पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्यै !

१. श्रीमती मिथिलेश कुमारी (पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीमती मिथिलेश कुमारी

१ अ. भाऊ नसल्याने आईने यजमानांना ‘स्वतःचा मोठा मुलगा’ मानणे आणि यजमानांनी बहिणींचे पुढील शिक्षण, त्यांचे लग्न यांचे पित्याप्रमाणे दायित्व निभावणे : ‘आम्ही पाच बहिणी आहोत आणि आम्हाला भाऊ नाही. माझी आई माझ्या यजमानांना, डॉ. नंदकिशोर यांना स्वतःचा मोठा मुलगा मानत असे. यजमानांनी माझ्या आईचा नेहमीच आदर केला आणि तिची काळजी घेतली. ते एक ‘आदर्श जावई’ होते. त्यांनी माझ्या बहिणींच्या पुढील शिक्षणासाठी साहाय्य केले. सर्व बहिणींच्या विवाहाच्या वेळी त्यांनी एका पित्याप्रमाणे उत्तरदायित्व निभावले.

१ आ. वडिलांचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक अग्नीसंस्कार विधी करण्यात अडथळा आणत असतांना यजमानांनी परखडपणे विरोध करून अग्नीसंस्कार पूर्ण करून घेणे : माझ्या वडिलांचा मृत्यू पुष्कळ लवकर झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आमच्या दूरच्या नातेवाइकांनी आणि आमच्या काकांनी मृतदेहाला अग्नी देण्याच्या वेळी आम्हाला पुष्कळ त्रास दिला. अपशब्द बोलून माझ्या आईला मारहाणही केली. त्या वेळी डॉ. नंदकिशोर यांनी परखडपणे माझ्या काकांना विरोध केला. पूर्ण संरक्षण देऊन अग्नीसंस्कार विधी पूर्ण केला आणि माझी आई अन् आम्ही बहिणी यांना आधारही दिला.

१ इ. बहिणींच्या मुलांवर प्रेम करणे : माझ्या बहिणींची मुले देहलीहून सुटीसाठी नियमित आमच्या घरी अयोध्येला येत. तेव्हा त्यांना आजोबांची उणीव भासू नये, एवढे प्रेम यजमान त्या सर्वांना देत. ती सगळी मुले त्यांचा पुष्कळ आदर करायची.

१ ई. केवळ पती नव्हे, तर ‘आध्यात्मिक मित्र आणि मार्गदर्शक’ झालेले पू. डॉ. नंदकिशोर ! : डॉ. नंदकिशोर माझे केवळ पती नव्हते, तर ते माझे ‘आध्यात्मिक मित्र आणि मार्गदर्शक’सुद्धा होते. त्यांच्यामुळेच मी साधनेत पुढे जाऊ शकले. त्यांच्यात इतके गुण होते की, कितीही लिहिले, तरी ते अल्पच वाटतात.

१ उ. ‘सौ. अनुपमा जोशी यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळत असल्याने ‘आता तुझी काळजी वाटत नाही’, असे यजमानांनी सांगणे : दोन दिवसांपूर्वी यजमान मला म्हणाले, ‘‘रामनाथी आश्रमात तुला सौ. अनुपमा जोशी या पुष्कळ चांगल्या साधिकेसोबत जोडले आहे, ज्या तुला चांगले मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे मला तुझी चिंता वाटत नाही.’’ मी त्यांना म्हणायचे, ‘‘मला काहीतरी सांगा.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘गुरुदेव आहेत. ते सर्व बघत आहेत आणि सांभाळतही आहेत.’’

२. सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची मोठी मुलगी), अयोध्या (फैजाबाद)

सौ. कनुप्रिया श्रीवास्तव

२ अ. सतत गुरुदेवांचे स्मरण आणि साधना करण्याची शिकवण देणारे आदर्श पिता ! : ‘गुरुदेवांच्या अनन्य कोटी कृपेने मला इतके चांगले आई-वडील मिळाले. त्यांचा मला अभिमान वाटतो. ते आम्हाला सतत साधना करून गुरुदेवांच्या चरणांशी रहाण्याची आणि त्यांचे स्मरण करण्याची शिकवण देतात.

२ आ. वडिलांची आठवण आल्यावर ‘सनातनमध्येच मी आहे सर्वदा ।’, असे वडील म्हणत असल्याचे जाणवणे : ज्या वेळी मला वडिलांची आठवण येते, त्या वेळी असे वाटते की, ते म्हणत आहेत,

स्थूल देहा असे मर्यादा । त्या देहातच कसा राहू मी सदा ।।
सनातन आहे गुरुदेवांचे रूप । त्यातच मी आहे सर्वदा ।।’

३. सौ. क्षिप्रा जुवेकर (पू. डॉ. नंदकिशोर यांची लहान मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. व्यवस्थितपणा

३ अ १. स्वतःचे कपडे व्यवस्थित धुणे : ‘बाबा त्यांचे कपडे इतके व्यवस्थित धूत की, ते कायम नवीन असल्याप्रमाणे वाटत. त्यात पुष्कळ चैतन्य असल्याचे जाणवायचे.

३ अ २. घरातील महत्त्वाची सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवणे : सर्व प्रकारची कागदपत्रे त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळून ठेवली आहेत. त्यांच्या कपाटात आमच्या घराच्या संबंधित, तसेच विजेची देयके यांसारखे महत्त्वाचे कागद त्यांनी २० – ३० वर्षांपासून सांभाळून ठेवले आहेत आणि त्यावर चिठ्ठ्या लावल्या आहेत.

३ अ ३. रुग्णालयाची कागदपत्रे, स्वतःला होणारे शारीरिक त्रास यांविषयी, तसेच सर्व औषधांच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे : इतके आजारी असूनही त्यांनी मागील २ वर्षांतील ‘मणिपाल हॉस्पिटल’चे सर्व कागद दिनांकानुसार एकत्रित करून ‘फाईल’मध्ये ठेवले आहेत. त्यात त्यांना होणार्‍या त्रासाविषयी सर्व बारकावे त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे लिहून ठेवले आहेत. त्यांना साहाय्य करणार्‍या साधकांना अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी त्यांची सर्व औषधे आणि ती घेण्याची वेळ यांविषयी अतिशय सुस्पष्टपणे लिहून ठेवले होते. आम्हाला त्यांच्याशी संबंधित एवढासा कागदसुद्धा कधी शोधावा लागत नाही. तो सहज सापडतो.

३ अ ४. छायाचित्राखाली त्याची पूर्ण माहिती लिहून ठेवणे : आम्ही दोघी बहिणींनी लहानपणी (३० वर्षांपूर्वी) काढलेली चित्रेसुद्धा त्यांनी सांभाळून ठेवली आहेत. परिवाराच्या आणि स्वतःच्या छायाचित्राखाली त्याची पूर्ण माहिती, म्हणजे ‘छायाचित्र कधी आणि कुठे काढले ?’, यांची नोंद करून ठेवण्याची त्यांना सवय होती.

४. स्वतःची प्रकृती चांगली नसतांनाही मुलीला आश्रमात येण्याचा आग्रह न करणे

मार्च २०२१ मध्ये वैयक्तिक कामासाठी श्री. प्रशांत (पती), जुवेकर काका-काकू (सासू-सासरे) आणि मी रत्नागिरीला गेलो होतो. हे कळल्यावर बाबांनी ‘‘रामनाथी आश्रमात येण्याचे तुमचे काही नियोजन आहे का ?’, असे मला विचारले. त्या वेळी कोरोनामुळे तिकडे येण्यात अडचण असल्याचे सांगितल्यावर आई-बाबांनी ते लगेच स्वीकारले. खरंतर त्या वेळी बाबांची प्रकृती चांगली नव्हती, तरीही त्यांनी स्वतःच्या इच्छेला महत्त्व न देता ईश्वरेच्छेला महत्त्व दिले.’ (१८.५.२०२१)