गांधी-नेहरू यांच्या काळापासून साम्यवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी विचार रुजवण्याची पद्धत आजपर्यंत चालूच ! – शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र ?’ या विषयावर विशेष परिसंवाद

शंकर शरण

पुणे – युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान निर्माण करणे, हा इतिहास शिकवण्याचा उद्देश आहे. सध्या भारतात मात्र सत्य इतिहास लपवून ‘मोगल शासक क्षमाशील आणि महान होते’, असे (धादांत खोटे) शिकवले जाते. सत्य इतिहास सांगितला न जाणे, हे गांधी-नेहरू यांच्या काळापासूनचे राजकीय षड्यंत्र आहे. खोट्या इतिहासातून डाव्या विचारसरणीचे अर्थात् हिंदुविरोधी विचार लोकांवर लादले जाऊ लागले. आपली भाषा, धर्म, ज्ञान आणि इतिहास यांची इंग्रजांच्या सत्ताकाळातही झाली नव्हती, तेवढी स्वातंत्र्यानंतर दुर्दशा झाली आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद्यांच्या प्रभावामुळे देशातील शिक्षणामध्ये हिंदु धर्माला त्याज्य ठरवले गेले. हिंदु धर्माला आणि त्याच्या चेतनेला न्यून लेखायचे अन् इस्लामला वरचढ दाखवायचे, हे धोरण काँग्रेसने स्वीकारले. हेच शिकवण्याच्या दृष्टीकोनातून पाठ्यपुस्तके सिद्ध केली गेली. नेहरू यांची विचारसरणी ही पूर्णत: हिंदुविरोधी होती. त्यांच्या कार्यकाळात समाजवाद, औद्योगिकीकरण, आर्थिक समृद्धी यांची स्वप्ने दाखवली जाऊन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण संबंधांचा खोटा प्रचार करण्यात आला. यामुळे समाजाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. काही विचारवंत आणि बुद्धीजीवी यांच्या हे लक्षात आलेे; मात्र नैतिक अन् सामाजिक पाठबळ न मिळाल्याने ते त्याविषयी काहीच करू शकले नाहीत. परिणामी समाजात हळूहळू हिंदुविरोधी विचार रुजवले गेले. गेल्या अनेक दशकांपासून हिंदुविरोधी विचार शिकवले जात असून त्यातून होणार्‍या राष्ट्रहानीचेही भान सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना राहिले नाही. सध्याच्या शिक्षणातही हिंदुविरोधी आणि देशविरोधी सूत्रे चांगली म्हणून शिकवण्यात येत आहेत, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक श्री. शंकर शरण यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादांतर्गत ‘सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र ?’, या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात ‘भारतीय शिक्षण मंचा’चे अखिल भारतीय संयोजक श्री. दिलीप केळकर, ‘मध्यप्रदेश साहित्य अकादमी’चे संचालक श्री. विकास दवे आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन समितीचे श्री. चैतन्य तागडे आणि श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ, यू ट्यूब आणि ट्विटर यांद्वारे ६ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.

श्री. शंकर शरण यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. म. गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देतांना क्रूर मोगल आक्रमकांना चांगले म्हणण्यास प्रारंभ करून त्यांचे उदात्तीकरण केले. त्यातून मुसलमान खुश होऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतील; परंतु या निमित्ताने खोटा इतिहास सांगितला जाऊ लागला.

२. गेल्या ५२ वर्षांत ३ वेळा शिक्षणाचे धोरण (नीती) पालटले गेले. यातून कोणतेही मोठे परितर्वन झाले नाही. सध्या इतिहास, साहित्य आणि राजनीतीशास्त्र ही सर्व राजकारणाने भारित झालेली आहेत. गेल्या ४० वर्षांपासून शिक्षणपद्धतीचे राजकीयीकरण झाल्याने त्याचे दुष्परिणाम वाढतच आहेत.

धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव मिटवला पाहिजे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सर्वांना समानतेचा हक्क देण्यात येतो; मात्र प्रचलित शिक्षणामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये भेद अन् असमानता आहे. राज्यघटनेच्या कलम २८ नुसार कोणत्याही धार्मिक शिक्षणाला सरकारी अनुदान देता येत नाही. त्यामुळे बहुसंख्यांकांना (हिंदूंना) आपल्या धर्माचे शिक्षण देता येत नाही; मात्र कलम ३० नुसार अल्पसंख्यांकांना (मुसलमानांना) त्यांच्या धर्माचे शिक्षण सरकारी अनुदानातून देता येते. हा सरळ सरळ धर्माच्या आधारे भेदभाव केला जात आहे असून तो मिटवला पाहिजे.

पूर्वी असलेल्या अल्पसंख्यांक शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणव्यवस्थेत काय काय पालट केले आहेत ? याचे संशोधन होणे आवश्यक आहे. त्यांनी भारतियांना भारतीय शिक्षण आणि परंपरा यांपासून वंचित ठेवले. इंग्रजांची गुलामगिरी, खोटा इतिहास आणि क्रूर, आक्रमणवादी मुसलमानांचा सत्य इतिहास सांगितला नाही, तर भारत अखंड रहाणार नाही; म्हणून अकबर, बाबर आणि मुसलमान राजे चांगले अन् सामाजिक विचारांचे होते, असा खोटा इतिहास सांगत हिंदूंना भ्रमित केले.

प्रजेच्या अडचणी दूर करण्यासाठी राजा धडपडतो. राजाला प्रजेच्या समस्या समजतात आणि तो त्या धर्मकर्तव्याने दूर करतो, तेच रामराज्य होय; मात्र हेच धर्मशिक्षण बहुसंख्य असलेल्या हिंदूंना नाकारले जाणे, हे राज्यघटनाविरोधी आहे. जेवढे अधिकार अल्पसंख्यांकांना आहेत, तेवढे बहुसंख्यांकांना नाहीत, हे चुकीचे आहे. बहुसंख्य हिंदूंना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत; कारण लोकशाही ही बहुमतावर चालते. सध्याच्या लोकशाहीआडून हिंदुविरोधी तानाशाही चालू आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

साम्यवादी आणि मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीतून सिद्ध झालेले आधुनिक वैद्य आज कोरोनाच्या काळात रुग्णांना नि:स्वार्थी सेवा देण्याऐवजी त्यांची लूट करत आहेत. औषधांचा काळाबाजार केला जात आहे. हे सर्व माणसापासून पशुत्वाकडे आणि पशुत्वाकडून विनाशाकडे वाटचाल करणारे आहे. उच्चशिक्षित आधुनिक वैद्य आणि अभियंता हे समाजाला दिशा देऊ शकत नाहीत. हे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. ते समाजाला अजूनही दिशाहीन करून दिशाभूल करत आहेत.

धर्मशिक्षणाच्या अभावाने नैतिक मूल्यांचे पतन आणि हनन होत आहे. आजची शिक्षणव्यवस्था केवळ पैसे कमावण्याच्या आणि स्वार्थी अन् संकुचित विचारांची आहे. हिंदु धर्मात त्याग, प्रीती आणि नम्रता यांची शिकवण दिली आहे. त्यामुळे पृथ्वीला आनंदमय आणि सुखमय करायचे असेल, तर प्रत्येकाने सनातन धर्म आणि परंपरा यांचे आचरण करायला हवे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’नुसार ध्येय घेऊन जगण्याचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी

विकास दवे

१. भारतीय शिक्षणाविषयी चर्चा करतांना ‘आपल्या शिक्षणाचा हेतू काय आहे ? तसेच पुस्तकांतून आपण मुलांना काय ज्ञान दिले पाहिजे ?’, याचा विचार करायला हवा. जे शिक्षण मुक्ती देते, तेच खरे शिक्षण आहे. ऋषिमुनींनी आंतरिक ज्ञानाला प्रकट करण्याची शिक्षणपद्धत चालू केली होती. त्या शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून आज आपण भरकटलेलो आहेत. आपल्याला सुव्यवस्था प्रस्थापित करायची असेल, तर लहानपणापासून धर्माचे शिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यामुळे आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ती व्यवस्था बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत ठेवली पाहिजे. प्रामाणिकपणा, सत्य, सहकार्य आणि संवेदनशीलता हे गुण धर्माचरणाने आत्मसात करता येतात. धर्मशिक्षणातून जीवनातील सर्वच प्रश्‍नांच्या समस्येचे उत्तर मिळू शकते.

२. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेने भारतीय मन आणि समूह यांवर दुष्परिणाम होत आहेत. पैसे कमावणे, हाच आजच्या युवा पिढीचा उद्देश असतो. शिक्षणाच्या नावावर जे काही ज्ञान दिले जाते, त्यातून विद्यार्थ्यांचा ‘माझा बुध्यांक वाढत आहे’, असा अपसमज होतो आणि तो त्यासाठी धावतो. परिणामी धर्म, संस्कृती आणि माणुसकी यांप्रतीची समाजाची संवेदनशीलता नष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना सत्य इतिहासापासून दूर नेण्याचे षड्यंत्र गेली कित्येक दशके चालू आहे.

३. ऋषिमुनींच्या काळात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. तेच भारतीय शिक्षणाचे मूळ आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘विद्यार्थी गुरूंना प्रश्‍न विचारत नाहीत’, हा मुख्य दोष आहे. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेत शिष्य गुरूंना प्रश्‍न विचारत आणि गुरु त्यांचे समाधान करत.

भारतियत्वाचे शिक्षण केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण विश्‍वात द्यायला हवे ! – दिलीप केळकर, अखिल भारतीय संयोजक, भारतीय शिक्षण मंच

दिलीप केळकर

१. एखादा विषय शिकवायचा असेल, तर तो सखोलपणे शिकवावा लागतो. वर्तमान शिक्षणात जे काही शिकवले जाते, ती इंग्रजांनी बनवलेली शिक्षणपद्धत आहे. त्यात भारतीय शिक्षणाचा अंतर्भाव नाही. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत.), ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) आणि अष्टांग योगाचे यम-नियम ही भारतीय जीवनपद्धतीची ओळख आहे.

२. भारतीयत्वाचे हे शिक्षण केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण विश्‍वात द्यायला हवे. आपल्याला वैश्‍विक शिक्षण देण्यासाठी शिक्षणपद्धत सिद्ध केली पाहिजे. सध्या संपूर्ण शिक्षणपद्धतीच परिवर्तनाच्या टप्प्यावर आलेली आहे. शिक्षण हे जीवनभराचे शिक्षण असते. शिक्षणातून समग्र जीवनाचा विचार कसा केला जाऊ शकतो ? हे सांगितले पाहिजे.

३. ‘जे.एन्.यू.’ आणि अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय यांमध्ये भारतविरोधी घोषणांसह स्वातंत्र्यवीर सावरकर अन् स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना होण्यामागील मूळ कारण ‘संपूर्ण जीवन अभारतीय असणे’, हे आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षणासह न्याय, उद्योग, कला अशा सर्वच क्षेत्रांत भारतीय जीवनपद्धत आणायला हवी.

४. आपल्या लोकशाहीचे स्वरूप भारतीय नाही. आज संपूर्ण समाज अभारतीय झाला आहे. हा देश आणि धर्म यांचा मोठा अपमान आहे, याची समाजाला जाणीव नाही. एकेकाळी आपले संपूर्ण जीवन धर्माचरणाने व्यापलेले होते; परंतु आजच्या जीवनात धर्माचे स्थानच नाही. त्यामुळे संपूर्ण समाजव्यवस्थेचा या दृष्टीने आणि समग्रतेने विचार करण्याची आवश्यकता आहे.

५. आपण धर्माने ओतप्रोत भरलेला समाज निर्माण करण्यास आपल्याला समांतर प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हाच शिक्षणव्यवस्था मूळपदावर येईल. तसेच वर्णानुसार शिक्षण देऊन वंशपरंपरागत आणि जन्मजात कौशल्यानुसार व्यवसाय केला पाहिजे. त्यातून सगळ्यांना धर्माची समज येईल.

श्री. विकास दवे यांनी हिंदुद्रोही एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात दिलेला लढा !

आम्ही इंदूरच्या न्यायालयात एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात खटला प्रविष्ट केला होता. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात ‘भगवान महावीर हे जंगलात फिरत होते. फिरता फिरता त्यांचे कपडे काटेरी झाडांत अडकून फाटले. तेव्हापासून त्यांना नग्न रहाण्याची सवय लागली’, असे लिहिले होते. आपल्या दिगंबर पंथाची महान परंपरा त्यांनी विकृत स्वरूपात मांडली होती.

एका संघटनेच्या माध्यमातून आम्ही ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील १०९ चुका दाखवल्या होत्या. या पुस्तकात इतिहास अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडला होता. अकबर आणि बाबर आदी मुसलमान शासक महान असून त्यांचे कार्य चांगले असल्याचे मुलांना सांगितले जात होते. याउलट महाराणा प्रताप यांच्याविषयीचा इतिहास केवळ ४ ओळींत लिहिला होता.