सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘आषाढी पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – सध्या महाराष्ट्रात तमाम वैष्णवजन, समस्त वारकरी संघटना, दिंडीकरी, फडकरी यांच्याकडून ‘आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर अशी पायी वारी काढण्यासाठी अनुमती मिळावी’, अशी मागणी केली जात आहे. तरी सरकारने या संदर्भात वारकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ बैठक बोलावून चर्चा करून मार्ग काढावा. आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करत आहोत.

आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, वारकरी महामंडळ सचिव (आळंदी) 

वारकरी संप्रदायाच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट आहे की, पंढरपूरची वारी ही आतापर्यंत पायीच होत आली आहे आणि या वर्षीही ती पायीच व्हायला हवी. आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही.