भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी  औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

भाग  ६ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/483414.html

भाग ७

८.  मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी रोपे बनवण्यास आवश्यक असलेली रोपवाटिका

८ उ. रोपांची निर्मिती

८ उ १. भूमीवर रोपे बनवणे : ‘वाफ्यांवर रोपनिर्मिती करायची असल्यास भूमीलगत सपाट वाफे, गादी वाफे किंवा खोल वाफे करून रोपनिर्मिती केली जाते.

८ उ २. प्लास्टिक पिशव्या किंवा ‘रूट ट्रेनर’ मध्ये रोपे बनवणे : प्लास्टिक पिशव्या किंवा ‘रूट ट्रेनर’ (बी रुजवण्यासाठीचे विशिष्ट आकाराचे संच) यांमध्येही रोपनिर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते.

८ उ २ अ. प्लास्टिक पिशव्यांमध्ये रोपे बनवण्याचे लाभ

१. पिशव्यांत सिद्ध केलेली रोपे लागवड क्षेत्रात लावण्यास अधिक सोयीस्कर आणि उपयुक्त असतात.

२. रोपांना हानी न पोचवता ती लागवड क्षेत्रात लावता येत असल्याने रोपांचे जगण्याचे प्रमाण जास्त असते.

८ उ २ आ. पिशव्यांत रोपे सिद्ध करण्याची पद्धत

१. या पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार ९ × १५, १० × २०, १२.५ × २५ किंवा २० × ३० सें.मी. आकाराच्या पिशव्या निवडाव्यात.

२. पॉलिथीन पिशव्यांना वरून ४ सें.मी. अंतर सोडून आणि खालून ५ सें.मी. अंतर सोडून ३ छिद्रे पाडावीत. असे केल्याने हवा आत येण्यास आणि जास्तीचे पाणी बाहेर जाण्यास साहाय्य होते आणि रोपे उत्तम प्रकारे सिद्ध होतात.

३. तीन भाग गाळाची माती, एक भाग बारीक वाळू आणि एक भाग कुजलेले शेणखत असे मिश्रण करून ते चाळून पिशवीत भरावे.

४. पिशवीचा तळ हलवून भूमीवर हलकेच आदळावा. त्यामुळे माती किंचित घट्ट होईल.

५. पिशवीचा वरील १ सें.मी. भाग रिकामा ठेवावा.

६. पिशव्या वाफ्यात ठेवते वेळी १.२ मी. रुंद आणि १५ मी. लांब प्लास्टिक शीट पसरून त्याच्या बाजूने पिशव्यांच्या आधाराकरता लाकडाच्या पट्ट्या किंवा दोर्‍या लावाव्यात आणि पिशव्या आधाराला टेकवून सरळ उभ्या ठेवाव्यात.

७. बियाणे रुजत घालण्यापूर्वी ते बुरशीनाशक औषधात आणि शक्य असल्यास रायझोबियम मिश्रणात बुडवून लहान बिया ३ ते ४ आणि मोठ्या बिया २ ते ३ या प्रमाणात पिशव्यांमध्ये लावाव्यात.

८. छाटांपासून लागवड करायची झाल्यास छाट लावण्यापूर्वी ते आय्.ए.ए. किंवा आय्.बी.ए. (२० पीपीएम्) या संप्रेरकामध्ये बुडवून लावल्यास छाटांचे फुटण्याचे आणि मुळे येण्याचे प्रमाण वाढते.

९. अशा पद्धतीने पिशव्यांची रचना केल्यास पाणी घालणे, फवारणी, तण काढणे आणि पिशव्या हलवणे सोपे जाते.

८ ऊ. रोपांच्या सुरक्षेसाठी शेड उभारणे

८ ऊ १. शेडची निर्मिती : ऊन, वारा, पाऊस यांपासून रोपवाटिकेतील रोपांचे संरक्षण करण्यासाठी शेड असणे महत्त्वाचे असते. निरनिराळ्या जातींच्या रोपांच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आणि रोपवाटिकेच्या ठिकाणानुसार रोपवाटिकेमध्ये शेड बनवावी लागते. यासाठी १००, ७० किंवा ५० मेसचे शेडनेट, पॉलिथीन किंवा पत्रे वापरून शेड बनवता येते. हिवाळ्यामध्ये ही शेड सायंकाळी बंद करून सकाळी उशिरा उघडावी. असे केल्याने नवीन रोपांना वातावरणातील धुक्याचा त्रास होत नाही. वाफ्यांना सावली पुरवण्यासाठी पर्यायी साधन म्हणजे झटपट वाढणारे सदाहरित वृक्ष. हे वृक्ष दोन वाफ्यांच्या मध्ये लावावेत.

८ ऊ २. रोपांसाठी शेड बनवण्याचे लाभ

अ. शेडमुळे नाजूक अन् कोवळी रोपे तीव्र सूर्यप्रकाशापासून, तसेच मोठ्या पावसापासून वाचवली जातात.

आ.  शेडमुळे दिवसाच्या मध्यावरील अधिक असणारे तापमान अल्प करून वाफ्यांतील बाष्पीभवनाचे प्रमाण अल्प करता येते. त्यामुळे दिवसाचे २४ घंटे वातावरण एकसारखे रहाते.

इ. बियाण्यांच्या उगवण्याच्या प्रक्रियेपासून सिद्ध झालेली रोपे लागवड क्षेत्रामध्ये लावण्यापर्यंत शेड हेच रोपांच्या संरक्षणाचे एकमात्र साधन ठरते.

८ ए. तण नियंत्रण : रोपवाटिकेतील सर्वांत मोठी अडचण म्हणजे तण. तणांवर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे असते. तणे ही रोपांशी स्पर्धा करत हवेतील आर्द्रता, खते, अन्नद्रव्ये आणि प्रकाश यांचा पुरवठा अल्प करतात अन् त्यामुळे रोपांची हानी होते. तण नियमित आणि काळजीपूर्वक काढावे. उपयोगात नसलेली जागा आणि रस्ते यांवरील तणही नियमित नष्ट केले पाहिजे. दमट हवामानाच्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून हाताने तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणजे तणनाशकांचा वापर करणे. तणनाशके वापरून आपण मोकळ्या जागेतील तण नष्ट करू शकतो. तणनाशके फार काळजीपूर्वक वापरावीत. अन्यथा त्यामुळे रोपवाटिकेतील रोपांना हानी पोचू शकते.’

(क्रमशः सोमवारच्या अंकात)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

बहुगुणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देऊन वनौषधींच्या संवर्धनासाठी हातभार लावावा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

‘आयुर्वेदाची वनौषधी म्हणजे सर्व व्याधींवरील संजीवनी आहेत. या वनौषधींमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यामुळे रोगनिवारण होते. रोग्याला निरोगी आणि दीर्घायु जीवन प्रदान करण्याचे सामर्थ्य या वनौषधींमध्ये आहे. सध्या यांतील अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांची लागवड (संवर्धन) करणे, त्यासाठी भूखंड उपलब्ध करून देणे, तसेच अन्य साहाय्य करणे, हे काळानुसार आवश्यक आहे.

बर्‍याच जणांकडे लागवड करण्यायोग्य मोठा भूखंड उपलब्ध असतो; पण ते काही कारणास्तव लागवडीसाठी वेळ देऊ शकत नाहीत. ते काही वर्षांसाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीकरता त्यांचा भूखंड विनामूल्य उपलब्ध करून देऊन या वनस्पतीच्या संवर्धनासाठी हातभार लावू शकतात. यासाठी इच्छुक असलेल्यांनी पुढील सारणीनुसार [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर त्यांची माहिती पाठवावी.

यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांना ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२१)