नेमेचि येतो…!

मान्सून सक्रीय होताच प्रतिवर्षीप्रमाणे मुंबईची दैना झाली. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबले आणि देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. त्याचा सर्व प्रकारच्या वाहतुकीवर परिणाम झाला. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या नालेस्वच्छतेच्या दाव्याचे वाभाडे काढले, तर सरकार, तसेच प्रशासन यांनी ‘सर्व कामे योग्य तर्‍हेने झाली असून अमुक प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि विरोधक राजकारण करत आहेत’, असे सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना देणे, दुर्दैवाने काही दुर्घटना घडली, तर घटनेचे अन्वेषण करण्यासाठी समितीची स्थापना करणे, आपत्तीग्रस्तांना अर्थसाहाय्य घोषित करणे, दोषींना शिक्षा देण्याचे आश्वासन देणे, वगैरे सोपस्कार पार पाडले जातात; पण नेहमीच्या पावसातच मुंबई जलमय होण्याच्या कारणांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा शोध घेतला जात नाही.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये ‘विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचेच काम झाले’, असे आरोप अनेकदा झाले आहेत. शहरातील नद्या, नाले, ओढे आदींवर भराव टाकून ते बुजवण्यात आले. हे होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? हा खरा प्रश्न आहे. या महाकाय अतिक्रमणांमुळे नैसर्गिक स्रोतांचे अस्तित्व संकुचित झाले आहे. अनेक ठिकाणी तर नष्टच झाले आहे. आजही या स्थितीमध्ये म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. समुद्र आतआत ढकलून शहर विस्तारण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रतिवर्षी होणारी तारांबळ हा त्याचाच फटका आहे; मात्र ज्यांच्याकडे अधिकार आहेत, ते या मूळ विषयावर बोलायला सिद्ध नाहीत. प्रचंड प्रमाणात झालेली अतिक्रमणे हे मुंबईसाठी एक कळीचे सूत्र आहे. त्याविषयी प्रासंगिक आवाज उठवला जातो; पण अतिक्रमणांवर (थातुरमातुर) कारवाई चालू केल्याचा दिखावा करून विषय थंड पडतो.

पावसाळ्यातील पाऊस हा काही अचानकपणे उद्भवतो, असे नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज पाऊस कधी ? कुठे आणि किती पडेल ? याचा अंदाज वर्तवण्यात येतो. त्यामुळे पुरेशी सिद्धता करण्याचे दायित्व सरकार-प्रशासन यांचे असते. तरीदेखील प्रतिवर्षी त्याच समस्या उद्भवत असतील, तर ‘कुठे तरी पाणी मुरत आहे’, असे म्हणायला वाव रहातो. जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्‍या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे. त्या स्थितीकडे चालू असलेली ही वाटचाल म्हणावी लागेल ! नेमेचि येणार्‍या पावसाळ्यामध्ये जर व्यवस्था गटांगळ्या खात असेल, तर सर्वसामान्य नागरिक आपत्तीतून तरून जाणार कसे ?