अंनिसवर कारवाई का नाही ?

पारनेर तालुक्यातील (जिल्हा नगर) टाकळी ढोकेश्वर येथे ‘स्व. माजी आमदार वसंतराव झावरे-पाटील कोविड केअर सेंटर’मध्ये विश्वशांती महायज्ञ करण्यात आला. खरेतर संयोजकांनी ‘कोरोनामुक्तीसाठी महायज्ञ केला’, असे म्हटले आहे. असे असले तरी नेहमीप्रमाणे कोणताही अभ्यास न करता किंवा शास्त्र समजून न घेता त्यावर टीका करत ‘हा प्रकार चुकीचा असून संबंधितांवर कारवाई करा’, अशी तक्रार अंनिसने जिल्हाधिकार्‍यांकडे केली. यावर अंनिसने म्हटले की, महायज्ञ ही अंधश्रद्धा तर आहेच, तसेच कार्बन डायऑक्साईडमुळे रुग्णांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. यामुळे महायज्ञ करणे म्हणजे कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय समूह यांच्या अथक प्रयत्नांना नाकारणे, तसेच त्यांच्या प्रती अविश्वास व्यक्त करणारे आहे. ही अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा यांना खतपाणी घालणारी कृती आहे. कोणत्याही पदार्थाच्या ज्वलनानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू सिद्ध होतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. प्रत्यक्षात अंनिसने तक्रारीत केलेले आरोप हे कसे बिनबुडाचे आहेत, हे पुढील संशोधनातून सिद्ध होते.

फ्रान्सचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ त्रिलने यांनी ‘लाकूड जाळल्यानंतर ‘फार्मिक आल्डिहाईड’ नावाचा वायू बाहेर पडतो. त्याच्यामुळे सर्व प्रकारचे जिवाणू मरतात. सध्या हा वायू पाण्यात मिसळून बाजारात ‘फार्मोलिन’ या नावाने विकला जातो. तो घराची शुद्धी करण्याच्या उपयोगी येतो’, असे सांगितले आहे. तसेच फ्रान्सचे डॉ. हेफकिन यांनी ‘तूप जाळल्यानंतर रोगांच्या जिवाणूंचा नाश होतो’, असे संशोधन केले आहे. प्रत्यक्षात यज्ञाचे लाभ किती आहेत, हे धर्मशास्त्रामध्ये दिलेले आहे; परंतु धर्मद्रोही आणि हिंदुद्वेष्ट्या अंनिसला विदेशातील लोकांनी लावलेले शोध सांगितल्यास त्यावर विश्वास बसेल; म्हणून येथे फ्रान्सच्या संशोधकांचे दाखले दिले आहेत. प्राचीन ऋषिमुनींचे ज्ञान अनेकपटींनी श्रेष्ठ आणि सखोल आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेऊन विदेशातील लोक पुढील संशोधन करत आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे अंनिसने केलेल्या अशा तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा हिंदु धर्मातील सत्य आणि समाजोपयोगी गोष्टी यांवर टीका करून गैरसमज पसरवणार्‍या अंनिसवरच सरकारने कारवाई करावी, असे सर्वसामान्यांना वाटते !

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.