भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/483878.html

९. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सेंद्रिय (नैसर्गिक) खते आणि कीटकनाशके यांचे विविध पर्याय

‘औषधी वनस्पतींची लागवड सेंद्रिय पद्धतीनेच करावी. ही लागवड औषधांसाठी केली जात असल्याने या लागवडीमध्ये रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशके यांचा उपयोग करू नये. सेंद्रिय पद्धतीमुळे हानीकारक रसायनांचे दुष्परिणाम टाळले जातात, तसेच उत्पन्नाचे प्रमाण वाढते आणि गुणवत्ताही सुधारते.

९ अ. सेंद्रिय (नैसर्गिक) खताचे विविध पर्याय

१. घरातील केरकचरा, तसेच स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ भूमीत गाडून बनलेले ‘कंपोस्ट’

२. झाडाखालील, विशेषतः वडाखालची माती

३. जनावरे बांधलेल्या ठिकाणची माती

४. तलाव, नदी किंवा धरण यांचा गाळ

५. हिरवे-निळे शेवाळ

६. लाकडे जाळल्यानंतर उरलेली राख

७. जनावरांनी न खाल्लेला चारा

८. पिकाला आच्छादन देतांना वापरलेला हिरवा पालापाचोळा

९. शेतातील वाळलेला काडीकचरा आणि पिकांचे अवशेष

१०. कुजवलेली उसाची मळी

११. तेल काढल्यानंतर उरलेली पेंड

१२. एरंडीची पेंड

१३. नत्र स्थिर करणार्‍या द्विदल वनस्पती भूमीत गाडून निर्माण झालेले खत

१४. प्रत्येकी १ भाग वाळलेला अन् हिरवा पालापाचोळा, २ भाग अर्धवट कुजलेले शेणखत यांवर परिणामकारक जिवाणूंच्या द्रावणाची फवारणी करून बनलेले खत

१५. गावरान गायीचे मूत्र, कडधान्याचे पीठ, तूप आणि शेण

१६. गावरान गायीचे शेण, गोमूत्र आणि काळा गूळ (यांपासून बनवलेल्या खताला ‘संजीवनी’ म्हणतात.)

१७. जनावरांचे शेण आणि मूत्र

१८. कोंबडीची विष्ठा

१९. बकरीची लेंडी

२०. गांडूळ खत

२१. गांडूळ पाणी (व्हर्मी वॉश)

२२. सडलेली अंड्यांची टरफले

२३. मेलेल्या जनावरांचे अवशेष

२४. मेलेले मासे

२५. मारलेल्या जनावरांचे रक्त

२६. मृत पक्ष्यांचे पंख

९ आ. कीड आणि रोग नष्ट करण्यासाठी वापरण्याजोगे सेंद्रिय (नैसर्गिक) पदार्थ

१. निंबोळीचा अर्क

२. कडूनिंबाच्या पानांचा अर्क

३. कडूनिंबाचे तेल

४. जनावरे खात नसलेल्या झाडाच्या पाल्यांचा अर्क

५. तंबाखूच्या पानांचा काढा

६. हिंगाचे पाणी

७. काळ्या गुळापासून बनवलेले द्रावण

८. आले, मिरची आणि लसूण किंवा हिरवी मिरची, लसूण आणि कांदा यांपासून बनवलेले द्रावण

९. दही आणि भात यांपासून बनवलेले रोगनाशक

१०. राख

११. गिरीपुष्प वनस्पतीची पाने-फुले

१२. गायीचे मूत्र, ताजे शेण आणि कडधान्याचे पीठ यांपासून बनवलेले द्रावण

१३. प्रकाश सापळे (प्रकाशाकडे आकृष्ट होणार्‍या कीटकांना पकडण्यासाठी केलेला सापळा, उदा. रात्रीच्या वेळेस मोठा बल्ब लावून त्याच्या खाली रॉकेलमिश्रित पाणी ठेवावे, ज्यामुळे बल्बकडे आकृष्ट होणारे कीटक खालच्या पाण्यात पडल्यावर मरतील.)

९ इ. किडींच्या प्रतिबंधासाठी करण्याचे अन्य उपाय

९ इ १. मिश्र पीक पद्धत : एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेणे याला ‘मिश्र पीक पद्धत’ असे म्हणतात.

९ इ २. पक्षी-थांबे : शेतामध्ये पक्ष्यांना थांबण्यासाठी पक्षी-थांबे बनवावेत, ज्यामुळे पक्षी पिकातील कीटक वेचून खातील.

९ इ ३. गंध सापळे : यांमध्ये कीटकांच्या मादीचा कामगंध लावलेला असतो. त्यामुळेे कीटक आकर्षित होऊन त्यांत अडकून पडतात.

९ इ ४. सापळा पिके : प्रमुख पिकांवर किडींचे आक्रमण होऊ नये; म्हणून त्या शेजारी लावण्यात येणार्‍या पिकांना ‘सापळा पिके’ म्हणतात. किडींना मुख्य पिकापेक्षा जास्त संवेदनशील असे पीक ‘सापळा पीक’ म्हणून लावले जाते. यामुळे मुख्य पीक सुरक्षित राहून हे गौण पीक किडींद्वारे खाऊन टाकले जाते. उदा. पिंपळीमध्ये झेंडूची लागवड केल्याने सूत्रकृमी न्यून होऊन पिंपळीचे उत्पन्न वाढण्यास साहाय्य होते. (झेंडूच्या मुळांमधून सूत्रकृमींना हानीकारक असे एक रसायन स्रवते, त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास साहाय्य होते.)

९ इ ५. शेजारच्या शेतातील किडींचे स्थानांतर रोखणे : हेसुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी सापळा पिके, साबण पाणी, पिठाची धूरळणी, हाताने वेचणे, पिकांचे फेरपालट इत्यादी सूत्रांचा विचार करावा.’

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

भावी आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून, तसेच नेहमीसाठीही स्वतःच्या घरी न्यूनतम २ – ३ तुळशीची रोपे लावा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

वैद्य मेघराज पराडकर

वैद्य मेघराज पराडकरहिंदु धर्म आणि आयुर्वेद यांमध्ये तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. ‘प्रत्येक घरात तुळस असावीच’, असे धर्मशास्त्र सांगते. तुळस असंख्य विकारांमध्ये उपयोगी पडते. आयुर्वेदानुसार कोणत्याही विकारात वात, पित्त आणि कफ या ३ दोषांपैकी एक किंवा अधिक दोष प्रभावित होतात. सामान्यपणे वात आणि कफ यांवर उष्ण, तर पित्तावर शीत (थंड) औषधाची योजना केली जाते. उष्ण आणि शीत (थंड) हे दोन्ही गुणधर्म एकाच झाडात असल्याचे ‘तुळस’ हे एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. तुळशीची पाने उष्ण आणि बी थंड असते.तुळशीचे लाभ लक्षात घेऊन भावी आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून, तसेच नेहमीसाठीही सर्वांनीच आपल्या घरी तुळशीची रोपे लावावीत. औषधासाठी तुळशीची न्यूनता भासू नये, यासाठी एकच रोप लावण्याऐवजी न्यूनतम २ – ३ तरी रोपे लावावीत. तुळशीच्या मंजिरीमध्ये तिचे बी असते. एका मंजिरीतील बियांपासूनही अनेक तुळशीची रोपे सिद्ध होतात. पावसाळा चालू होण्यापूर्वी किंवा पहिला पाऊस पडल्यावर पेरलेले बी उगवण्याची शक्यता अधिक असते. पावसाळा चालू होत असल्याने ही लागवड शक्य तेवढ्या लवकर करावी. पाऊस चालू झाल्यावर तुळशीच्या मोठ्या रोपाखाली नैसर्गिकपणे तिचे बी पडून काही रोपे उगवतात. ही रोपे खणून काढून त्यांची पुन्हा लागवड करता येते.

आयुर्वेदानुसार ‘शुक्ला कृष्णा च तुलसी गुणैस्तुल्या प्रकीर्तिता ।’ (संदर्भ : ‘भावप्रकाश निघंटु’) म्हणजे ‘पांढर्‍या आणि काळ्या तुळशींचे गुणधर्म एकसारखेच आहेत.’ यामुळे दोनपैकी कोणत्याही तुळशीची लागवड करता येईल.

तुळशीचे सविस्तर औषधी उपयोग सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ यात दिले आहेत. तुळशीची लागवड कुंडी किंवा प्लास्टिकची पिशवी यांतही करता येते. ही लागवड कशी करावी ? आणि लावलेल्या रोपाची काळजी कशी घ्यावी ? याचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’, यात दिले आहे. साधकांनी या ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या घरी तुळशीची लागवड करावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर (५.६.२०२१)