विवाहेच्छुक साधकांसाठी सूचना

समाजात विवाह ठरवण्यापूर्वी दोन्ही परिवारांकडून वधू-वरांचे कुल, शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंबीय आदी विविध प्रकारची माहिती जाणून घेतली जाते आणि ते आवश्यकही असते. विवाहेच्छुक साधकांनी मात्र या व्यावहारिक माहितीच्या जोडीला ‘भावी पती किंवा पत्नी यांना ‘साधनेची आवड आहे का ?’, याचीही माहिती घ्यायला हवी; कारण विवाहानंतर ‘आपल्या जोडीदाराला साधनेची आवड नाही; साधनेसाठी वेळ दिलेला त्याला चालत नाही’, असे कळले, तर विवाहित साधकांच्या साधनेची हानी होते. घरात साधनेला विरोध होत असल्यास साधकांच्या साधनेत खंड पडू शकतो. एखाद्याला साधनेची आवडच नसेल, तर त्याच्यात पालट करणे कठीण असते.
खरेतर ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हेच मनुष्यजन्म मिळण्याचे खरे कारण आहे. ईश्वरप्राप्ती होण्यासाठी साधकाला साधना करायला हवी आणि ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात व्हायला हवी. त्यामुळे साधनेला पूरक वातावरण आणि जोडीदार निवडल्यास साधकाच्या साधनेत खंड न पडता अखंड साधना चालू रहाते अन् ‘ईश्वरप्राप्ती’ होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल होऊ लागते.
‘जन्म, मृत्यू आणि विवाह’ या तिन्ही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असून त्या प्रारब्धानुसारच घडत असतात. असे असले, तरी साधकांनी आपले क्रियमाण कर्म वापरून ‘साधना अखंड चालू रहावी’, या उद्देशाने साधना करणारा किंवा साधनेसाठी पूरक असलेला जोडीदार निवडण्यावर भर द्यावा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यावे !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले