अशा अयोग्य विचारांमुळे देवद आश्रमातील भोजनकक्षातील खोक्यात सूत्रे लिहून न देणे

‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात आश्रम आणि साधक यांच्यामध्ये चांगले पालट होण्याच्या दृष्टीने लक्षात आलेली सूत्रे लिहून घालण्यासाठी एक खोका आहे. त्यामध्ये आश्रमात सेवा करतांना येणार्‍या अडचणी, आश्रम आणि आश्रम परिसर या ठिकाणी वावरतांना लक्षात येणार्‍या त्रुटी, तसेच काही नवीन पालट करण्याच्या दृष्टीने असणार्‍या सूचना साधकांकडून या खोक्यामध्ये घातल्या जातात. आश्रमातील बरेच साधक त्यांना येणार्‍या अडचणी किंवा आश्रमस्तरावर काही पालट करण्याच्या दृष्टीने सूचना लिहून त्यात घालत होते. त्यामुळे त्यांच्या अडचणी सुटतही होत्या; परंतु आश्रमस्तरावरील कोणतीच सूत्रे मी लिहून देत नसे. माझ्याकडून अलिप्तपणे सेवा केली जात होती. मला जेवढी सेवा दिली आहे, तितकीच पूर्ण करायची, म्हणजे ‘माझी सेवा पूर्ण झाली’, असे वाटत होते. आश्रम, सेवेचे ठिकाण किंवा साधक यांच्या संदर्भात काही सूत्रे लक्षात आली, तरी मी ती लिहून देण्याचे टाळत होतो. ‘यामध्ये मी कशाला वेळ द्यायचा ? संबंधित उत्तरदायी साधक पहातील अथवा या स्थितीत काही पालट होणारच नाही. त्यामुळे मी त्यासाठी वेळ द्यायला नको’, अशी माझी अयोग्य विचारप्रक्रिया होती.

२. आश्रमस्तरावर कोणतेही सूत्र ४ वर्षे लिहून न दिल्याने समष्टीत असूनही नसल्यासारखेच असल्याची जाणीव पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी करून देणे आणि यापुढे प्रतिदिन १ सूत्र लिहून खोक्यात घालण्यास सुचवणे

एकदा माझ्या साधनेच्या स्थितीच्या संदर्भात पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी माझा आढावा घेतला. तेव्हा असे लक्षात आले की, गेली ४ वर्षे मी आश्रमस्तरावर कोणतेही सूत्र लिहून दिले नव्हते. तेव्हा पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘४ वर्षे समष्टी सेवेत असूनही काहीच लिहून दिले नाही, म्हणजे समष्टीत असून नसल्यासारखे झाले.’’ हे ऐकल्यावर आरंभी मला वाईट वाटले; पण पू. अश्विनीताईंनी लगेचच मला प्रोत्साहन देण्यासाठी सुचवले, ‘‘ठीक आहे. इतकी वर्षे नाही दिलेस, आज लक्षात आले आहे, तर आजपासून प्रतिदिन १ सूत्र लिहून खोक्यात घालू शकतो.’’

श्री. निनाद गाडगीळ

३. सूत्रे लिहून देण्याविषयी साधकाचे झालेले प्रयत्न

३ अ. प्रतिदिन सूत्रे लिहिण्याविषयी मनात नकारात्मक विचार येणे; पण पू. ताई सांगत आहेत; म्हणून तसे करण्याचे ठरवणे : प्रतिदिन १ सूत्र लिहून खोक्यात घालायचे, याविषयी माझ्या मनात ‘काही दिसले, तर खोक्यात टाकणार ना, काही दिसलेच नाही, तर कसे करायचे ?’, असा नकारात्मक विचार  आला. तो मी पू. ताईंना सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आरंभ कर. पुढे बघू.’’ पू. ताईंनी सांगितले होते, तरी प्रतिमेमुळे त्यांचे म्हणणे माझ्याकडून लगेच स्वीकारले गेले नाही. मी केवळ त्यांना ‘हो’ म्हटले.

३ आ. आरंभी सूत्रे लक्षात येऊन लिहून दिल्याने चांगले वाटणे आणि त्यानंतर दिवसभरात एकही सूत्र लक्षात न आल्याने सवलत घ्यावीशी वाटणे; परंतु प्रार्थना करताच बरीच सूत्रे लक्षात येणे : पहिले २ – ३ दिवस लक्षात आलेले सूत्र मी लिहून खोक्यात टाकले. त्या वेळी पू. ताईंनी सांगितले आहे, तर ‘लिहून देऊया’, या विचाराने मी सूत्र लिहित होतो. सूत्र लिहून दिले की, सूत्र मिळाल्यामुळे चांगले वाटायचे. असे आठवडाभर झाले. त्यानंतर एक दिवस माझ्या एकही सूत्र लक्षात आले नाही. तेव्हा ‘राहू दे. आज काही लक्षात आले नाही. त्यामुळे एक दिवस सूत्र दिले नाही, तरी चालेल’, अशी मनाने सवलत घेतली. सायंकाळी नामजप करतांना ‘आज मला काहीच सूत्रे मिळाली नाहीत’, याचा विचार होता. त्यातच आत्मनिवेदन करतांना देवाला सांगितले, ‘आज माझ्या काही लक्षात आले नाही.’ त्या वेळी ‘मी सवलत घेत आहे’, या माझ्यातील स्वभावदोषाची मला जाणीव झाली. मी देवाला प्रार्थना केली, ‘हे देवा, माझी निरीक्षणक्षमता वाढू दे. माझ्या साधनेच्या दृष्टीने आणि समष्टीत योग्य असे काही असेल, तर ते माझ्या लक्षात आणून दे.’ त्यानंतर ५ मिनिटांत मी जिथे नामजपाला बसलो होतो, तेथील काही सूत्रे माझ्या लक्षात आली. त्या वेळी मी ती लिहून दिली. तेव्हा देवानेच मला माझ्याकडून होणार्‍या चुकीची जाणीव करून दिली आणि योग्य अशी प्रार्थनाही करवून घेतली.

३ इ. काही दिवसांनी प्रार्थना केल्यावर दिवसाला एकापेक्षा अधिक सूत्रे लक्षात येणे; परंतु त्यातील प्रतिदिन एकच सूत्र लिहून देणे आणि याविषयी पू. ताईंना विचारल्यावर त्यांनी देव सुचवत असल्याने सूत्रे लगेच देणे योग्य असल्याचे सांगणे : काही दिवसांनी मी नियमित प्रार्थना करायला लागल्यावर दिवसाला १ पेक्षा अधिक सूत्रे लक्षात येऊ लागली. त्या वेळी ‘पू. ताईंनी दिवसाला १ सूत्र लिहून दे’, असे सांगितले आहे; म्हणून मी खोक्यात एकच सूत्र लिहून घालू लागलो आणि अन्य सूत्रे स्वतःकडे लिहून ठेवून पुढील दिनांक घालून त्या त्या दिवशी मी देत होतो. काही दिवसांनी ‘देव मला सूत्र लक्षात आणून देत आहे आणि मी मात्र संकुचितपणा करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा मी पू. ताईंना विचारले, ‘‘एखाद्या दिवशी मला अधिक सूत्रे लक्षात आली, तर मी काय करू ? सगळी सूत्रे लिहून खोक्यात घालू का ?’’ त्या वेळी पू. ताई म्हणाल्या, ‘‘ज्या दिवशी सुचते, त्याच दिवशी दिले, तर अधिक चांगले. आपण देवासाठी १ पाऊल टाकले, तर देव आपल्यासाठी १० पावले टाकतो ना, त्याचप्रमाणे देव तुला सूत्रे सुचवत आहे, तर लगेच लिहून देणे योग्य आहे.’’ तेव्हापासून मी जे लक्षात येत होते, ते त्याच दिवशी लिहून देऊ लागलो.

३ ई. आश्रमातील पुष्कळ सूत्रे लक्षात येऊ लागल्याने ‘बहिर्मुखता वाढत आहे’, असे वाटणे आणि ‘ही बहिर्मुखता नसून शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने देव सुचवत आहे’, असे पू. अश्विनीताईंनी सांगितल्याने कृतज्ञता वाटणे : काही दिवसांतच आश्रमातील पुष्कळ सूत्रे माझ्या लक्षात येऊ लागली. जे लक्षात येई, ते मी लिहून देऊ लागलो. हळूहळू ‘माझी बहिर्मुखता वाढू लागली आहे; कारण मी पुष्कळच सूत्रे लिहून देत आहे’, असे मला वाटू लागले. त्याविषयी मी पू. ताईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘शिकण्याच्या स्थितीत आहेस ना, याकडे लक्ष दे. सूत्रे लक्षात येतात, म्हणजे बहिर्मुखता नाही, तर तुझा समष्टीतील सहभाग वाढल्याने देव तुला सुचवत आहे. त्यामुळे जे लक्षात येईल, ते लिहून दे.’’ पू. ताईंनी असे सांगितल्यावर मला कृतज्ञता वाटली आणि ‘इतकी वर्षे मी काहीच सूत्रे दिली नाही, तरी देव मला साहाय्य करत आहे’, याची मला जाणीव झाली.

४. सूत्रे लिहून देतांना झालेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

४ अ. एखाद्याविषयीची सूत्रे लिहून दिल्यावर ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संग होईल’, याची भीती वाटणे; परंतु ‘पू. ताईंनी नावासहित सूत्रे वाचून दाखवल्यावर देवाला आपली प्रतिमापण नको आहे’, हे जाणवणे : सूत्रे लिहून दिल्यावर मला ‘माझे काही चुकत नाही ना ?’, अशी भीती वाटत होती. यात ‘मी एखाद्याची सूत्रे दिली, तर तो माझी सूत्रे देईल आणि स्वभावदोष निर्मूलन सत्संग होईल’, असे मला वाटायचे. एकदा सहसाधकाकडून ‘एका सत्संगात मी दिलेल्या सूत्रांवर बोलणे झाले’, असे मला समजले. मी ती सूत्रे लिहून दिल्याचे सत्संगात न कळल्याने केवळ सूत्रांविषयी चर्चा झाली होती. त्या वेळी ‘मनात प्रतिमेचे विचार असल्याने माझे नाव कळले नाही, हे बरे झाले’, असे मला वाटले; परंतु २ दिवसांनी लगेच एका सत्संगात मी लिहून दिलेला कागद पू. ताईंनी नावासहित वाचून दाखवला. तेव्हा ‘देव ‘प्रतिमा नको’ हे शिकवत आहे’, असे मला जाणवले.

४ आ. सौ. सुप्रिया माथुर यांनी सूत्रांविषयी सकारात्मक रहाण्याचा दृष्टीकोन देणे आणि त्यामुळे साधकांनी स्वतःविषयी काही सूत्रे दिली, तरी ते स्वीकारण्याचा भाग वाढणे : ‘एखाद्या साधकाने माझी सूत्रे दिली, तर काय ?’, या विचारावर सौ. सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथुर) यांनी मला दृष्टीकोन दिला. त्या म्हणाल्या, ‘‘युद्धामधे एकाने वार केला की, प्रतिवार होतोच. त्यामुळे आपण एखाद्याची सूत्रे दिली, तर तोसुद्धा आपली सूत्रे लिहून देणारच आहे; मात्र आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ते स्वीकारल्याने आपल्याला स्वतःतील स्वभावदोष दूर करता येतील. आपण परिपूर्ण नाही. ईश्वर शंभर टक्के परिपूर्ण आहे. त्याच्यासारखे व्हायचे, तर ‘देव सहसाधकांच्या माध्यमातून मला घडवत आहे’, असा विचार केला पाहिजे.’’ हे सूत्र समजल्यावर ‘अन्य साधकांनी माझ्याविषयी काही सूत्रे दिली, तरी ती स्वीकारूया’, असा विचार मनात येऊन मी सकारात्मक झालो.

४ इ. सूत्रे लिहून देतांना कालांतराने अहंचे पैलू वाढू लागणे : सूत्रे लिहून द्यायला आरंभ केल्यावर आधी माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता होत होत्या; परंतु कालांतराने माझ्या स्वभावदोषांमध्ये वाढ होण्यास आरंभ झाला. प्रतिदिन कोणते सूत्र लिहून दिले, त्याची नोंद मी ठेवत होतो. त्यावर उत्तरदायी साधकांनी काय केले, ते सूत्र पूर्ण झाले कि नाही, पूर्ण झाले की, त्यावर ‘पूर्ण झाले’, अशी खूण करत होतो. सूत्रे प्रलंबित असतील, तर मी सेवा करणार्‍या साधकाचा पाठपुरावा घेऊन ‘सूत्रे प्रलंबित आहेत’, याची त्याला आठवण करून देत होतो. ‘यामध्ये मी दिलेली सूत्रे महत्त्वाची असल्याने लवकर पूर्ण व्हावीत’, अशी माझी अपेक्षा असायची. त्यानंतर अपेक्षा करणे, ‘माझे निरीक्षण चांगले आहे आणि स्वतःला महत्त्व मिळावे, असे वाटणे’, हे अहंचे पैलू वाढत आहेत, हे माझ्या लक्षात येत नव्हते.

४ ई. सूत्रे लिहून देण्याचे प्रमाण वाढल्याने अहंयुक्त विचार येणे आणि त्यामुळे त्यानंतर सूत्रे अल्प सुचणे; परंतु पू. ताईंनी कर्तेपणाची जाणीव करून दिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी क्षमायाचना करणे : मी सूत्रांना क्रमांक घालत असल्याने ३ ते ४ मासांनी ‘माझ्याकडून १०० सूत्रे लिहून पूर्ण झाली’, असा विचार आला. २०० सूत्रे पूर्ण झाल्यावर ‘काही प्रमाणात कृतज्ञता व्यक्त झाली, तर अधिक प्रमाणात ‘आपले निरीक्षण वाढले आहे’, असे अहंयुक्त विचार मनात येत होते. ७ ते ८ मासांनी अकस्मात् सूत्रे लक्षात येण्याचे प्रमाण उणावले. प्रतिदिन २ ते ३ लक्षात येणारी सूत्रे आता आठवड्याला २ ते ३ सूत्रे लक्षात येऊ लागली. त्या संदर्भात पू. ताईंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘अल्पसंतुष्टता आल्याने मन सुखावले आणि कर्तेपणा घेतला गेला. त्यामुळे काहीच सुचत नाही.’’ ज्या वेळी या स्वभावदोष आणि अहं यांविषयी मला समजले, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी क्षमायाचना केली.

५. सूत्रे लिहून दिल्यामुळे साधकाला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

५ अ. आश्रमाविषयी पुष्कळ जिव्हाळा वाढला.

५ आ. स्वतःच्या अयोग्य कृतीत योग्य पालट होणे : कोणतीही कृती करतांना ‘मी योग्य करत आहे कि नाही’, हे मी पडताळू लागलो, उदा. चप्पल ठेवतांना काही वेळा घाईघाईत अतिथी ठेवतात, त्या ठिकाणी ठेवत होतो. आश्रमात प्रवेश करतांना पाय पटकन धुऊन प्रार्थना न करता जाणे इत्यादी अनेक कृतींमध्ये पालट झाला.

५ इ. मनाचा संघर्ष न्यून होऊन आनंद मिळणे : आश्रमस्तरावर कोणताही चुकीचा भाग लक्षात आला किंवा नवीन काही पालट करायचा असेल, तर लगेच सांगितले जाते. ‘दिसेल ते कर्तव्य , या दृष्टीने पुढे जाऊन सांगण्यास आरंभ झाला. ही सर्व प्रक्रिया करतांना मनाचा संघर्ष न्यून होऊन आनंद मिळू लागला.

५ ई. अपेक्षांचे प्रमाण अल्प होणे : नंतर मी सूत्रांच्या नोंदी ठेवणे बंद केले. ‘लक्षात आलेले सूत्र लिहून देणे, ही साधना आहे. संबंधित साधक त्यांच्या प्राधान्यक्रमाने आणि त्यांच्या दृष्टीने योग्य त्या वेळी ती सेवा पूर्ण करतील’, असा विचार करू लागलो. त्यामुळे त्यात असणार्‍या अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले.

५ उ. प्रतिमेचे विचार अल्प होणे : एका सेवेच्या ठिकाणी काही सेवांच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. ‘सूत्रे लिहून दिल्यावर सत्संगाला बोलावले आहे’, असा निरोप मिळाल्यावर आता प्रतिमेचे विचार येत नाहीत. ‘जे लिहून दिले आहे, ते देवाला अपेक्षित असे आणि सेवा चांगली होण्यासाठी लिहून दिले आहे. त्यामुळे त्यातील ‘योग्य-अयोग्य किंवा स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने योग्य काय, ते समजेल’, असा विचार असतो.

५ ऊ. कृतज्ञता वाढणे : आश्रमातील प्रत्येक वस्तू वापरण्याविषयी आत्मीयता आणि कृतज्ञता यांत वाढ झाली. तसेच कोणत्याही गोष्टीत किंवा सेवेत विचारून घेण्याची सवय वाढली.

६. पू. (सौ.) अश्विनीताईंनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘सूत्रे लिहून देणे’, हीसुद्धा एक सेवाच आहे, हे लक्षात येऊन त्यातून आनंद घेता येणे

पू. (सौ.) अश्विनीताईंनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि त्यांची साधकांना घडवण्याची तळमळ यांमुळे आश्रमस्तरावरील सूत्रे लिहून देता आली. त्यातील बारकावे आणि त्यामध्ये लक्षात आलेल्या माझ्यातील स्वभावदोषांवर मात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता आले आणि त्यातून शिकता आले. पू. ताईंनी ‘समष्टीत असून नसल्यासारखे’, या स्थितीमधून बाहेर काढून प्रोत्साहन दिले. त्यामुळे ‘सूत्र लिहून देणे’, हीसुद्धा एक सेवाच आहे आणि यातून आनंद मिळवता आला.

‘परात्पर गुरु डॉक्टर, मला साधनेत सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा’, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो आणि आपल्या कृपेमुळेच सूत्रे लिहून देतांना झालेली विचारप्रक्रिया लक्षात आली, यासाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निनाद गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक